लातूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समितीचे संस्थापक अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांच्या सक्षम व दिशादर्शक नेतृत्वाखाली भारत राष्ट्र समिती भविष्यात महाराष्ट्रात नक्कीच सत्ता काबीज करेल , असा विश्वास समितीचे महाराष्ट्राचे मुख्य समन्वयक माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी शनिवारी लातुरात पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
माजी आमदार धोंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी लातूरच्या डॉ. भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात भव्य पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे आयोजक सुशील सुरेशराव घोटे पाटील हे होते. शहर व जिल्ह्यातील विविध पक्ष – संघटनांच्या एकूण ३०० हुन अधिक पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस मध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना धोंडगे यांनी तीन महिन्याच्या अल्पावधीत महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व २८८ विधानसभा मतदार संघात एकूण १९ लाखांहून अधिक पदाधिकारी – कार्यकर्ते बीआरएसशी जोडले गेल्याचे स्पष्ट केले. बीआरएसने राज्यात अजून पक्ष सदस्यता नोंदणी अभियान सुरु केलेले नाही. असे असतानाही बीआरएसकडे लोकांचा वाढता कल आणि मिळणारा प्रतिसाद पाहून महाराष्ट्रातील अनेक प्रस्थापित नेत्यांची झोप उडाली आहे. बीआरएसकडे तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात आकृष्ट होत आहे, ही अत्यंत महत्वाची बाब असल्याचे सांगून धोंडगे पुढे म्हणाले की, तेलंगाणामध्ये के. चंद्रशेखर राव यांनी अत्यंत कमी कालावधीत जे आमूलाग्र बदल घडवून आणले, ते अकल्पनीय आहेत. तेलंगाणा हे देशातील असे एकमेव राज्य आहे जेथे शेतकऱ्यांना २४ तास वीज मोफत दिली जाते. शेतकऱ्यांसाठी विजेची ही संकल्पना पूर्णत्वास नेण्याकामी अडथळा ठरणाऱ्या आठ आयएएस अधिकाऱ्यांना त्यांनी बाजूला केल्याचेही धोंडगे यांनी नमूद केले.
तेलंगणा सरकारने कृषी आणि कृषीशी संबंधित सर्व क्षेत्रांना चालना देण्याचे काम केले आहे. वृद्ध, विधवा, निराधार महिला, बिडी कामगारांना दरमहा २ हजार १६ रुपये तर अपंगांना ३ हजार १६ रुपये उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक निवासी गुरुकुलांच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काचा भरणाही सरकार करते. त्यामुळे सर्वांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होत आहेत. या सर्व बाबी महाराष्ट्रात किमान या घडीला तरी दिल्या जाताना दिसत नाहीत. के.चंद्रशेखर राव हे अत्यंत प्रतिभावान नेते असून ते पंतप्रधान पदाच्या पात्रतेचे असल्याचे सांगून धोंडगे यांनी महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीत बीआरएस लोकसभेच्या सर्वच्या सर्व ४८ जागा स्वबळावर लढविणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार मनोहर पटवारी,वसंतदादा शेटकार, सतिश शिंदे, वांगे, प्रताप भोसले, सिद्धेश काळे, सय्यदोद्दीन सय्यद यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.