स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज,26 फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी आहे.त्या निमित्ताने हा विशेष लेख.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन.
– संपादक
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना आपल्यातून जाऊन 57 वर्षे झाली आहेत. पण जसजसा काळ पुढे सरकत आहे, तसतसे त्यांचे विचार, कार्य हे किती दूरदृष्टीचे होते, याची आपणास पदोपदी जाणीव होत आहे.
सावरकरांच्या जीवनाचा एक अत्यंत महत्वाचा पैलू म्हणजे त्यांची पत्रकारिता होय. सावरकरांची पत्रकारिता हि केवळ साधीसुधी पत्रकारिता नव्हती तर ती अत्यंत जाज्वल्य पत्रकारिता होती. परिस्थितीवश त्यांना स्वत:चे वृत्तपत्र काढता आले नाही. पण म्हणून गप्प न बसता, त्यांनी तत्कालिन अनेक वृत्तपत्रांतून आपले परखड व दूरदृष्टीचे विचार वेळोवेळी मांडले. काही प्रसंगी आपले विचार त्यांनी पत्रके प्रकाशित करुनही मांडले आहेत. ही त्यांची पत्रके म्हणजे सुद्धा पत्रकारिताच होय.
बालवयातच पत्रकारिता
सोमवार, 28 मे 1883 रोजी नाशिक जवळ भगूर गावी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. तेथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले.
बालपणापासूनच स्वातंत्र्यवीरांनी आपले प्रखर विचार मांडण्यासाठी लेखणीचा आधार घेतला होता.
नाशिकला माध्यमिक शाळेत शिकत असतानाच
“हिंदू संस्कृतीचा गौरव” या शीर्षकाखाली त्यांनी “नाशिक वैभव” या वृत्तपत्रात दोन भागात दोन अंकात लेख लिहीले होता.
राजा सातवा एडवर्ड यांच्या राज्यारोहण समारंभाच्या सुमारास 1901 साली एक सभा झाली होती.
या सभेच्या अध्यक्षांनी
“एडवर्ड हे आपले खरोखरीच बाप आहेत ” असे उद्गार काढले होते. ही सभा संपल्यानंतर अल्पावधीतच खोचक, धारदार प्रश्न विचारणारी पत्रके फडकली. या पत्रकात म्हटले होते “एडवर्ड जर तुमचा बाप आहे, तर तुमचे वडील तुमच्या मातुश्रीचे कोण ?”
महाविद्यालयातही पत्रकारिता
सावरकर डिसेंबर 1901 मध्ये मॅट्रिक झाले. जानेवारी 1902 मध्ये त्यांनी पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. या महाविद्यालयात त्यांनी समविचारी तरुणांचा एक प्रभावी गट स्थापन केला. या गटाने
“आर्यन विकली” या नावाचे एक हस्तलिखित साप्ताहिक चालू केले. देशभक्ती, साहित्य, इतिहास, विज्ञान अशा अनेक विषयांवर सावरकरांनी या साप्ताहिकातून शैलीदार, उद्बोधक लेख लिहिले. त्यातील विचार प्रवर्तक लेखांना पुण्याच्या वृत्तपत्रांमध्येही स्थान मिळाले.
यापैकी एक उत्कृष्ट लेख म्हणजे “सप्तपदी” हा होय. या लेखात त्यांनी “परतंत्र राष्ट्र आपली उत्क्रांती करुन घेत असताना कोणकोणत्या टप्प्यांमधून जात असते” याचे विवेचन केलेले आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी “काळ” वृत्तपत्रात (संपादक शिवरामपंत परांजपे) उपसंपादक म्हणून एवढेच नाही तर छापखान्यात जुळारी म्हणूनही नोकरी करण्याची इच्छा दर्शविली होती. पण या विनंतीला अनुकूल उत्तर आले नाही. दरम्यान सावरकरांच्या सासऱ्यांनी मदतीचे आश्वासन दिल्याने ही कल्पना आपोआप मागे पडली.
