हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवानिमित्त
बाबासाहेब परांजपे फाऊंडेशनच्या वतीने अभिवादन यात्रा
लातूर : लातूर : हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘बाबासाहेब परांजपे फाऊंडेशन,’ लातूरच्या वतीने या लढ्यात ज्या ठिकाणी महत्त्वपूर्ण घटना घडल्या. त्या ठिकाणी गुरुवार, दि. १० ऑगस्ट २०२३ रोजी अभिवादन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेत आपल्या परिसरात महत्वपूर्ण घटना घडलेल्या ठिकाणांना भेट देणे व तेथील हुतात्मा स्मारकांना अभिवादन करणे व स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करणे, वृक्ष लागवड असे अनेकविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल तेरा महिने व दोन दिवसांनी आपल्या संस्थानात मुक्तीची पहाट उगवली. आपल्या संस्थानात आर्य समाज तसेच स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद स्टेट कॉंग्रेसने अभूतपूर्व लढा दिला. या लढ्यात तत्त्कालीन धाराशिव व बिदर जिल्ह्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे. या भागात सर्वसामान्य लोकांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता निजामी पोलीस व रझाकार यांच्या विरुद्ध लढा दिला.सर्वसामान्य जनतेच्या असीम त्यागातून आपणास स्वातंत्र्य मिळाले.
या यात्रेच्या पहिल्या टप्प्यात गुरुवार, दिनांक १० ऑगस्ट २०२३ रोजी किल्लारी, गुंजोटी, नळदुर्ग व हिप्परगा (रवा) या ठिकाणी ही अभिवादन यात्रा जाणार आहे. या यात्रेची सुरुवात लातूर येथील हुतात्मा स्मारकास अभिवादन करून होणार आहे,यावेळी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
निजाम राजवटीत लातूरच्या गंजगोलाईच्या तिरंगा फडकवणारे शामराव उमाटे किल्लारीकर व रघुवीर शिंदे हे भूमिगत झाल्यामुळे पोलिसांना सापडले नाहीत. तेव्हा निजामी पोलिसांनी किल्लारीतील माधवराव बिराजदार, यादवराव पाटील, रामराव बळी भोसले व महादप्पा दलाल येळी गावाजवळील (ता. उमरगा) पुलाखाली गोळ्या घालून ठार केले.
इ.स.१९३७ मध्ये अनेक संतापजनक घटना घटल्या. मुक्तिसंग्रामातील अनन्वित अत्याचाराचे सत्र गुंजोटी येथील आर्यसमाजाचे कार्यकर्ते वेदप्रकाश यांच्या हत्येपासून सुरु होते. २३ फेब्रुवारी १९३७ मध्ये गुंजोटी येथे वेदप्रकाश यांची हत्या झाली. वेदप्रकाश हे हैदराबाद मुक्तिसंग्रामातील पहिले हुतात्मा.
उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा येथे व्यंकटराव देशमुख व अनंतराव कुलकर्णी यांनी १९२१ मध्ये राष्ट्रीय शाळा स्थापन केली होती. या शाळेने खऱ्या अर्थाने हैदराबाद मुक्तीसंग्रामाला उर्जा व कार्यकत्यांची फळी पुरवली. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ या शाळेत जवळपास सहा वर्ष मुखाध्यापक म्हणून कार्यकरत होते. येथेच स्वामीजींनी १४ जानेवारी १९३२ रोजी संन्यास घेतला. तेव्हापासून त्यांचे नाव स्वामी रामानंद तीर्थ असे झाले. अशा या महत्वपूर्ण स्थळांना भेटी देऊन अभिवादन करणे, हा या अभिवादन यात्रेचा मुख्य उद्देश आहे असे बाबासाहेब परांजपे फाउंडेशनचे सचिव भाऊसाहेब उमाटे यांनी सांगितले. आगामी काळात निलंगा , औराद.(श.), गोर्टा, आट्टर्गा, हत्तीबेट, बोटकुळ, अंबुलगा, कौळखेड, घोणसी, तिरुका, उदगीर , रेणापूर , बर्दापूर , अंबेजोगाई अशा अनेक ऐतिहासिक ठिकाणी जाणार आहे. या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन एड. मनोहरराव गोमारे, प्राचार्य हरिष देशपांडे , भाऊसाहेब उमाटे, सूर्यकांत वैद्य, शिवशंकर लातूरे, डॉ.बी.आर.पाटील, सुरेंद्रसिंह चव्हाण, माणिकराव कोकणे, रमेश चिल्ले, डॉ.अनिल जायभाये,डॉ.मायाताई कुलकर्णी, प्रतिभा गोमसाळे यांनी केले आहे.
————————————.