जनकल्याण विद्यालयात चार दिवस अखिल भारतीय विद्वत परिषद
लातूर/प्रतिनिधी :शिक्षणाचे भारतीय प्रतिमान प्रतिष्ठित करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या पुनरुत्थान विद्यापीठाच्या वतीने हरंगुळ येथील जनकल्याण विद्यालयात चार दिवस ज्ञानयज्ञ संपन्न होणार आहे.याअंतर्गत दि.८ व ९ जून रोजी ‘अखिल भारतीय विद्वत परिषद’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यात भारतीय शिक्षण व्यवस्थे संदर्भात मंथन होणार असून त्यासाठी देशभरातून २०० मान्यवर आवर्जून उपस्थित राहणार असल्याची माहिती पुनरुत्थान विद्यापीठ, कर्णावतीच्या कुलपती श्रीमती इंदुताई काटदरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
गेल्या २० वर्षांपासून पुनरुत्थान विद्यापीठ कार्यरत आहे.अध्ययन, अनुसंधान,ग्रंथ निर्माण, संदर्भ साहित्य निर्माण या क्षेत्रात विद्यापीठाचे कार्य सुरू आहे.भारतीय शिक्षणाचे आदर्श,परंपरा व आधुनिकता याचे पुनरुत्थान करणे,भारतीय शिक्षण व्यवस्था केवळ परीक्षार्थ्यांसाठी नाही तर जीवनविद्या देणारी असावी यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.त्याचाच एक भाग म्हणून दि.८ व ९ जून रोजी जनकल्याण विद्यालयात विद्वत परिषद होणार आहे.
शनिवार दि.८ जून रोजी सकाळी ९ वाजता या परिषदेचे उद्घाटन होणार आहे.यावेळी उद्घाटक तथा कुलपती श्रीमती इंदुताई काटदरे यांचे बीजभाषण होईल.बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम होईल.सकाळी ११ ते १२:३० दरम्यान विचार सत्र होणार आहे. यात ‘राष्ट्रीय शिक्षा हेतू किये गये प्रयास और उनके परिणाम’ या विषयावर डॉ.राकेश मिश्रा हे विचार मांडतील.
अरुणकुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेत हे सत्र होणार आहे.’ब्रिटिश क्लास रूम मॉडेल और उसके परिणाम’ यावर अंकित शाह हे यावेळी विचारमंथन करणार आहेत.दुपारी २.३० ते ४ या कालावधीत होणाऱ्या चर्चासत्रात डॉ.भाग्यलता या ‘ज्ञान क्षेत्र व्यवस्थिती हेतू शोध,अनुसंधान एवम साहित्य निर्माण’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.श्री. संदीपजी हेदेखील या सत्रात सहभागी होतील. सायंकाळी ४.३० ते ६ या कालावधीत गटश: चर्चा होणार आहेत.’ धर्मकेंद्री
जीवनरचना’ हा विषय घेऊन अंकित शाह हे विचार मांडणार आहेत.
नुपूर खेतान हे देखील त्यांच्यासमवेत चर्चासत्रात सहभागी होतील’.स्वायत्त समाज: संकल्पना एवं स्वरूप’ या विषयावरील चर्चेत डॉ. चंद्रकला पंड्या व मधुसूदन व्यास तर ‘औपनिवेशकता से भारतीय मानस की मुक्ती’, या विषयावर डॉ.श्रीराम शर्मा व डॉ.राजेंद्र पेंसिंया हे विचार मंथन करणार आहेत’.’कुटुंब और आजीवन शिक्षा’ या विषयावर वैद्य सुविनय दामले व डॉ.ममता शर्मा पारिक या मार्गदर्शन करतील. समाज,राज्य अर्थ और शिक्षा शास्त्र का आपसी संबंध’ या विषयावर श्रीमती लीना गव्हाणे व डॉ.महेश बापट यांचे मार्गदर्शन होणार आहे.
याच दिवशी सायंकाळी ७ वाजता लातूर येथील दयानंद सभागृहात ज्ञानसागर ग्रंथमाला अंतर्गत १०५१ ग्रंथांचे लोकार्पण संपन्न होणार आहे.
पुनरुत्थान विद्यापीठ कर्णावतीच्या कुलपती श्रीमती इंदुताई काटदरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य सुरेशजी तथा भैय्याजी जोशी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.यावेळी देवगिरी प्रांताचे प्रांत संघचालक अनिल भालेराव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
रविवार दि.९ रोजी सकाळी ९ वाजता ‘भारतीय शिक्षा की पुन: प्रतिष्ठा हेतू कार्य योजना’ यावर विचारसत्र होणार आहे.डॉ.राम शर्मा या सत्रात मार्गदर्शन करतील. श्रीमती शैलाजाताई नवाठे यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ११ वाजता गटश: चर्चा होईल.यावेळी विविध सत्रात सहभागी झालेली मंडळी निवेदन करतील. ब्रिजकिशोर कुठ्याला यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम संपन्न होईल. दुपारी २ वाजता देशभरातील विद्वान व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने परिचर्चा संपन्न होणार आहे.यावेळी श्रीमती माला कापडिया,वैद्य विनय वैलनकर,मुनीत धीमन व गंतिमूर्ती हे ‘ज्ञानक्षेत्र व्यवस्थिती हेतू पुनरुत्थान विद्यापीठ के प्रयास और कार्य’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ४ वाजता या उपक्रमाची सांगता होणार आहे.भैय्याजी जोशी यांचे मार्गदर्शन यावेळी लाभणार आहे.
याच दिवशी सायंकाळी ६ वाजता गिरवलकर मंगल कार्यालयात परिवार शिक्षण संकल्पना व संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पाश्चात्य विचारांचा प्रभाव वाढून कुटुंब व्यवस्था खिळखिळी होत आहे.ती पूर्ववत करण्यासाठी परिवारासोबत संवाद साधून त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न या मेळाव्यातून केला जाणार आहे.श्रीमती इंदुताई काटदरे यांचे प्रमुख मार्गदर्शन या मेळाव्यास लाभणार आहे.
दि.१० रोजी सायंकाळी ६ वाजता श्रीकिशन सोमाणी विद्यालयात शिक्षण संवाद कार्यक्रम होणार आहे. देशभरातून आलेले मान्यवर या मेळाव्यात सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत.
या उपक्रमाच्या अनुषंगाने दि.१२ रोजी पुनरुत्थान विद्यापीठाच्या कार्यसमितीची बैठकही होणार आहे.
या पत्रकार परिषदेस समितीचे अध्यक्ष प्रकाश लातुरे,उपाध्यक्षा लीलाताई कर्वा,कार्यवाह प्रकाश सुगरे, विद्वत परिषद प्रमुख प्रशांत मेतकुटे,प्रकल्प समिती सदस्य अजय रेणापुरे व धनंजय माटेफळकर,दत्ता माने यांची उपस्थिती होती.