सावरकरांनी 1902 साली “काळ” वृत्तपत्रात लिहिले होते “हिंदूस्थानचे दारिद्रयास व सर्व प्रकारचे अनास्थेस कारण हिंदू लोक होत.परंतु, जर कधी त्यांना वैभवाचे दिवस हवे असतील तर त्यांनी हिंदूच राहिले पाहिजे.” भविष्याचा वेध घेणारे असेच हे विचार होत.
डिसेंबर 1905 मध्ये पदवी संपादन केल्यावर सावरकर कायद्याचा अभ्यास करण्यासाठी मुंबईला गेले. कायद्याचा अभ्यास करतानाही मुंबईत त्यांनी प्रचाराचे कार्य सुरुच ठेवले. ते “विहारी” या मराठी साप्ताहिकात लेख लिहू लागले. त्यांनी ते पत्र अभिनव भारतचे मुखपत्र बनविले. 1906 साली बंगालमध्ये चालू झालेल्या “युगांतर” या जहाल समविचारी साप्ताहिकाप्रमाणेच “विहारी”चा खपही तडाख्याने वाढू लागला.
इंग्लंडमधून पत्रकारिता
युरोपात जाऊन अभ्यास करु इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी लंडनमध्ये राहात असलेल्या पंडित श्यामजी कृष्णवर्मा यांनी काही शिष्यवृत्त्या देऊ केल्या. सावरकरांचा अर्ज, अर्जासोबतचे लोकमान्य टिळकांचे प्रशस्तीपत्र आदींचा विचार होऊन सावरकरांना ही शिष्यवृत्ती मिळाली.
9 जून 1906 रोजी त्यांनी “पर्शिया” बोटीने मुंबई बंदर सोडले.
लंडन मध्ये गेल्यावर तेथील समाजाचा, संस्कृतीचा सावरकरांनी स्वत:वर प्रभाव पडू दिला नाही. उलट आपले राष्ट्रकार्य ते अधिक खंबीरपणे करु लागले. भारतासाठी होमरुल ची मागणी करणारी पुस्तिका प्रकाशित केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाने सेनापती बापट यांना मिळणारी सर मंगलदास नथूभाई शिष्यवृत्ती बंद केली.यावर सावरकरांनी आपल्या
“लंडनच्या बातमीपत्रात” तिखट प्रश्न विचारला होता की, “स्वदेशाने गुलामगिरीत पडावे असे म्हणेल, त्यासच ही माझी शिष्यवृत्ती द्यावी,अशी एखादी अट मंगलदास नथुभाईंनी शिष्यवृत्ती ठेवते वेळी घातली होती काय ?”
लंडनमध्येही आपल्या क्रांतीकारी कल्पनांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी पत्रके, पुस्तिका, ग्रंथ या साधनांचा वापर केला. पहिल्या सहा महिन्यातच त्यांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद केला. महाराष्ट्रातील नामांकित वृत्तपत्रांनी या पुस्तकाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
लंडनमधील भारत निवासमध्ये राजकीय तत्वज्ञानावर उच्च दर्जाची आणि स्फूर्तिदायक चर्चा होत असे. सावरकरांनी लंडनहून पाठविलेल्या बातमीपत्रांमधून या चर्चांचा प्रतिध्वनी साऱ्या भारतभर उमटत असे. ही बातमीपत्रे महाराष्ट्रात मोठ्या उत्सुकतेने वाचली जात असत.
आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रभाव निर्माण होण्यासाठी सावरकरांनी न्यू यॉर्कच्या “गॅलिक अमेरिका” या वृत्तपत्रातून भारतीय घडामोडींवर अनेक प्रभावी लेख लिहिले.
या लेखांचा त्यांनी जर्मन, फ्रेंच, इटालियन, रशियन, पोर्तुगीज या भाषांमध्ये अनुवाद करुन ते त्या त्या देशात प्रसिद्ध करण्याची व्यवस्था केली.
