ग्रामीण आरोग्यासाठी व्यापक काम उभारणीची आवश्यकता – डॉ.प्रतिभा फाटक
डॉ. प्रतिभा फाटक यांना जानाई डॉक्टर श्री पुरस्कार देऊन सन्मानित
लातूर; दि. 22( वृत्तसेवा )-केंद्र व राज्य सरकार ग्रामीण आरोग्यासाठी काम करीत असले तरी त्यांचे प्रयत्न तोकडे आहेत. त्यासाठी विविध समाजसेवी संस्थांनी पुढे येऊन ग्रामीण आरोग्यासाठी व्यापक काम उभे करणे गरजेचे आहे ,अशी अपेक्षा डॉ. प्रतिभा फाटक यांनी व्यक्त केली.

शहरातील श्री. जानाई प्रतिष्ठानच्या वतीने 'डॉक्टर डे' निमित्त देण्यात येणारा "डॉक्टर जानाई श्री " पूरस्कार छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रूग्णालयातील डॉ.प्रतिभा फाटक यांना जाहीर झाला असून या पुरस्काराचा वितरण सोहळा नुकताच लातूरमध्ये डॉ. भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता .त्याप्रसंगी त्या सत्कारास उत्तर देत होत्या. डॉ. अरुणा देवधर यांच्या हस्ते डॉ. प्रतिभा फाटक यांचा शाल , सन्मानपत्र स्मृतिचिन्ह व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.अत्यंत देखण्या व प्रेरणादायी झालेल्या या सत्कार सोहळ्यास अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, महावस्त्र,श्रीफळ, स्मृतीचिन्ह व रोख रु.२५ हजार असे आहे. .
व्यासपीठावर विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान तथा रिसर्च सेंटरचे अध्यक्ष ॲड.अनिल अंधोरीकर, जानाई प्रतिष्ठान सांस्कृतिक मंडळाचे यंदाचे अध्यक्ष डॉ. वृंदा कुलकर्णी ,कार्याध्यक्ष प्रा. रघुनाथ उपाध्य नंदू कुलकर्णी , श्याम गिल्डा, जानाई विद्यार्थी मंडळाचा अध्यक्ष शार्दुल कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड .अनिल अंधोरीकर यांचा सत्कार शार्दुल कुलकर्णी याने शाल पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन केला. डॉ. अरुणा देवधर यांचा सत्कार सायली कुलकर्णी हिने केला .सत्कारमूर्ती डॉ. प्रतिभा फाटक यांचा सत्कार वैभवी पत्की या विद्यार्थिनीने केला. डॉ. वृंदा कुलकर्णी यांचा सत्कार अनुष्का पैठणकर हिने केला .प्रा. रघुनाथ उपाख्य नंदू कुलकर्णी यांचा सत्कार बाळकृष्ण पत्की याने केला, तर श्याम गिल्डा यांचा सत्कार मयूर पिंपळे यांनी केला. शार्दुल कुलकर्णी याचा सत्कार अवंतिका प्रयाग तिने केला.

श्री जानाई प्रतिष्ठान सांस्कृतिक मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा. नंदू कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले .आपल्या प्रास्ताविकात त्यांनी जानाईच्या विविध उपक्रमांचा थोडक्यात धांडोळा घेतला.
सत्कारास उत्तर देताना डॉ. प्रतिभा फाटक यांनी हा पुरस्कार अत्यंत नम्रतेने आपण स्वीकारत आहोत ,संस्थेची एक प्रतिनिधी म्हणून हा पुरस्कार आपण स्वीकारत असल्याचे स्पष्ट केले .त्यापुढे बोलताना म्हणाल्या की ,30 सप्टेंबर 1993 रोजी किल्लारी परिसरामध्ये झालेल्या भूकंपानंतर विवेकानंद रुग्णालयाच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या सेवा कार्यामध्ये आपण सहभागी झालो होतो .त्यावेळी त्यांनी भूकंपामध्ये आलेले अनुभव आणि प्रेरणा यांची यावेळी आठवण सांगत सगळ्या आठवणी जाग्या केल्या. या सेवा कार्यामध्ये डॉक्टर व स्वयंसेवक करत असलेले काम पाहून आपल्याला प्रेरणा मिळाली आणि ग्रामीण आरोग्यासाठी अशाच प्रकारचे काम उभे केले पाहिजे आणि आपण चांगल्या कामात स्वतःला गुंतवून घेतले पाहिजे अशी प्रेरणा या भूकंपाच्या वेळेस घेऊन वैद्यकीय सेवेचे कार्य आपण सुरू केले.
संभाजीनगर येथे 80 च्या दशकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असून, या प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामीण व शहरी भागामध्ये सेवा कार्य उभे केले जात आहे. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीने गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा देणे आणि सामाजिक ,आर्थिक, स्थलांतर ,दारिद्र्य ,व्यसनाधीनता आणि जागृती सारख्या समस्यावर काम करणे हे संस्थेचे उद्दिष्ट राहिलेले आहे .या संस्थेच्यावतीने १२ जिल्ह्यात ९५० गावे आणि शहरातील ८० उपेक्षित वस्त्यांमध्ये ६५ प्रकल्प दरवर्षी 10 लाख बांधवांच्या जीवनात स्पर्श करणे .आरोग्य ,शिक्षण, महिला सबलीकरण आधीच काम संस्थेच्या वतीने केले जाते.

