ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांची माहिती
सोलापूर, दि. 18 मे, 2023- महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-2.0’ या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील कृषी फिडर सौर ऊर्जित करुन त्या भागातील शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी दिली. सौर कृषी वाहिनी योजनेला गतिमान करण्यासाठी त्यांनी गुरुवारी (दि.18) सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात महावितरण, महसूल, वनविभाग, भूमिअभिलेख व संबंधित विभागांची एकत्रित आढावा बैठक घेतली.
या बैठकीला प्रधान सचिव आभा शुक्ला यांचेसह ऊर्जा विभागाचे अवर सचिव नानासाहेब ढाणे, प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, अधीक्षक अभियंता (सोलापूर) संतोष सांगळे, निखील मेश्राम (मुंबई), महापारेषणचे अधीक्षक अभियंता आर.टी. शेळके, भूमिअभिलेखचे जिल्हा अधीक्षक त.ल. गिडमणी, वनविभागाचे बाबा हाके, महानिर्मितीचे कार्यकारी अभियंता एस.एम. सोनवणे यांचेसह इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
यावेळी बैठकीला संबोधित करताना प्रधान सचिव म्हणाल्या, ‘शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी शासनाने ‘डिसेंबर 2025’ डेडलाईन ठेवली आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे. या सौर प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनी ताब्यात घेण्याकरिता सर्व विभागाने विहित कालमर्यादेत काम करणे आवश्यक आहे. 22 ते 29 मे 2023 या कालावधीमध्ये सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ योजनेत सहभागी होण्याचा ठराव घ्यावा. ज्या ग्रामपंचायती स्वयंस्फूर्तपणे सहभागी होतील त्यांना शासनाकडून प्रोत्साहन म्हणून प्रतिवर्ष 5 लाख प्रमाणे तीन वर्षात मिळून 15 लाखाचा निधी दिला जाणार आहे. तर ज्या गावात सरकारी जमीनी उपलब्ध नाहीत त्याठिकाणी शेतकऱ्यांच्या पडीक जमीनी 30 वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर घेतल्या जाणार आहेत. या जमीनीला महावितरणमार्फत प्रति एकर, प्रतिवर्ष 50 हजार रुपये भाडे दिले जाणार असून, त्यामध्ये दरवर्षी 3 टक्के वाढ केली जाईल. या करिता महावितरणने लँड बँक पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलवर माफक नोंदणी शुल्क भरुन शेतकरी आपली जमीन महावितरणला भाड्याने देऊ शकतात.’
महावितरणला सर्वोतोपरी सहकार्य करणार- जिल्हाधिकारी ठोंबरे
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ योजना गतिमान करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार दररोज सायंकाळी सहा वाजता व्हीसीच्या माध्यमातून तालुकापातळीवर संवाद साधतात. यापुढे प्रत्येक तहसील कार्यालयातील एका नायब तहसीलदार यांचेकडे या योजनेची जबाबदारी सोपविण्यात येईल. जेणेकरुन तहसीलदार दौऱ्यावर किंवा सुटीवर असताना कामे रखडली जाणार नाहीत. तसेच जमीनी हस्तांतरणासाठी भूमिअभिलेख मार्फत तातडीने मोजणी करण्यात येईल. याकामी गाव कामगार तलाठीसुद्धा मदत करतील.
फोटो ओळी – सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला. समवेत प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांचेसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी दिसत आहेत.