लातूर दि. 16 ( वृत्तसेवा ) : येथील तावरजा कॉलनीत फुग्यात हवा भरणाऱ्या सिलेंडरचा रविवारी स्फोट झाला. यामध्ये फुगे विक्रेता ठार झाला असून अकरा लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. जखमींवर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. ही घटना समजताच जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी रविवारी रात्री विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात जाऊन रुग्ण आणि नातेवाईक यांची भेट घेतली. तसेच त्यांनी जखमींवर उपचाराबाबत डॉक्टरांना सूचना दिल्या.
घडलेली घटना अत्यंत दुर्देवी असून जखमींवर डॉक्टर सर्वतोपरी इलाज करत आहेत. डॉक्टरांच्या टीमने तात्काळ उपचार सुरु केल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले. तर घटना घडल्यानंतर पोलिसांनीही ताबडतोब घटनास्थळी जावून जखमी बालकांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनीही फोनकरून रुग्णांची तब्येत जाणून घेतली असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा-ठाकूर यांनी सांगितले. पोलीस ह्या घटनेची चौकशी करीत असून अशा दुर्देवी घटना यापुढे घडू नयेत, यासाठी चौकशी अहवालानंतर जिल्हा प्रशासन निर्णय घेईल, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.