युवकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था ः
पंतप्रधानांना ऐकण्याची लातुरकरांना उत्सुकता ः
मंडप उभारणीस प्रारंभ
लातूर/प्रतिनिधी : भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आठवले गट, मनसे, रासप, महायुतीचे लातूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खा. सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवार दि. 30 एप्रिल रोजी लातूर येथे जाहीर सभा घेणार आहेत. या सभेची जय्यत तयारी करण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जवळून पाहता व ऐकता यावे म्हणून या सभेत युवकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती लोकसभा संयोजक माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी जनता नेहमीच आतुर असते. म्हणूनच देशाच्या विविध भागात होणार्या त्यांच्या सभांना उदंड प्रतिसाद लाभत आहे. लाखो लोक सभास्थळी गर्दी करीत आहेत. पंतप्रधान मोदी हे देखील उपस्थितांच्या भावनांची दखल घेत असल्याचे दिसून येत आहे.
लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर शृंगारे यांच्यासाठी सभा घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानुसार मंगळवार दि. 30 एप्रिल रोजी दुपारी 12.30 वाजता ही सभा होणार आहे. गरुड चौकातून सारोळा गावाकडे जाणार्या रस्त्यालगत 40 एकरवर ही सभा होणार आहे. यासाठी अडीच लाख चौरस फूट मंडपाची उभारणी केली जात आहे. मंडप उभारणीच्या कामास सुरूवातही झाली आहे. आ. निलंगेकर व युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर हे सभास्थळाला भेट देवून वारंवार सूचना करीत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सभास्थळी आतापासूनच पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता सभेसाठी येणार्या नागरिकांना उन्हाचा त्रास होवू नये याची काळजी आयोजकांच्या वतीने घेतली जात आहे.
युवकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी प्रचंड आकर्षण आहे. ही बाब लक्षात घेता महायुतीच्या वतीने वय वर्ष 18 ते 35 या वयोगटातील तरुणांना विशेष पास दिले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अगदी समोरच्या भागात तरुणांची बैठक व्यवस्था केली जाणार आहे. यामुळे तरुणांना मोदींचे विचार अधिक चांगल्या पध्दतीने ऐकता येणार आहेत.

देशाच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार ऐकण्यासाठी लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आठवले गट, कवाडे गट, मनसे, रासप, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महिला व तरुणांनी या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे.