◆देशात हॅन्डीकॅप लोकांसाठी कुस्तीचे वातावरण निर्माण करावे◆
●दूरदर्शनवरील सुरभी मालिकेचे सादरकर्ते सिध्दार्थ काक यांचे प्रतिपादन●
‘◆राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धेचे उद्घाटन◆
लातूर, दि.१ : कुस्ती खेळ परंपरेचा असून लोकांना जोडणारा आहे. प्रेम आणि स्नेहाचा खेळ असल्याने जीवनाला भावी दिशा देणारा आहे. डॉ. कराड यांनी कुस्तीला जीवनदान दिले. सध्या या देशात हॅन्डीकॅप लोकांसाठी कुस्तीचे वातावरण निर्माण करावे. असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेता व दूरदर्शनवरील सुरभी या प्रसिद्ध मालिकेचे सादरकर्ते सिध्दार्थ काक यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रामेश्वर (रुई), ता. जि. लातूर येथे संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज षष्ठीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड स्मृती-राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर स्पर्धा २०२४’ च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
हिंद केसरी पै. दिनानाथ सिंग, महाराष्ट्र केसरी पै. आप्पासाहेब कदम, त्रिमुर्ती केसरी कुस्ती सम्राट पै. अस्लम काझी हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी आमदार रमेशअप्पा कराड हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, रामेश्वरचे माजी सरपंच श्री. तुळशीराम दा. कराड, श्री. काशीराम दा. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, डॉ. हनुमंत कराड, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे प्रा.विलास कथुरे, क्रीडा संचालक प्रा. डॉ. पी.जी. धनवे आणि श्री. राजेश कराड उपस्थित होते.
सिध्दार्थ काक म्हणाले, कुस्ती असा खेळ आहे जो तंदुरूस्ती बरोबरच पैसा मिळवून देतो. तसेच यात कौशल्य आहे. गुंगा पहलवान या चित्रपटाला २०१५ मध्ये राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला. डॉ. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण क्षेत्रातही अपंगांसाठी कुस्तीचा प्रचार व प्रसार करून कुस्ती या खेळाची माहिती घरोघरी पोहोचवावी. त्यानंतर या देशात मोठ्या प्रमाणात पैलवानांची परंपरा सुरू होईल.
डॉ. कराड म्हणाले, महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा विसर कधीही पडू देऊ नये. सध्याचा काळ हा हिंदवी स्वराज्याची आठवण करून देणारा आहे. ही स्पर्धा गेल्या १६ वर्षापासून सुरू आहे. तसेच येथे सर्वधर्माचे मंदिर असल्याने हे गाव संपूर्ण जगभर मानवता तीर्थ म्हणून ओळखले जात आहे.
दिनानाथ सिंग म्हणाले, शिक्षण आणि कुस्ती खेळाला आश्रय देणारे डॉ. विश्वनाथ कराड हे पुनम का चांद आहेत ते सदैव खेळाडूंना जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. राजर्षी शाहू महाराजां नंतर कुस्ती या खेळाला जगविण्याचे कार्य डॉ. विश्वनाथ कराड करीत आहेत. ते आधुनिक काळातील शाहू महाराज आहेत. या मातीवर प्रेम करणारे आहेत. त्यासाठीच लाल मातीतील कुस्ती जगविण्यासाठी ते सतत प्रयत्न करीत आहेत.
असलम काझी म्हणाले, डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी शिक्षण आणि कुस्तीचा संपूर्ण भारत भर प्रचार आणि प्रसार केला आहे. आज ही लाल मातीतील कुस्ती पैलवानांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यासाठी कार्य करीत आहेत.
विलास कथुरे यांनी प्रस्ताविकेत कुस्ती संदर्भातील संपूर्ण माहिती दिली. तसेच या वेळी संपूर्ण महाराष्ट्रातून पैलवान आले आहेत. यात एकूण २०० पैलवान लाल मातीत उतरणार आहेत.
उद्घाटनाची कुस्ती लातूरचा रविराज लिपणकर आणि सोलापूरचा अभिजित यांच्यात झाली. या मध्ये सोलापूरचा अभिजित विजयी झाला. तसेच साताराचा लक्ष्मण सुळ आणि सोलापूरचा आशितोष गायकवाड यामधील स्पर्धेत आशितोष गायकवाड विजयी झाले.
प्रा. गोविंद जाधव यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. पी.जी. धनवे यांनी आभार मानले.