अष्टोत्तर शत (१०८) कुंडात्मक अतिरुद्ध महायाग
धर्म ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात
विविध प्रांतातील साधुसंतांची उपस्थिती
लातूर ;दि.४(वृत्तसेवा ) श्री श्री राधाकृष्ण सनातन सत्संग सेवा समितीच्या वतीने दि. 14 ते 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीत लातूरमध्ये श्री श्री अष्टोत्तर शत(108 )कुंडात्मक अतिरुद्ध महायाग( यज्ञ )आणि परमपूजनीय विद्यानंदजी महाराज बाबा यांच्या श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून, या निमित्त रविवारी धर्म ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
गातेगाव येथील श्री राधाकृष्ण आश्रमाचे पिठाधिपती परमपूजनीय विद्यानंदजी सागर महाराज (बाबा )यांच्या हस्ते पंचमुखी हनुमान मंदिर ,राजीव गांधी चौकातील 15 एकर जागेत उभारण्यात आलेल्या विशाल कथा मंडपात रविवारी विधिवत सोहळ्यात ,ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात धर्म ध्वजारोहण करण्यात आले .अत्यंत मंगलमय व धार्मिक वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास लातूर शहरातील हजारो स्त्री पुरुष भाविकांची गर्दी होती .
याप्रसंगी स्वामी ब्रह्मानंदजी परमहंस महाराज (राजस्थान ),स्वामी गोविंदानंद गिरीजी महाराज( हरिद्वार), स्वामी नित्यानंद गिरीजी महाराज (सिद्धाश्रम शिर्डी), स्वामी राघवानंद गिरीजी महाराज (राजस्थान ),स्वामी सोमेश्वर गिरीजी महाराज( त्रंबकेश्वर -नाशिक ),स्वामी सुनील भारतीजी महाराज (राजस्थान ),स्वामी बालकानंद गिरीजी महाराज (आंध्र प्रदेश ),स्वामी प्रेमानंदजी गिरीजी महाराज (मध्य प्रदेश), प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या मुख्य संचालिका नंदा बहेनजी, नगरसेवक चंद्रकांत बिरादार, हरिभाऊ मंत्री ,विशाल जाधव, नाथसिंह देशमुख, संजय बोरा ,शीतल मालू आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
मानव कल्याण आणि विश्वशांतीसाठी आयोजित या महायाग व श्रीमद भागवत कथेची जय्यत तयारी करण्यात आली असून ,दररोज सकाळी ८ वाजल्यापासून होम हवन आदी धार्मिक विधी आणि सायंकाळी ५ वाजता प.पू. विद्यानंदजी सागर महाराज बाबा यांची भागवत कथा होईल .यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून यज्ञ व कथेच्या यशस्वीतेसाठी समितीचे कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत.