विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने मोफत अस्थिरोग तपासणी शिबिर
लातूर : (वृत्तसेवा )-लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ७९ व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून येथील पोद्दार ऍक्सिडेंट अँड ट्रॉमा केअर सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत अस्थिरोग तपासणी शिबिरात एकूण ६९ रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती डॉ. अशोक पोद्दार यांनी दिली.
पोद्दार ऍक्सिडेंट अँड ट्रॉमा केअर सेंटरच्या वतीने सातत्याने अशा प्रकारच्या मोफत अस्थिरोग व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येते. वर्षातून किमान सहा ते सात मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याचे काम या हॉस्पिटलच्या माध्यमातून केले जाते, हे विशेष. आजचे हे शिबीर १४३ वे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे माजी आमदार वैजनाथ शिंदे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. उमेश कानडे, आयएमएच्या माजी अध्यक्ष डॉ. सुरेखा काळे, माजी अध्यक्ष डॉ. दीपक गुगळे, डॉ. सतीश बिराजदार, डॉ. मंगेश कुलकर्णी, डॉ. पल्लवी जाधव, डॉ. इमरान कुरेशी आदी मान्यवरांच्या हस्ते पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. सर्व मान्यवरांनी लोकनेत्याच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली. या सर्वांचे स्वागत पोद्दार हॉस्पिटलचे संचालक डॉ.अशोक पोद्दार यांनी केले. दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांची जयंती आणि पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून नियमितपणे अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन केले जाते. डॉ.अशोक पोद्दार यांनीच लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रात अशा प्रकारच्या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचा नवा वैद्यकीय सेवा पॅटर्न कार्यान्वित करण्याकामी पुढाकार घेतला, ही बाब सर्वश्रुत आहेच. आरोग्य तसेच सामाजिक क्षेत्रातही ते कायम कार्यरत असतात. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद खऱ्या अर्थाने जोपासण्याचे काम डॉ.अशोक पोद्दार आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने सातत्याने करत असतात.

यावेळी बोलताना माजी आ. वैजनाथ शिंदे यांनी डॉ. पोद्दार यांच्या या मोफत आरोग्य विषयक शिबीर उपक्रमाचे कौतुक केले. आज समाजात वावरणाऱ्या प्रत्येक घटकातील नागरिकांना चांगल्यात चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी डॉ. पोद्दार नेहमी प्रयत्नशील असल्याचे पहायला मिळते,असेही ते म्हणाले. डॉ. उमेश कानडे, डॉ. सुरेखा काळे यांनीही या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. डॉ. अशोक पोद्दार यांनी यावेळी बोलताना अशा प्रकारच्या मोफत अस्थिरोग व तपासणी शिबिरांच्या माध्यमातून दरवर्षी हजारो रुग्णांची सेवा करण्याची संधी आपणास मिळते,असे सांगितले. भविष्यात आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून सातत्याने अशा प्रकारच्या मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येईल,असेही ते म्हणाले.
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या मोफत अस्थिरोग तपासणी शिबिरात एकूण ६९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी १६ रुग्णांचे एक्सरे काढण्यात आले. १३ रुग्णांची रक्त तपासणी तर ४० रुग्णांची फिजिओथेरपी करण्यात आली. तर एका रुग्णाची ५० टक्के सवलतीच्या दरात शस्त्रक्रियाही करण्यात आली. त्याचप्रमाणे शिबिरात सहभागी झालेल्या सर्वांच्या सर्व ६९ रुग्णांची मोफत हाडांच्या ठिसूळतेची तपासणी करण्यात आली. शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रुग्णांसाठी विविध औषधी कंपन्यांच्या वैद्यकीय प्रतिनिधींनी मोफत औषधी उपलब्ध करून दिली.