ग्रामीण व विशेषतः आदिवासी भागातील मुख्य समस्या असलेल्या कुपोषणावर प्रकाशझोत टाकताना डॉ. प्रतिभा फाटक म्हणाल्या ,गेल्या ७० वर्षापासून सरकार कुपोषणावर काम करीत आहे ;परंतु अजूनही कुपोषणाचे समूळ उच्चाटन करणे आपल्याला शक्य होत नाही. जवळपास आमच्या सेवा करीत असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये ५२ टक्के कुपोषण होते, त्यामध्ये आम्ही विविध प्रयोग करून ते १८ टक्क्यावर आणले, असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. सामूहिक नामसंस्कार, सामूहिक ऊष्ठावना, ॲनिमिया यासारखे विविध प्रयोग करून कुपोषण कमी करण्यावर आपण प्रयत्न केले ,असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही एक मोठी दुर्दैवी बाब असून ,त्यावर त्या विषयावर काम करणे अत्यंत गरजेचे आहे ,असे डॉ. फाटक यांनी यावेळी आवर्जून सांगितले. संस्थेच्या वतीने अरुणोदय प्रकल्प सुरू करण्यात आला असून, 30 गावांमध्ये शेकडो शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना आत्महत्या पासून रोखण्यामध्ये प्रयत्न करण्यातआला.शेतकऱ्यांच्या मानसिक आणि आरोग्याच्या स्वास्थ्यासाठी ही संस्था काम करीत आहे. ग्रामीण भागामध्ये आरोग्यासाठी व्यापक काम उभे करणे गरजेचे आहे ,कारण सर्वसामान्यांना परवडेल अशी वैद्यकीय सेवा अजूनही मिळत नाही. आपल्या सेवेतून शक्तीकेंद्र व्हावे, सेवा वर्धिष्णू व्हावी आणि सगळी सेवा एका छताखाली मिळावी, समाज परिवर्तन घडवून यावे असे आपल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे ध्येय आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

जानाई प्रतिष्ठानचे संस्थापक अतुल ठॊंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली.जानाई सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ.वृंदा कुलकर्णी, उपाध्यक्ष डॉ.गौरी कुलकर्णी, कार्याध्यक्ष नंदकिशोर कुलकर्णी, सचिव शाम देशपांडे ,या वर्षीच्या कार्यक्रमाचे पालक शाम गिल्डा तसेच जानाई विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष शार्दूल कुलकर्णी, कोषाध्यक्ष सायली कुलकर्णी, कार्याध्यक्ष बाळकृष्ण पत्की, सचिव वैभवी पत्की , सहकार्याध्यक्ष व्यंकटेश वाघ, सहकोषाध्यक्ष अनुष्का पैठणकर, सहसचिव श्रेया कुलकर्णी व मयूर पिंपळे,गौरव कुलकर्णी ,अवंतिका प्रयाग, आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

डॉ. अरुणा देवधर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रथम प्रतिभा फाटक यांना सन्मानपत्र देण्यात आले. या सन्मानपत्राचे वाचन डॉ. आरती संदीकर यांनी केले. अनिल अंधोरीकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे बहारदार व नेटके सूत्रसंचालन गार्गी श्याम देशपांडे हिने केले तर श्याम देशपांडे यांनी केले.जानाई सांस्कृतिक मंडळाचे सचिव श्याम देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.