पत्रकारांच्या एकजुटीचा आवाज महाराष्ट्रभर घुमला :
पत्रकार संरक्षण कायदयाची राज्यभर होळी :
एस.एम.देशमुख यांनी मानले
राज्यातील पत्रकारांचे आभार
मुंबई : (. वृत्तसेवा) – महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा असतानाही त्याची कठोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ले पुन्हा वाढले आहेत.. त्यामुळे सर्वार्थाने कुचकामी ठरलेल्या या कायद्याची आज राज्यभर होळी करण्यात आली.. मुंबईत हुतात्मा चौकात कायद्याची होळी करण्याचा प्रयत्न करणार्या एस.एम.देशमुख यांच्यासह पन्नासाहून अधिक पत्रकारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.. मुंबईत मुंबई मराठी पत्रकार संघाजवळ पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली..राज्यात आंदोलन शांततेत पार पडले..आंदोलनास राज्यभर अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला..
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्यांची संख्या चिंता वाटावी एवढी वाढली आहे.. राज्यात चार वर्षात २२५ पत्रकारांवर हल्ले झाले असले तरी केवळ ३७ प्रकरणातच पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावले गेले.. चार वर्षात या कायद्यान्वये एकाही आरोपीला शिक्षा झालेली नाही.. त्यामुळे कायद्याचा धाक उरला नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.. पाचोरयात स्थानिक आमदार किशोर पाटील यांनी पत्रकारास शिविगाळ केली आणि नंतर आपल्या गुंडाकरवी पत्रकारावर हल्ला चढविला.. ही चित्रफीत महाराष्ट्राने पाहिली “असतानाही आमदारांवर किंवा त्यांच्या हल्लेखोर गुंडांवर देखील पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावले गेले नाही .. असे प्रकार वारंवार आणि सर्वत्र घडत असल्याने पत्रकारांवरील हल्ले पुन्हा वाढले आहेत..
हा कायदाच कुचकामी ठरला असल्याने या कायद्याची आज महाराष्ट्रभर होळी करण्यात आली… दुपारपर्यंत मुंबईसह राज्यातील धुळे, अहमदनगर, बीड, नाशिक, बुलढाणा, सातारा,जालना, रत्नागिरी, औरंगाबाद, नांदेड, पालघर, रायगड, सोलापूर, ठाणे, पुणे, हिंगोली परभणी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, वाशिम, लातूर,कोल्हापूर अकोला, सांगली यवतमाळ, वर्धा, नागपूर आदी जिल्ह्यात व राज्यभरातील २५० तालुक्यात आंदोलन झाली आहेत..
राज्यातील अकरा प्रमुख पत्रकार संघटनांनी केलेल्या या आंदोलनानंतर तहसिलदार, जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी, पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले जलदगती न्यायालयामार्फत चालविले जावेत आणि पाचोर्याचे आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत..
मुंबईत पत्रकारांना अटक
मुंबईत हुतात्मा चौकात आंदोलन करणारया एस.एम देशमुख, किरण नाईक, शरद पाबळे, दीपक कैतके, राजा आदाटे, नरेंद्र वाबळे, संदीप चव्हाण, दीपक पवार, राजन पारकर,
सतीश माळवदे, विनायक सानप, विशाल परदेशी यांच्यासह पन्नासवर पत्रकारांना आज पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली ..तत्पुर्वी एस.एम.देशमुख, संदीप चव्हाण, शरद पाबळे यांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले..
मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या बैठकीस मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई प्रेस क्लब, मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए, बीयुजे, क्राईम रिपोर्टर असोशिएशन , पाॅलिटिकल फोटो जर्नलिस्ट असोशिएशन, बॉम्बे न्यूज फोटोग्राफर असोशिशन, मुंबई महानगर पालिका पत्रकार संघ, म्हाडा पत्रकार संघ, उपनगर पत्रकार संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.. एस.एम देशमुख यांनी पाचोर्यातील घटनेची पार्श्वभूमी विषद केली.. नरेंद्र वाबळे, गुरबीरसिंग आदिंनी आपले विचार मांडले.. यावेळी किशोर पाटील यांना अटक करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.. तेथेच नंतर पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली.
आजचे आंदोलन यशस्वी केल्याबद्दल एस.एम.देशमुख यांनी सर्व पत्रकार संघटना आणि पत्रकारांचे आभार मानले आहेत..