उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज उदगीर येथील विविध शासकीय इमारतींचे होणार उद्घाटन
लातूर, दि. २९ : (माध्यम वृत्तसेवा)-उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवार, ३० सप्टेंबर २०२४ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते उदगीर येथील विविध शासकीय इमारतींचे उद्घाटन होणार आहे. राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या संकल्पनेतून उदगीर मध्ये उभारण्यात आलेल्या विविध विकास कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांचे दुपारी २.१० वाजता लातूर विमानतळावर आगमन होईल. येथून हेलिकॉप्टरने उदगीरकडे प्रयाण करतील. दुपारी २.४० वाजता त्यांचे उदगीर शहरात त्यांचे आगमन होईल. शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील. तसेच भारतरत्न डॉ. जाकीर हुसेन चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अभिवादन करतील. त्यानंतर तळवेस येथील विश्वशांती बुद्धविहार येथे प्रार्थनेस उपस्थित राहतील. नगरपरिषद समोरील जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास, तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करतील.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या उपस्थितीत दुपारी ३.४० वाजता उदगीर येथील नूतन पंचायत समिती इमारत, नूतन तहसील व प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण होईल. त्यांतर सायंकाळी ४.१५ वाजता रॅलीला सुरुवात होईल. सायंकाळी ४.२५ वाजता उदगीर येथील जिल्हा परिषद मैदानावर जाहीर सभा होणार आहे. सायंकाळी ६.१५ वाजता उदगीर येथील नूतन पोलीस वसाहत, नूतन उपविभागीय अधिकारी कार्यालय व पोलीस स्टेशन इमारतीचे उद्घाटन होईल. त्यांतर पदाधिकारी यांच्याशी चर्चा, सदिच्छा भेटी व मुक्काम करतील.