औसा (प्रतिनिधी )-औसा येथील हिरेमठ संस्थान च्या माध्यमातून डॉ.शांतीवीर लिंग गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांनी वीरशैव लिंगायत समाजा मध्ये ईश्वर भक्तीची ओढ निर्माण केली त्यांच्या अद्वैत धर्मप्रसार कार्यामुळे हिरेमठ संस्थान भक्तीचे प्रेरणास्त्रोत झाले आहे असे प्रतिपादन जिंतूर मठाचे श्री अमृतेश्वर शिवाचार्य महाराज यांनी केले.

हिरेमठ संस्थांच्या 84 व्या वार्षिक महोत्सवानिमित्त आयोजित शिवकथा कार्यक्रमांमध्ये आपल्या आशीर्वाचनातून ते बोलत होते. स्वर सम्राट अमृतेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या संगीतमय शिव कथेने हजारो भक्तांना मंत्रमुग्ध केले मागील 80 वर्षापासून गुरु शिष्याची अखंड परंपरा सुरू ठेवून डॉक्टर शांतिवीर लिंग शिवाचार्य महाराज आणि विद्यमान पिठाधीपती बाल तपस्वी निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या माध्यमातून होत असलेले धर्म जागृती चे कार्य हे कौतुकास पात्र ठरणारे आहे प्रत्येक भक्तांनी गुरूंच्या सानिध्यात राहून भक्ती मार्गाचा अवलंब केल्यास आपले जीवन समृद्ध होते असे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.
संगीतमय शिवकथेसाठी औसा शहर व परिसरातून हजारो महिला पुरुष शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शिव कथा कार्यक्रमात भक्तगण तल्लीन होत आहेत.

शिव पार्वतीच्या सजीव देखाव्याने रंगली शिवकथा
हिरेमठ संस्थांच्या 84 व्या वार्षिक महोत्सव व शिव दीक्षा सोहळ्यानिमित्त 23 जुलै पासून 29 जुलै पर्यंत शिवपुराण महाकथेचा उपक्रम राबविण्यात आला. स्वरसम्राट श्री अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतूर कर यांच्या अमृतवाणीतून भाविक भक्तांना शिव महापुराण कथा ऐकण्याचा सुवर्णयोग आला संगीतमय शिव कथेमध्ये भाविक भक्त तल्लीन होत असून शंकर पार्वती यांचा सजीव देखावा तसेच श्री कार्तिक स्वामी आणि श्री गणेश यांच्या जन्माची कथा श्री अमृतेश्वर शिवाचार्य महाराज यांनी अतिशय सुंदर रित्या विवेचन करून भाविकांना मंत्रमुग्ध केले. हिरेमठ संस्थांचे मार्गदर्शक डॉ. शांतवीर शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थांचे पिठाधिपती बाल तपस्वी निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या अधिपत्याखाली आयोजित वार्षिक महोत्सव आणि शिवदीक्षा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून श्रीक्षेत्र उज्जैन आणि श्रीक्षेत्र काशी पिठाचे दोन्ही जगद्गुरु यांच्या दिव्य सानिध्यात होणाऱ्या शिव दीक्षा सोहळ्याकडे शिवभक्तांचे लक्ष लागले आहे.