प्रा. हरी नरके यांच्या निधनाने प्रबोधन चळवळीची मोठी हानी
प्रसाद कुलकर्णी यांचे मत
इचलकरंजी ; -( वृत्तसेवा ) – महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत, लेखक ,वक्ते पुरोगामी चळवळीचे खंदे मार्गदर्शक आणि प्रबोधन चळवळीतील आमचे ज्येष्ठ स्नेही प्रा. हरी नरके यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने प्रबोधन चळवळीची मोठी हानी झालेली आहे. फुले, शाहू ,आंबेडकर ही विचार परंपरा घेऊन कार्यरत असणाऱ्या सर्वांनाच हा जबर धक्का आहे. महात्मा फुले यांच्या सत्यशोधनाचा विचार, शाहू राजांचा समता विचार आणि डॉ.आंबेडकर शिल्पकार असलेल्या भारतीय राज्यघटनेचे तत्त्वज्ञान सर्वसामान्यां मध्ये रुजवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करणे हीच हरी नरके यांना खरी आदरांजली ठरेल.माझा त्यांच्याशी गेली ३०-३५ वर्षे सततचा स्नेह व संवाद होता. विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या वारंवार भेटीही होत असत. हरी नरके यांना समाजवादी प्रबोधिनी परिवाराची भावपूर्ण आदरांजली ,असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले .
प्रसाद कुलकर्णी प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हणतात ,व्याख्यानाच्या निमित्ताने हरी नरके यांनी महाराष्ट्र व भारतभर सतत भ्रमंती करत फुले ,शाहू, आंबेडकर यांचा विचार रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लिहिलेली व संपादित केलेली पुस्तके हे एक महत्त्वाचे वैचारिक व सांस्कृतिक विचारधन आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचे समन्वयक म्हणून त्यांनी केलेले काम महत्त्वाचे आहे. त्यांनी महात्मा फुले समग्र वांग्मय समिती, समता परिषद, भांडारकर संशोधन संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, सावित्रीबाई फुले अध्यासन अशा विविध ठिकाणी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. महाराष्ट्रातल्या प्रबोधन ,पुरोगामी, विवेकवादी चळवळीचे ते खंदे मार्गदर्शक होते. अनेकांशी त्यांचा ऋणानुबंध होता. समाज माध्यमांवर अतिशय सक्रिय असणारे हरी नरके गेले काही महिने प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त होते. योग्य उपचारानंतर ते आजारावर मात करून बाहेर पडतील याची खात्री असतानाच ते अचानक कालवश झाले. सध्याच्या अस्वस्थ वर्तमानामध्ये त्यांच्यासारख्या विचारवंताचे जाणे फार मोठी पोकळी निर्माण करणारे आहे. महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेतील या बिनीच्या शिलेदाराचे आणि आमच्या ज्येष्ठ मित्राचे अकाली निधन मोठे चटका लावणारे आहे. प्रा.हरी नरके यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. आज झालेल्या इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या बैठकीतही प्रा. हरी नरके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.