अकालसेनेसह समाजबांधवांची निवेदनाद्वारे पोलीस अधिक्षकांकडे मागणी
लातूर/प्रतिनिधीः– लातूर शहरातील म्हाडा कॉलनीत राहणारे हरजितसिंग टाक यांच्या घरावर हल्ला करून दि. 8 मे 2023 रोजी निघृण हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी हरजितसिंग टाक यांची पत्नी निताकौर हरजितसिंग टाक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवेकानंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 19 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. मात्र अद्यापर्यंत या गुन्ह्यातील कांही आरोपी फरार असून त्यांना तात्काळ अटक करून सर्व आरोपींच्या विरोधात मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी अखिल भारतीय अकालसेना यांच्यासह समाजबांधवांनी निवेदनाद्वारे पोलीस अधिक्षक यांच्याकडे केलेली आहे.
हरजितसिंग टाक हे गेल्या दहा ते अकरा वर्षापासून लातूर येथील म्हाडा कॉलनीत रहात होते. मोलमजुरी करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणार्या हरजितसिंग टाक यांच्या घरावर दि. 8 मे 2023 रोजी हल्ला करून त्यांची निघृण हत्या करण्यात आली. सदर हत्या याच परिसरात राहणार्या सद्दाम मुस्ताक फारूकी व त्यांच्या सहकार्यांनी केली असल्याचा आरोप करण्यात येऊन त्यांच्या विरोधात विवेकानंद पोलीस ठाण्यात हरजितसिंग टाक यांच्या पत्नी निताकौर हरजितसिंग टाक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने पोलीसांनी तपास करून अद्यापर्यंत 19 आरोपींना अटक केलेली आहे. मात्र अद्यापही या गुन्ह्यात सहभागी असलेल्या जवळपास आठजण फरार आहेत. तसेच कांही जणांची नावे या खुन प्रकरणात समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. त्या अनुषंगानेच या फरार आरोपींना अटक करून ज्यांची नावे या गुन्ह्यामध्ये समाविष्ट नाहीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच या सर्व आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी अकालसेनेसह समाजबांधवांनी निवेदनाद्वारे पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांच्याकडे केलेली आहे. विशेष म्हणजे या सर्व आरोपींच्या विरोधात मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. या गुन्ह्या प्रकरणी फिर्यादी असलेल्या हरजितसिंग टाक यांच्या पत्नी निताकौर हरजितसिंग टाक यांना फरार आरोपी पासून दगाफटका होण्याची शक्यता असल्याने टाक परिवारास पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणीही या निवेदनाद्वाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.
या निवेदनावर नांदेड येथील सचखंड गुरुद्वाराचे माजी सचिव रविंद्रसिंग बुंगई, शिकलकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ठाकुरसिंग बावरी, सचिव बलसिंग बावरी, पुणे येथील शहित भगतसिंग जीवनरक्षक फाऊडेशनचे अध्यक्ष डॉ. बच्चूसिंग टाक, शिवसेनेचे भामडासिंग जुन्नी, अकालसेनेचे अध्यक्ष गुलजितसिंग जुन्नी, सोलापुरेच सामाजिक कार्यकर्ते झलकसिंग कलानी, सोलापूरचे तिलकसिंग कलानी , राष्ट्रवादी काँग्रेसचे जयसिंग टाक यांच्यासह मंगलसिंग जुन्नी, जगबीरसिंग टाक, नानरकसिंग टाक, लक्ष्मणसिंग बावरी, मनजितसिंग जुन्नी जंगीरसिंग जुन्नी, सिंकदरसिंग टाक, चंदनसिंग जुन्नी राजसिंग जुन्नी, हरजितलसिंग टाक, कारकुनसिंग टाक आदींसह समाजबांधवांच्या स्वाक्षर्या आहेत.