आमदार आवाडे यांच्या प्रयत्नांना यश; वीज सवलतीच्या अंमलबजावणीचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय
इचलकरंजी ( वृत्तसेवा )- प्रदीर्घकाळापासून प्रलंबित आणि यंत्रमाग व्यवसायाला नवसंजीवनी मिळण्यासाठी 27 अश्वशक्तीवरील यंत्रमागांना 75 पैशांची अतिरिक्त आणि 27 अश्वशक्तीखालील यंत्रमागांना प्रती युनिट 1 रुपयांची वीज सवलत देण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्या सुरु असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे
. या संदर्भातील महत्वपूर्ण निर्णय सोमवारी झालेल्या राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नामुळेच हा प्रश्न मार्गी लागला असून त्याचा अध्यादेश लवकरच जारी करण्यात येणार आहे. या निर्णयाने यंत्रमाग उद्योगात चैतन्य निर्माण झाले आहे.
आमदार प्रकाश आवाडे हे वस्त्रोद्योग मंत्री असताना त्यांच्या एक सदस्यीय समितीने शिफारस केलेल्या 23 कलमी पॅकेजमुळे संकटाच्या गर्तेतील वस्त्रोद्योगाला नवसंजीवनी मिळाली होती. परंतु, मागील काही वर्षापासून पुन्हा राज्यातील वस्त्रोद्योग पर्यायाने यंत्रमाग व्यवसाय विविध संकटातून मार्गक्रमण करीत होता. या यंत्रमाग व्यवसायाला उभारी मिळण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी सातत्याने शासन दरबारी प्रयत्न सुरुच ठेवले होते. प्रामुख्याने साध्या यंत्रमागाला प्रती युनिट 1 रुपयाची सवलत आणि 27 अश्वशक्तीवरील यंत्रमागाला 75 पैशांची अतिरिक्त सवलत या दोन्ही निर्णयांची प्रत्यक्षात अंमलजबाणी व्हावी यासाठी आमदार आवाडे यांचे सातत्याने प्रयत्नच सुरु होते.

राज्य शासनाने सन 2023 ते 2028 साठीचे नविन वस्त्रोद्योग धोरण जाहिर केले. पण त्यामध्ये कांही बाबींची तरतूद करणे आवश्यक असल्याने त्या संदर्भात आमदार आवाडे यांनी सर्वच वस्त्रोद्योग केंद्रातील आमदारांसह संबंधित यंत्रमागधारक संघटनांच्या प्रतिनिधींना घेऊन वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशीचर्चा केली होती. त्यानंतर समस्यांचा अभ्यास करुन उपाययोजना सुचविण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्री पाटील यांनी मंत्री नामदार दादाज भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार प्रकाश आवाडे, आमदार सुभाष देशमुख, आमदार रईस शेख, आमदार अनिल बाबर, आमदार प्रविण दरके यांची अभ्यास समिती गठीत केली. या समितीने महाराष्ट्रातील यंत्रमाग उद्योगाचा सविस्तर अभ्यास करून व वेगवेगळ्या संघटनांशी चर्चा करून उपाययोजनांचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सादर केला होता. तर मागील आठवड्यात कोरोची येथे झालेल्या कार्यक्रमावेळीही आमदार आवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वीज सवलत निर्णयाच्या अंमलबजावणीची मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन्ही सवलतींची अंमलबजावणी करण्याचे जाहीर केले होते.
अखेर आमदार आवाडे यांनी केलेल्या प्रयत्न आणि पाठपुराव्याचे फलित म्हणून सोमवारी झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत 27 अश्वशक्तीवरील यंत्रमागांना 75 पैशांची अतिरिक्त आणि 27 अश्वशक्तीखालील यंत्रमागांना प्रती युनिट 1 रुपयांची वीज सवलत देण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाने यंत्रमाग व्यवसायाला पुन्हा उभारी मिळाली असून या निर्णयाचे यंत्रमागाधारकांतून स्वागत केले जात आहे.
आण्णा, काय म्हणाले….
चार दिवसांपूर्वी कोरोची येथील माळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य असा कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमामध्ये आमदार प्रकाश आवाडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळ जावून कानात काहीतरी कुजबुजले असा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर जोरदारपणे व्हायरल झाला होता. तर आज झालेल्या वीज सवलत निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर आमदार आवाडे यांनी वीज सवलीतीचा निर्णय तातडीने घेऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत सांगितले होते की काय अशी चर्चा रंगली आहे.