जनतेने भाजपाला आशीर्वाद दिल्यास लातूर शहराला चंदीगड बनविण्याचे काम आपण करू
– माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर दि.11(माध्यम वृत्तसेवा):– लातूरच्या सत्ताधार्यांकडे साडेआठ वर्षे मुख्यमंत्री व तेवीस वर्षे मंत्री म्हणून पदावर असतानाही त्यांनी लातूर शहराचा फारसा विकास केलेला नाही. लातूरच्या विकासात भर पाडणारा एखादा उद्योगही आणलेला नाही. एक उद्योग आणला तोही भाजपाने बोगी कारखाना या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळालेला आहे.
लातूरच्या आमदाराने गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी उजणीचे पाणी लातूरला दोन महिण्यात आणू अन्यथा आमदारकीचा राजीनामा देऊ असे आश्वासन देऊनही उजनीचे पाणी आणण्यास त्यांना यश आलेले नाही. या बाबीची नैतीक जबाबदारी स्वीकारून त्यांनी आमदारकीचा राजीनामा देणे आवश्यक होते, परंतु तो ही त्यांनी दिलेला नाही. त्यामुळे स्वार्थी भूमिकेतून आणि नैतिक मुल्य बाजूला सारून काम करणार्या सत्ताधार्यांना पायउतार करून विकासाच्या भूमिकेतून काम करणार्या भाजपाच्या पाठीशी सक्षमपणे उभे रहा लातूरच्या जनतेने भाजपाला विधानसभा निवडणुकीत आशीर्वाद दिल्यास लातूर शहराला चंदीगड बनविण्याचे काम आपण सर्वांना सोबत घेऊन करू असे प्रतिपादन भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा व गुजरात राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.

यावेळी ते भाजपा युमोचे प्रदेश उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या जनसेवेचा महायज्ञ व लाभार्थी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी या मेळाव्याला भाजपाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष देविदासराव काळे, लातूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, लातूर शहर विधानसभा निवडणूक प्रमुख अर्चनाताई पाटील चाकूरकर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दिग्विजय काथवटे, जिल्हा सरचिटणीस मिनाताई भोसले, भाजपाचे अमोल गित्ते, संजय निराधार समितीचे अध्यक्ष शिवसिंह शिसोदिया, नगरसेविका रागिणीताई यादव, सूर्यकांतराव शेळके,नगरसेवक बालाजी शेळके, सुभाषअप्पा सुलगुुडले, बाबासाहेब देशमुख, उध्दवराव जाधव, भाजपाचे बी.टी.कदम, बाळासाहेब शिंदे, मंडलाध्यक्ष संजय गिर, गोपाळ वांगे,भाजपा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष मोहसिन शेख, सिध्देश्वर उकीरडे, मुन्ना हाश्मि शितलताई कुलकर्णी, हणमंत काळे, लताताई घायाळ, अॅड.गणेश गोजमगुंडे, भाजपा युवा मोर्चा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष गणेश गोमचाळे, अकाश बजाज, अजय कोटलवार, ओम राठोड, आकाश पिटले, संतोष सरतापे,जावेद शेख, अॅड.पंकज देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच संयोजन समितीच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रामाचे प्रास्ताविक भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले. या कार्यक्रमामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या 306 लाभार्थ्यांना निवडीचे प्रमाणपत्र, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत 700 लाभार्थ्यांचा सन्मान व 800 बांधकाम कामगारांना भांडी व पेटी किट्सचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अब्दूल गालीब शेख यांनी केले तर आभार मंडलाध्यक्ष संजय गिर यांनी मानले. यावेळी या कार्यक्रमाला संतोष तिवारी, गजेंद्र बोकन, शशिकांत हांडे यांच्यासह भाजपा, भाजपा युवा मोर्चाचे पक्ष पदाधिकारी, मंडलाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येेने उपस्थित होते.

अशक्यला शक्य करणारा भारतीय जनता पार्टी पक्ष – अजितसिंह पाटील कव्हेकर
लातूर शहरातील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनसंवाद दौरा केला. या माध्यमातून लातूरकरांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शहरात कचरा, पाणी, रस्ते हे प्रश्न प्राधाण्याने शहरातील प्रत्येक भागात आहेत. परंतु या समस्या मांडायच्या कोणाकडे हा प्रश्न लातूरकरांसमोर आहे. लातूरातील सत्ताधारी आमदारांना लातूरकरांसाठी वेळच नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहेत. त्यांच्या पाठीशी चाळीस वर्ष आशीर्वाद उभा करूनही त्यांनी लातूरकरांच्या कुठल्याही समस्या सोडविण्याचा प्रयत्न केलेला नाही. परंतु आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचा एक रिक्षाचालक ते मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक संघाचा कार्यकर्ता ते राज्याचे माजी मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास झालेला आहे. साध्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झालेल्या महायुतीच्या सरकारने अनेक क्रातीकारीं व लोकहिताचे निर्णय घेऊन जनतेला न्याय देण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे खर्या अर्थाने अशक्याला शक्य करणारा भारतीय जनता पाटी हा एकमेव पक्ष आहे. असे प्रतिपादन भाजपा युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले.

अडचणी निर्माण करणार्यांनाच अडचणीत आणण्याचे काम आपण करू – अर्चनाताई पाटील चाकूरकर
अजितभैय्यांनी पदयात्रेच्या माध्यमातून लातूरच्या शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या जनसंवाद पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. या पदयात्रेचा हा खर्या अर्थाने ऋणनिर्देश सोहळा आहे. सध्याचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. या सरकारने कुठलीही जात पात न पाहता सर्वांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केलेले आहे. लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून दिलेल्या सन्मान निधीच्या माध्यमातून बचत करण्याचे काम करा. अजित भैय्यांच्या रूपाने तरूण व उगवत नेतृत्व आपल्याला लाभलेल आहे. मधल्या कालावधीमध्ये त्यांनाही अडचणी आणण्याचा घाट अनेकांनी घातला असल्याचे समोर आले. या प्रकरणामध्ये आपला पक्ष आपल्या पाठीशी सक्षमपणे उभा राहिला. परंतु अशा अडचणी निर्माण करणार्यांनाच अडचणीत आणण्याचे काम सर्वांनी मिळून करावे असे आवाहन लातूर शहर विधानसभेच्या निवडणूक प्रमुख अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी केले.
धडाडीच्या युवा नेतृत्व अजित भैय्यांच्या पाठीशी आपण सक्षमपणे उभे रहावे – देविदास काळे
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार व राज्यामध्येही भाजपा महायुतीचे सरकार आहे. लातूर जिल्हा परिषद, महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे तरीही लातूरात भाजपाचा आमदार नाही, दे दुर्दैव आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा लातूरच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी आलेली आहे. त्यामध्ये लातूर विधानसभेसाठी मी स्वतः, अजित पाटील कव्हेकर, डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर व रागिणीताई यादव आम्ही चौघानीही पक्षाकडे तिकीट मागितले आहे. परंतु युवा नेतृत्वा युवा भैय्या यांची लातूरच्या प्रश्नासाठीची तळमळ पाहून प्रभावीत झालो. त्यामुळे अशा तळमळ असलेल्या युवा नेतृत्वाला माझे समर्थन आहे. असे मी शहर जिल्हाध्यक्ष म्हणून माझी भूमिका स्पष्ट करतो. त्यामुळे आपण सर्वांनी अजित भैय्यासारख्या धडाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी सक्षमपणे उभ रहावे असे आवाहन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांनी केले.
