ऊस उत्पादन वाढीसाठी मिळणार मार्गदर्शन,
शेतक-यांना उपयुक्त माहिती
रेणापूर : प्रतिनिधी महाराष्ट्रात ऊसाची व साखरेची उत्पादकता वाढविण्यासाठी ऊस शेतीबाबत आधुनिक तंत्रज्ञान शेतक-यापर्यंत पोहचविणे आणि त्याचा वापर प्रत्यक्ष शेतीमध्ये होणे काळाची गरज असल्याने वसंतदादा साखर संस्थेतर्फे ऊस उत्पादक शेतक-यासाठी दि.११ जुलै २०२३ ते १४ जुलै २०२३ च्या दरम्यान ‘ऊस शेती ज्ञानयाग’ रहिवाशी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रशिक्षणासाठी कार्यक्षेत्रातील ३० ऊस उत्पादकांना पाठविण्यात आले असून आणि यापुढेही प्रशिक्षण शिबीरास ऊस उत्पादकांना पाठविण्याचा प्रयत्न केला जाईल. या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रामुख्याने उसाचे उत्पादन व साखर उतारा वाढीसाठी जमीनीची निवड, सेंद्रीय तसेच हिरवळींचे खतांचा वापर, योग्य ऊस जातीची निवड, मजूर कमतरतेचा विचार करुन दोन ओळीतील व रोपांतील अंतर रासायनीक खत व्यवस्थापन, ठीबक संचाचा वापर करुन पाण्याची बचत व संचाची देखभाल, रोग कीड व्यवस्थापन अशा सर्व विषयांचे मार्गदर्शन मिळणार आहे़ त्यांना मिळालेल्या ज्ञानाचा आपल्या ऊस शेतीमध्ये उपयोग करावा व इतर सभासदांना त्याबाबत मार्गदर्शन करावे असे अवाहन करण्यात आले आहे़ या प्रशिक्षणास कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाईस चेअरमन तथा अध्यक्ष ऊस विकास समिती अनंतराव देशमुख व माजी चेअरमन तथा संचालक यशवंतराव पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्या.
यावेळी कारखान्याचे संचालक धनराज देशमुख, चंद्रकांत सूर्यवंशी, संजय हरीदास, संग्राम माटेकर, अनिल कुटवाड, स्रेहल देशमुख, तसेच कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी एस. एस. भोसले ऊस विकास अधिकारी एस. डी. जाधव व शेतकी विभागातील कर्मचारी उपस्थित होते.