रक्तदान ,व्याख्यान व तिळगुळ समारंभाने अर्थवर्धिनी जानाई, श्री गुरुजी पतसंस्थेची दशकपूर्ती
सामाजिक भान , विश्वाहार्य सेवेची परंपरा राखणाऱ्या जानाई परिवाराचे सर्वत्र कौतुक
लातूर; दि.३( माध्यम वृत्तसेवा):- आर्थिक वृद्धी आणि विश्वासार्ह सेवेची परंपरा असलेल्या जानाई परिवारातील अर्थवर्धिनी जानाई महिला सहकारी पतसंस्था आणि श्री गुरुजी नागरी सहकारी पतसंस्थेचा दशकपूर्ती समारंभ सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त वैचारिक व आरोग्याचे वाणही लुटण्यात आले .या प्रसंगी रक्तदान शिबिर आणि आरोग्य मनाचे या विषयावर व्याख्यान तसेच हळदीकुंकू, तिळगुळ समारंभाचे आयोजनही करण्यात आले होते.

सेवाभावी नि:स्वार्थ व कार्यक्षम संचालक मंडळ ,सुरक्षित गुंतवणुकीसाठी विश्वसनीय संस्था म्हणून सर्वत्र परिचित असलेल्या जानाई परिवाराच्या अर्थवर्धिनी जानाई महिला सहकारी पतसंस्था मर्यादित लातूर आणि श्री गुरुजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लातूर या संस्थेच्या दशकपूर्ती समारंभ निमित्त मित्र नगर गीताई संकुल मधील जानाई फंक्शन हॉलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या सत्रामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते .या रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास संदीकर यांनी दीप प्रज्वलित करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले .यावेळी अर्थवर्धिनी जानाई महिला सहकारी संस्थेच्या अध्यक्षा गीता ठोंबरे, उपाध्यक्षा, डॉ. माधवी निरगुडे, संचालिका रोहिणी मुंडे, श्री गुरुजी नागरी पतसंस्थेचे सचिव संजय प्र. अयाचित यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वप्रथम संस्थेचे सर व्यवस्थापक संजय कुलकर्णी तसेच प्रशांत भोसगेकर नामदेव पाटील, पंकज तेरकर, दत्ता झुंजारे, शेखर कुलकर्णी ,संकेत कुलकर्णी यांनी रक्तदान केले . इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या भालचंद्र रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी हे रक्त संकलन केले.

डॉ.श्रीनिवास संदीकर यांनी यावेळी रक्तदानाचे महत्त्व विशद करीत जानाई परिवारातील अर्थवर्धिनी व श्री गुरुजी पतसंस्था अल्पावधीतच नावारूपाला आली असून सातत्यपूर्ण सेवा देऊन या संस्थेने लातूरकरांची विश्वासार्हता जोपासली आहे ,असे गौरवोद्गार काढले. यावेळी गीता ठोंबरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका कुलकर्णी हिने केले.
दुसऱ्या सत्रामध्ये *आरोग्य मनाचे* या विषयावर महिलांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी लातूरातील सुप्रसिद्ध वैद्य डॉ.उमा देशपांडे यांनी महिलांनी आपले आरोग्य संतुलित राखण्यासाठी व मन प्रसन्न ठेवण्यासाठी काय करायला हवे याच्या काही टिप्स देखील यावेळी दिल्या. महिलांचे आरोग्य जर चांगले असेल आणि त्यांचे मन जर प्रसन्न असेल तर त्याचा फायदा संपूर्ण कुटुंबाला होत असतो, त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याकडे जागरूकतेने लक्ष देणे गरजेचे आहे .ताण-तणावाचे प्रसंग येत असतील तर वेळीच मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन सल्ला घेऊन योग्य तो उपचार करून घ्यायला हवा .टाईम मॅनेजमेंट करून क्रोध ,रागावर नियंत्रण ठेवायला हवे .राग हा शरीराचे नुकसान करतो. आपल्या मनातील भाव व्यक्त करीत महिलांनी मोकळे व्हायला हवे .आपल्या मनावर क्रोध रागाने ताबा घेऊ नये यासाठी महिलांनी प्रयत्न करायला हवे. महिलांनी जर आपले आरोग्य सुधारले तर त्याचा फायदा संपूर्ण समाजाला आणि कुटुंबाला होत असतो त्यामुळे महिलांचे आरोग्य हे खूपच महत्त्वपूर्ण आहे असेही त्या म्हणाल्या.

प्रारंभी पतसंस्थेच्या अध्यक्षा गीता ठोंबरे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला 22 कोटी ठेवी असणारी आणि सुरक्षित सेवा देणारी,वृद्धिंगत होत जाणारी ही पतसंस्था आहे ,असे त्यांनी आवर्जून सांगितले. याप्रसंगी त्यांनी सभासदांना दहा टक्के लाभांशही जाहीर केला. मनाचे विकार वाढलेले असून त्यासाठी संस्थेने महिलांचे आरोग्य हे व्याख्यान आयोजित करून वैचारिक वाण लुटले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गुरुजी नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष अभियंते अतुल ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर व्यवस्थापक संजय कुलकर्णी, अर्थवर्धिनी पतसंस्थेच्या व्यवस्थापिका श्रुती पळणीटकर, श्री गुरुजी नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापिका सरिता दीक्षित यांच्यासह संपदा भालेकर, भाग्यश्री औटी ,रेणुका कुलकर्णी, विकास धंनतेराव धनंजय औटी मानसि गोसावी, उत्कर्षा अंधोरीकर ,अश्विन कुलकर्णी, तसेच ऋतुजा अघोर, विजया कुलकर्णी ,प्रशांत भोसगे कर नामदेव पाटील आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
