विद्यानंदजी सागर यांच्या काल्याच्या कीर्तनाच्या वेळी जनसागर उसळला
‘■’विठ्ठल माझा माझा माझा…मी विठ्ठलाचा ‘ या भजनावर बाबांसह साधुसंत, भाविकांनी नृत्याचा धरला फेर■
राधाकृष्ण सत्संग समितीने केला पूजनीय बाबांचा सत्कार
◆खासदार सुधाकर शृंगारे यांनी कथास्थळी येऊन घेतले बाबांचे दर्शन◆
लातूर :दि २१ (वृत्तसेवा)- वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार कथा, अखंड हरिनाम सप्ताहा नंतर काल्याचे कीर्तन होत असते .श्री श्री अष्टोत्तर शत कुंडात्मक अतिरुद्र महायाग एवं श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाची काल सांगता झाली असली तरी बाबांच्या काल्याच्या कीर्तनाने या सत्संगाची खऱ्या अर्थाने सांगता आज झाली असे म्हणावे लागेल .यावेळी कथा मंडपात जनसागर उसळला होता यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
लातूर नगरीतील राजीव गांधी चौकातील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात पाच एकर जागेमध्ये उभा करण्यात आलेल्या भव्य कथा मंडपामध्ये आज पूजनीय बाबांचे काल्याचे कीर्तन झाले .यावेळी अलोट गर्दी उसळली होती .यावेळी श्री श्री राधाकृष्ण सत्संग समितीच्या वतीने बाबांचा यथोचित सत्कार करण्यात आला. समितीचे अध्यक्ष हरिप्रसाद मंत्री, सचिव संजय बोरा ,तसेच नाथसिंह देशमुख ,राजेश्वर बुके ,चंद्रकांत बिराजदार ,अँड. प्रदीप मोरे ,मनीष आकनगिरे आदींनी बाबांचा पुष्पहार घालून सत्कार केला .
यावेळी बाबांनी ‘ याल तरी यारे यारे.. अवघे माझ्या मागे मागे,..आधी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी… हळू हळू चला.. कोणी कोणाशी न बोला… आधी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी … ‘ या तुकाराम महाराजांचा अभंग घेत पूजनीय विद्यानंदजी सागर बाबा यांनी काल्याचे कीर्तन केले. अत्यंत मांगल्यपूर्ण वातावरणात अष्टोत्तर शत कुंडात्मक अतिरुद्र महायाग आणि श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाची सांगता झाल्यानंतर ज्याप्रमाणे कथेला दिवसागणिक गर्दी उसळली होती ;तशीच गर्दी बाबांच्या आजच्या काल्याच्या कीर्तनाला देखील उसळली होती . यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
संत तुकाराम महाराज यांनी ४०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या या अभंगाची सत्यता आजही आपल्याला पाहावयास मिळते .आपण धन कमावण्याच्या मागे लागून धर्माला विसरत चाललेलो आहोत धन जरूर कमवा; परंतु एका विशिष्ट कालावधी पर्यंत आपण थांबायला हवे .धन कमवता कमवता आपण भौतिकतेला ,वासनेला बळी पडत चाललेला आहोत कोणाला पोटाची भूक आहे तर ,कोणाला धनाची भूक आहे, तर कोणाला वासनेची भूक आहे.धन कितीही कमवले , तरी आपण असंतुष्ट राहतो. विशिष्ट कालावधीत मध्ये आपण समाधानी राहायला शिकले पाहिजे .संसारामध्ये जास्त काळ रमायचे की पारमार्थिक सुख घ्यायचे हे आपण सुरुवातीला ठरवायला हवे. परमार्थामध्ये शुद्ध -सात्विक तत्त्वज्ञान दिलेले आहे. आणि पारमार्थ मधून खऱ्या अर्थाने आपल्याला आनंद मिळतो. हा आनंद आत्मिक असतो. भजन करणे ही आत्म सुखाची एक प्रमुख स्थिती असते; परंतु आपण धर्माच्या नावाने ,कथेच्या नावाने, कीर्तनाच्या नावाने व्यापार मांडलेला आहे. धर्माची दुकानदारी आपण चालवली आहे. धर्माचा व्यापार आपण बनवून टाकलेला आहे. पाखंडी माणसांनी धर्माचा बाजार केल्यामुळे धर्मक्षेत्रामध्ये काही गैरप्रकार निर्माण झालेले आहेत. भजनामध्ये ,कीर्तनामध्ये, कथेमध्ये आपण दुकानदारी चालवलेली आहे. हा भाग वेगळा असला तरी ज्ञान हे विकण्याचे साधन नाही. धार्मिक बनायचे असेल तर बाह्य रंगाचे वस्त्र टाकून द्या .भक्ती तुम्हाला करायची असेल तर पाखंड, ढोंग याचा त्याग करा .अध्यात्माचा बाजार म्हणून आपण परमार्थ करायला लागलो तर ते चुकीचे आहे. विद्वान तुम्हाला बनायचे असेल तर ज्ञानोबा तुकोबा रायासारखे विद्वान बना , धर्माचे पालन करायचे असेल तर पाखंडाचा त्याग करावा लागेल ,असा हितोपदेशही बाबांनी काल्याच्या कीर्तनामध्ये केला.
या देशाला गणवेशाची गरज नाही तर गुणवेशाची गरज आहे. संत बनण्यासाठी आपण प्रयत्न करतो परंतु चांगला माणूस बनण्यासाठी प्रयत्न करीत नाही. चांगला माणूस बनण्यासाठी गणवेशाची नव्हे तर गुणवेशाची गरज धर्म. हे बळजबरीने करण्याची गोष्ट नाही. प्रसन्नतेसाठी ,आत्मिक आनंद मिळण्यासाठी धर्म करा. अध्यात्म हे ध्येय असेल तर तुम्हाला योग्य रस्ता सापडेल.
याप्रसंगी बाबांनी म्हटलेल्या ‘विठ्ठल माझा माझा माझा …मी विठ्ठलाचा..’ या भजनावर उपस्थित मंडपातील साधू- संतांसह, स्त्री-पुरुष भाविकांनी नृत्याचा फेर धरला बाबांना देखील या नृत्यांमध्ये सहभागी होण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी असंख्य स्त्री-पुरुष भाविकांनी त्याचा आनंद लुटत भक्ती सागरात डुबून जाण्याचा अनुभव घेतला. लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी पूजनीय बाबांचे कथास्थळी येऊन दर्शन घेतले. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दुर्गाप्रसाद मोटे यांनी केले.