साप्ताहिक तलवार
अभिनव भारत संघटनेचे मुखपत्र म्हणून “तलवार” साप्ताहिक सुरु करण्यात आले. पहिल्याच अंकात 1908 सालात उद्भवलेल्या कील कालव्याच्या राजकारणातली गुंतागुंत उलगडून दाखवून आगामी चारपाच वर्षाच्या अवधीत युरोपमध्ये पेटणाऱ्या युद्धाच्या संभाव्यतेची सावरकरांनी चिकित्सक मीमांसा केली होती. “गुप्त संघटना उभारण्याचे किंवा दबा धरुन गनिमी युद्ध लढण्याचे आम्हाला काही विशेष मोठे प्रेम आहे अशातला प्रकार नाही. परंतु जेव्हा प्रपीडक हिंसा सत्तारुढ झालेली असते आणि ती सत्याच्या प्रचाराला नि आचाराला प्रतिबंध करते, तेव्हा आणि तेव्हाच मात्र गुप्त संघटना आणि गनिमी युद्ध यांची कृती समर्थनीय ठरते. कारण या परिस्थितीत हिंसक सत्तेला उखडून टाकण्यासाठी सशस्त्र प्रतिकार हेच काय ते एकमेव नि अपरिहार्य साधन उरलेले असते” असे त्यांनी म्हटले होते.
सावरकर पुढे म्हणतात : “अन्यायी शक्तींकडून राष्ट्रीय नि राजकीय उत्क्रांतीची नैसर्गिक प्रक्रिया जेव्हा बळाने दडपून टाकली जाते, तेव्हा स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणून या उत्क्रांतीच्या जागी क्रांती पदार्पण करते. म्हणूनच सत्य आणि न्याय यांना सिंहासनारुढ करण्यासाठी अवतीर्ण झालेल्या या क्रांतीचे सहर्ष स्वागत केले पाहिजे.” अखेरीस तेजस्वी समारोप करताना ते म्हणतात, “ तुम्ही संगिनीच्या जोरावर राज्य चालवता आणि आम्हाला घटनात्मक आंदोलनाचा उपदेश ऐकवता ? जेथे कसलीच घटना मुळात अस्तित्वातच नाही तेथे घटनात्मक आंदोलनाची भाषा ही शुद्ध कुचेष्टा ठरते. एखाद्या राष्ट्रात घटना अस्तित्वात असेल आणि ती त्या राष्ट्राच्या परिपूर्ण आणि विमुक्त विकासाला मोकळेपणाने अवसर देत असेल, तर मात्र त्या राष्ट्रात क्रांतीची भाषा ही केवळ कुचेष्टा ठरेल. एवढेच नव्हे तर तो मोठा अपराध ठरेल. तुम्ही आमच्या तोफा हिसकावून घेतल्या आहेत, म्हणून आम्ही पिस्तुले उचलली आहेत. तुम्ही आम्हाला प्रकाश नाकारला आहे, म्हणून आम्ही अंधाराचा आधार घेतला आहे. आणि या अंधारात एकत्र जमून आमच्या मातृभूमीला जखडून टाकणाऱ्या बेड्या तोडून टाकणारे घणाघात कसे घालावेत, याचा विचार आम्ही चालविला आहे.” ही गोष्ट समोर ठेवून प्रेरक साहित्य लिहिणे, छापणे नि त्या प्रसार करणे यात सावरकर गढून जात.
1908 साली 1857 च्या स्वातंत्र्यवीरांचा स्मृति समारंभावेळी सावरकरांनी
“हे हुतात्म्यांनो !”
या शीर्षकाखाली एक तेजस्वी पत्रक प्रसृत केले. या पत्रकात त्यांनी म्हटले होते, हुतात्म्यांनो, तुम्ही केलेली घोषणा आम्ही उचलून धरतो, तुम्ही उभारलेला ध्वज आम्ही परमपूज्य मानतो.
10 मे 1908 रोजी हायगेट येथे भरलेल्या सभेला युरोपच्या विविध भागातून शंभर एक भारतीय विद्यार्थी आले होते. त्यांना आणि इंग्लंडमध्ये हे पत्रक वाटण्यात आले. त्याच्या शेकडो प्रती भारतातही पाठविण्यात आल्या.
