रविवारी लातुरात व्हि. एस. पँथर्सच्या वतीने
सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा : विनोद खटके
लातूर ( वृत्तसेवा ) -: विश्वरत्न बोधीसत्व प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून व्हि.एस. पँथर्सच्या वतीने रविवार, दि. २६ मे २०२४ रोजी लातुरात सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती व्हि .एस. पँथर्सचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
व्हि.एस. पँथर्सच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेला हा पाचवा सामूहिक विवाह सोहळा आहे. हा सोहळा रविवारी, सायंकाळी सव्वा सात वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या भव्य मैदानावर संपन्न होणार आहे. या विवाह सोहळ्यात एकूण ३० वधू – वरांचे विवाह होणार असून यामध्ये तीन मुस्लिम, १२ हिंदू तर १५ जोडपी बौद्ध धर्माची असल्याचे विनोद खटके यांनी सांगितले. या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, आ. अमित देशमुख यांसह सर्व लोकप्रतिनिधी – वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या विवाह सोहळ्यासाठी कोणत्याही प्रकारचे नोंदणीशुल्क संघटनेकडून आकारले जात नसल्याचेही खटके यांनी सांगितले.
या सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या वधू – वरांचे विवाह त्या त्या धर्माच्या रुढी – परंपरेप्रमाणे, धार्मिक पद्धतीने होणार आहेत. यावर्षीच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे एक जोडपे अंध तर दोन जोडपे दिव्यांग आहेत. वधू – वरांना मणी – मंगळसूत्र तसेच संसारोपयोगी साहित्यही उपलब्ध करून दिले जाणार आहे. सोहळ्यात सहभागी होणाऱ्या नोंदणीकृत वधू – वरांच्या वयांचे दाखले, त्यांच्या माता – पित्याची संमती – त्यांची ओळखपत्रेही घेण्यात आली आहेत. वधू -वरांच्या आई – वडिलांची संमती असेल तर आपण आंतरजातीय तसेच आंतर धर्मीय विवाहही घडवून आणू,असे खटके यांनी सांगितले. शासन सामूहिक विवाह सोहळ्याच्या बाबतीत उदासीन असल्याची खंत व्यक्त करून विनोद खटके यांनी आपण प्रतिवर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचेही वाटप करत असल्याचे नमूद केले. आपली व्हि . एस. पँथर्स संघटना विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यास सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे ,असे आवाहनही त्यांनी केले.
या प्रसंगी व्हि .एस. पँथर्सचे प्रदेशाध्यक्ष माजी नगरसेवक सचिन मस्के, संपर्क प्रमुख आनंद जाधव , जिल्हाध्यक्ष शरद किनीकर, विशाल गायकवाड , एड. किरण पायाळ ,रवी कुरील, असद शेख, गोविंद कांबळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.