लातूर;दि.१५ (प्रतिनिधी ) –लातूर तालुक्यातील बोरगाव काळे येथील श्री राधाकृष्ण मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रमानिमित्त बोरगाव काळे येथे आयोजित एकादश कुंडात्मक महाविष्णू याग व गातेगाव येथील श्री राधाकृष्ण आश्रमाचे पिठाधिपती पूजनीय विद्यानंदजी सागर महाराज (बाबा ) यांच्या श्रीमद् भागवत कथा एवं अखंड हरिनाम सप्ताहाची नुकतीच काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली.
बोरगाव काळे येथील श्री राधाकृष्ण भक्ती प्रेम धाम येथे दि. ७ मार्च ते १४ मार्च या २०२३ या कालावधी श्रीमद् भागवत कथा, कीर्तन , गाथा भजन ,होम हवन ,हरिपाठ ,अखंड हरिनाम सप्ताह आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राधाकृष्ण संस्थांचे हभप अमोल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही कथा व श्री एकादश कुंडात्मक महाविष्णूयाग आयोजित करण्यात आला होता.पैठण येथील सुरेश शिवपुरी यांनी यज्ञाचे पौरोहित्य केले. या सर्वच कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला. बोरगाव काळे पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमाचा व भागवत कथेचा लाभ घेतला .तसेच सात दिवसात जवळपास ४० हजाराहून अधिक भाविकांनी अन्नदानाचा, महाप्रसादाचा लाभ घेतला.
पूजनीय विद्यानंदजी सागर महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या भागवत कथेची व यज्ञाची सांगता झाली . आपल्या अमोघवाणीने बाबांनी काल्याच्या कीर्तनात अनेक उदाहरणे व दाखले देत भावी भक्तांना मंत्रमुग्ध केले. टाळ मृदंगाच्या निनादात भाविकांनी तल्लीन होत '' विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा " या अभंगावर ताल धरत नृत्य केले पूजनीय बाबांसह देशभरातून आलेल्या अनेक साधुसंतांनी या भक्तीमय नृत्यात सहभाग नोंदला .
बोरगाव काळे येथे गेल्या सात दिवसापासून चालू असलेल्या श्री एकादश कुंडात्मक महाविष्णूयागाची पूर्णाहुती झाली. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार काल्याचे किर्तन हे होत असते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूजनीय विद्यानंदजी सागर महाराज यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन लाभले असे अमोल महाराज शास्त्री यांनी विनम्रतेने सांगितले .त्यांच्याशिवाय हे पवित्र कार्य सफल होऊ शकले नसते असेही ते म्हणाले .
याप्रसंगी देशभरातून साधुसंत उपस्थित झाले होते. यामध्ये आंध्रप्रदेशातील सामलकोट येथील स्वामी बालकानंदजी महाराज , स्वामी ब्रह्मानंदजी गिरी महाराज, झाशी येथील स्वामी राजेश्वरानंदजी महाराज, मध्यप्रदेशातील स्वामी पूर्णानंदजी सरस्वती महाराज तसेच शिर्डी येथील स्वामी नित्यानंद गिरीजी महाराज , तेलंगणा येथील स्वामी विष्णू देवानंदजी, ओंकारेश्वर येथील स्वामी अमर आनंदजी ,स्वामी दिव्यानंदजी महाराज आदी साधू महंत यावेळी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती .त्यामध्ये सत्संग समिती, यज्ञ समिती, भोजन समिती ,जल व्यवस्थापन समिती आदी समित्यांचा समावेश होता .बोरगाव परिसरातील अनेक भावी भक्तांनी विविध समित्यांमध्ये सहभाग नोंदवत श्रमदान केले. सगळे धार्मिक कार्यक्रम गातेगाव आश्रमातील व्यवस्थापक ह भ प महादेव महाराज देशमुख गोंदेगावकर , ह भ प हनुमंत महाराज बोरगाव काळे, ह भ प बाळू महाराज खरात शिर्डी, भगवानराव देशमुख , ज्ञानेश्वर देशमुख, नवनाथ काळे, विद्यमान सरपंच दीपक काळे ,नागोराव काळे ,सदाशिव काळे तसेच राधाकृष्ण भक्ती प्रेम धाम संस्थेतील स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.