मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्त अर्जांच्या छाननीला गती द्यावी-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
लातूर दि. 29 (वृत्तसेवा ) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात सुमारे तीन लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांच्या छाननीची कार्यवाही गतिमान करावी. यासाठी तहसीलदार, गट विकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होत्या. प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगिता टकले, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बालाजी मरे यावेळी उपस्थित होते. लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्यासह सर्व उपविभागीय महसूल अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीला उपस्थित होते.

योजनेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्यासाठी तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व तालुकास्तरीय समिती सदस्यांनी अर्जांची छाननी करून पात्र लाभार्थी महिलांची यादी तयार करावी. अर्ज छाननी करताना नियमावलीचे पालन करून ही प्रक्रिया अचूक होईल, एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. शहरी भागातील अर्ज नोंदणीला गती देण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केल्या.

लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रात महिलांचे अर्ज भरून घेण्याची कार्यवाही घरोघरी जावून करण्यात येत असल्याचे लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी सांगितले. तसेच ग्रामीण भागातील प्राप्त अर्जांची, अर्ज छाननी प्रक्रियेची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांनी दिली.