18.4 C
Pune
Wednesday, December 25, 2024
Homeसामाजिक*संभाव्य पाणी टंचाई निवारण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे*

*संभाव्य पाणी टंचाई निवारण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे*

नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन
• अवैध पद्धतीने पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश
• पाणी टंचाई उपाययोजनांच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना

लातूर, दि. 6 ( वृत्तसेवा ): जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई विचारात घेवून सर्व संबंधित विभागांनी पाणी पुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करावे. आरक्षित पाणी साठ्याचा अवैध उपसा होवू नये, यासाठी तातडीने कार्यवाही करावी. यामध्ये हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या. तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

लातूर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत सुरु राहण्यासाठी प्रत्येक वार्डनिहाय पाणी पुरवठ्याचे नियोजन होणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याने पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक तयार करावे. शहरातील पाणी पुरवठ्याचे शासकीय स्त्रोत, जलवाहिनी यांचे सर्वेक्षण करून स्त्रोतांची सद्यस्थिती तपासावी. तसेच जलवाहिनीमधून पाण्याची गळती होणार नाही, याची दक्षता घ्यावी. प्रत्येक गुरुवारी पाणी टंचाईची आढावा बैठक घेवून कृती आराखड्याची अंमलबजावणी करावी. तसेच शहरामध्ये अवैध पद्धतीने पाणी उपसा करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या.

सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रांसह ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी यांनी सामान्व्यायाने काम करून पाणी टंचाई निवारणाच्या उपाययोजना हाती घ्याव्यात. पिण्यासाठी पाणी आरक्षित केलेल्या सिंचन प्रकल्पांमधून इतर कारणांसाठी पाणी उपसा होवू नये, याची खबरदारी घ्यावी. यामध्ये कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिला. तसेच ग्रामीण भागात गावनिहाय पाणी टंचाई कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी. प्रत्येक जलस्त्रोत कधीपर्यंत वापरात राहील, याची माहिती संकलित करून त्यानुसार नियोजन करावे. सर्व हातपंप कार्यान्वित राहतील, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालक शेतकऱ्यांना शुगर ग्रेसचे बियाणे वितरीत करण्यात आले. याबाबतचा आढावाही यावेळी घेण्यात आला. तसेच जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीवर बंदी घालण्यात आली असून त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी दिल्या. पाणी टंचाई निवारणासाठी तहसीलदार, गट विकास अधिकारी यांनी प्रत्यक्ष फिल्डवर जावून आढावा घेवून आवश्यक उपाययोजनांना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]