ओबीसी आरक्षण पेच

0
253
राज्य मागासवर्ग आयोगाचे कामकाज ठप्प.
ओबीसी आरक्षणाचा  अध्यादेशामुळे कायदेशीर पेच
लातुरातील चर्चासत्रात लक्ष्मण हाके यांची माहिती
आरक्षणाच्या प्रश्नावर झाले चर्चासत्रात मंथन
 लातूर/प्रतिनिधी:ओबीसी आरक्षण आणि त्यासंदर्भातील विविध प्रश्नांवर लातूर येथे आयोजित चर्चासत्रात मंथन करण्यात आले.आरक्षणा संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे असा सुर या चर्चासत्रात सहभागी झालेल्या मान्यवरांनी व्यक्त केला.
   ओबीसी व्हीजेएनटी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने लातूर येथे ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा.लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत झालेल्या या चर्चासत्रास लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, कृति समितीचे संयोजक ॲड. गोपाळ बुरबुरे,रेणापुरचे उपनगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे,राजेंद्र वनारसे, नगरसेवक आयुब मणियार,विजयकुमार साबदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
  ओबीसी आरक्षणाच्या विविध पैलूंवर या चर्चासत्रात विचार विनिमय झाला. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावर गदा येत असल्याने आता पुन्हा एकदा संघर्ष करावा लागणार आहे.ओबीसी बांधवांनी एकत्रित येऊन ही लढाई लढणे गरजेचे आहे,असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे इंपेरिकल  डाटा व आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्यासंदर्भात चर्चा झाली. ओबीसी समाजाचा शाश्वत विकास व्हायचा असेल तर इंपेरिकल डाटा संकलित होणे आवश्यक आहे.यासाठी राज्य शासनाने मागासवर्गीय आयोगाला निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.असे असले तरी अद्यापही निधी मिळालेला नाही.डाटा संकलनासाठी आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता सरकारने केलेली नाही.केंद्र शासनाने आवश्यक असणारी जनगणनेची माहिती राज्य सरकारला दिलेली नाही. एकंदरीत आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस पुढे ढकलला जात असून गुंता वाढत आहे. त्यामुळे दोन्ही सरकारांनी ठाम भूमिका घेण्याची गरज सहभागी मान्यवरांनी व्यक्त केली.या चर्चासत्रास ओबीसी ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष अजित निंबाळकर,माजी नगराध्यक्ष दयानंद चोपणे, माळी सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष पद्माकर वाघमारे, काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा.एकनाथ पाटील,रघुनाथ मदने,ॲड. राजेश खटके,शरद पेठकर, जेष्ठ रंगकर्मी बाळकृष्ण धायगुडे,ओबीसी महासंघाचे अध्यक्ष श्रीनिवास अकनगिरे, नामदेव इगे,हरीभाऊ गायकवाड,सरवडे मारुती, झटिंगअण्णा म्हेत्रे,कृष्णा क्षीरसागर,ताहेर सौदागर, अजीज बागवान,सुदर्शन बोराडे,हामिदपशा बागवान, कैलास मुद्दे,भाऊसाहेब शेंद्रे, बालाजी लव्हे,प्रा.गिरीधर तेलंगे,उमेश परदेशी, इस्माईल लद्दाफ,विशाल फुटाणे,आत्माराम डाके, इंद्रकुमार माळी,हनुमंत सलगर,मोहन क्षीरसागर,राम पाटील,बालाजी श्रीरामे, अभिजीत मदने,मनोज तिघाडे आदी उपस्थित होते.
 चौकट १ …
मागासवर्ग आयोग सदस्यांची खदखद ..
राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा.लक्ष्मण हाके हे या चर्चासत्रास उपस्थित होते.आयोगाची स्थापना होवून चार महिने झाले आहेत पण अद्याप कसलेही काम झाले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.आयोगाला मनुष्यबळ दिले जात नाही.आर्थिक तरतूद नाही,अशी खदखद त्यांनी व्यक्त केली.इंपेरिकल डाटा केवळ आरक्षणासाठीच लागत नाही तर सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी तो उपयोगी ठरतो.पण केंद्र सरकार तो उपलब्ध करून देत नाही,असे ते म्हणाले.
चौकट २ …
दोन्ही सरकारांनी ठोस भूमिका घ्यावी-महापौर विक्रांत गोजमगुंडे
 ओबीसी आरक्षणा संदर्भात केंद्र आणि राज्य शासनाने ठोस भूमिका घेतली पाहिजे, असे मत महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी या चर्चासत्रात बोलताना व्यक्त केले.राज्य सरकारने आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे.हा निर्णय स्वागतार्ह आहे परंतु ओबीसी आरक्षण पुन्हा कायद्याच्या चौकटीत अडकू नये यासाठी इम्पेरीकल डाटा जमा करणे आवश्यक आहे.हा डाटा लवकरात लवकर जमा करण्यासाठी दोन्ही सरकारांनी आवश्यक त्या उपाययोजना केल्या पाहिजेत असेही ते म्हणाले.लातुरने ओबीसी आरक्षणाच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे.हे चर्चासत्र ओबीसींच्या भविष्यातील चळवळीसाठी दिशादर्शक ठरणार असल्याचेही ते म्हणाले.
पत्रकार परिषद व्हिडिओ लिंक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here