लातूर ( वृत्तसेवा ) :– लातूर जिल्हा पोलीस दलातील रिक्त पदांसाठीची पोलीस भरती प्रक्रिया आज दिनांक १९ जून रोजी पासून पोलीस मुख्यालय मैदान बाबळगाव येथे सुरू झाली. सदर भरतीत पोलीस शिपाई ३९, पोलीस शिपाई (बँड्समन) ५ व पोलीस शिपाई (चालक) २० असे एकूण ६४ पदाची भरती करण्यात येत आहे.
पहिल्या दिवशी भरतीसाठी एकूण ६३७ उमेदवारांना बोलविण्यात आले होते त्यापैकी ४०३ उमेदवार हजर झाले. मैदानी चाचणीत ३३५ उमेदवार पात्र व ६८ उमेदवार अपात्र ठरले. उमेदवारांना प्रवेशद्वाराच्या आत घेतल्यानंतर उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी, शारीरिक मोजमाप व त्यानंतर मैदानी चाचणी घेण्यात येत आहे.
मैदानी चाचणीमध्ये १६०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे व गोळा फेक अशा ३ प्रकारात मैदानी चाचणी घेण्यात येत आहे.
मैदानी चाचणी पारदर्शक व निष्पक्षपाती पणे होण्यासाठी प्रत्येक चाचणीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफी इत्यादी सुविधांचा वापर करण्यात येत आहे. उद्या दिनांक २० जून रोजी भरतीच्या दुसऱ्या दिवशी एकूण ७७४ उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात आले आहे.
भरती प्रक्रियेदरम्यान कोणीही आमिषांना बळी पडू नये असा काही गैरप्रकार निदर्शनास आल्यास त्याबाबत तात्काळ पोलीस प्रशासनास अवगत करणे बाबत श्री सोमय मुंडे, पोलीस अधीक्षक, लातूर यांनी उमेदवार व नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे.