माता – पित्याच्या सेवेसारखे पुण्यकर्म कोणतेच नाही : डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी
लातूर : आईचे महत्व नेहमीसाठी अबाधित आहेच. जगात माता – पित्याच्या सेवेसारखे पुण्यकर्म अन्य कोणतेच असू शकत नाही,असे प्रतिपादन काशीपीठाचे जगदगुरु श्रीश्रीश्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.
शुक्रवारी ,दि. २७ ऑक्टोबर रोजी लातूरचे ख्यातनाम उद्योजक श्रीकांत चंद्रशेखर हिरेमठ यांच्या मातोश्री शिवैक्य श्रीमती चंद्रकलाबाई चंद्रशेखर हिरेमठ यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते उपस्थितांना आशीर्वचन देत होते. आपल्या दिवंगत मातोश्रींच्या स्मरणार्थ समाधीस्थळी श्रीकांत हिरेमठ यांनी आपल्या अंकोलीच्या शेतात आईचे भव्य मंदिर उभारले आहे. या सोहळ्यास काशी जगदगुरूंसह औसाचे शांतीविरलिंग शिवाचार्य महाराजांसह पाच शिवाचार्य महाराजांचीही उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ‘ आठवणींचा ठेवा ‘ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. या पुस्तकामध्ये आपल्या आईंच्या विविध आठवणी लेखरूपात मांडण्यात आल्या आहेत.
जगात आईच्या प्रेमाची तुलना कशाशीही करता येत नाही. आई या एका शब्दात सारे काही येते. आई – मुलाच्या नात्यात प्रत्यक्षात काय घडते हे कोणालाही सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून तर आपल्याकडे स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे म्हटले जाते, असे सांगून डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी पुढे म्हणाले की, आज आपल्या दिवंगत आईचे समाधीमंदिर उभारून श्रीकांत हिरेमठ यांनी आईच्या ऋणातून अंशतः उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे. मुलगा आपल्या आईच्या आठवणीत मंदिराची उभारणी करतो, ही संकल्पनाच त्यांच्या परस्परातील आत्मिक जिव्हाळ्याची खोली किती खोलवर रुजली गेली आहे, हे दाखवून देते असे सांगून महास्वामींजींनी श्रीकांत हिरेमठ यांचे कौतुक करून त्यांना शुभाशीर्वाद दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ई .आर. मठवाले यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी आईचे महत्व विशद करतानाच प्रत्येक मुलाने आपल्या आई – वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे असे मत व्यक्त केले. पत्रकार संजय जेवरीकर यांनी आपले विचार व्यक्त करताना आईच्या प्रेमाची बरोबरी जगात कोणीही करू शकत नाही असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिवकांत स्वामी गुरुजी यांनी तर आभार प्रदर्शन श्रेया श्रीकांत हिरेमठ हिने केले. या सोहळ्यास लातूर जिल्ह्यातील भाविकांसह कर्नाटक – तेलंगाणातीलही भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
———————–