सावरकरांची शोध पत्रकारिता
ब्रिटिश सरकारने भारतात केलेल्या अत्याचारांचा बदला म्हणून मदनलाल धिंग्रा यांनी या अत्याचारांना जबाबदार असणाऱ्या सर विल्यम कर्झन वायली यांचा
1 जुलै 1909 रोजी
वध केला. या वधाने ब्रिटन व भारत हादरुन गेले होते. या संदर्भातील पत्रकात सावरकरांनी म्हटले होते, ”धिंग्रांचे प्रकरण आता न्यायप्रविष्ट असल्यामुळे, त्यांना आधीच दोषी ठरविण्याचा आणि न्यायालयाच्या अधिकारावर अतिक्रमण करण्याचा कोणालाही अधिकार नाही.
सत्र न्यायालयात वाचावयाचे धिंग्रांचे निवेदन पोलीसांनी काढून घेतले होते.पण धिंग्रांनी फाशी जाण्यापूर्वी पोलीसांनी दाबून टाकलेले ते निवेदन सावरकरांना प्रसिद्ध करावयाचेच होते. त्याप्रमाणे त्यांनी धिंग्रांच्या निवेदनाच्या प्रती छापून घेतल्या. श्यामजी कृष्ण वर्मांनी पॅरीसला जाऊन तेथून त्या निरनिराळ्या अमेरिकन व आयरिश वृत्तपत्रांकडे पाठवून दिल्या.
इंग्लंडमधील वृत्तपत्रात
हे निवेदन प्रसिद्ध होणे फार कठिण होते पण ते तेवढेच आवश्यक होते. म्हणून सावरकरांनी आपला स्नेही डेव्हिड गार्नेट याच्याकडे त्या निवेदनाची प्रत दिली. गार्नेटने ते निवेदन
“डेली न्यूज” या वृत्तपत्रातील रॉबर्ट लिड यांच्याकडे दिले.लिडने ते निवेदन 16 ऑगस्टच्या अंकात प्रसिद्ध केले आणि सारे इंग्लंड हादरुन गेले. आपल्या कडेकोट बंदोबस्तात ठेवलेले निवेदन प्रसिद्ध झाल्याचे पाहून पोलीसही हतबल झाले.
अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर ग्रंथ
“अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर” या सावरकरांनी लिहिलेल्या ग्रंथावर प्रकाशनापूर्वीच सरकारने बंदी आणली. सावरकरांनी हे आव्हान स्वीकारुन ब्रिटिश, अमेरिकन, युरोपियन, वृत्तपत्रांमधून सरकारची खिल्ली उडवली. अखेर सावरकरांनी तो ग्रंथ 1909 साली हॉलंडमध्ये “दि इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स ऑफ 1857” या नावाने छापून घेतला. हिंदूस्थान, फ्रान्स, अमेरिका, जपान, चीन या देशांमध्ये या ग्रंथाच्या प्रती सुखरुप जाऊन पोचल्या. पुढे अनेक भाषांमध्ये हा ग्रंथ प्रसिद्ध झाला.
मुंबईच्या “फ्री हिंदूस्तान” या वृत्तपत्राने काढलेल्या सावरकर विशेषांकात लिहिताना के.एफ. नरिमन यांनी म्हटले होते, “ 1857 च्या महान क्रांतीवर आणि बंडावर वीर सावरकरांनी लिहिलेल्या आणि सरकारने बंदी घातलेल्या ग्रंथामधूनच आझाद हिंद सेनेची कल्पना आणि त्यातही विशेषत: झाशीच्या राणीचे पथक उभारण्याची कल्पना निघाली असावी असे दिसते. याच अंकात बेझवाडा येथील “गोष्टी” चे संपादक जी.व्ही. सुब्बाराव यांनीही या ग्रंथाची मुक्तकंठाने थोरवी गायली. इतिहास घडविण्याच्या बाबतीत सावरकर हे रुसो, व्हॉल्टेअर आणि मॅझिनी यांच्या श्रेणीत असणारे प्रतिभाशाली, नव्या युगाचे उद्गाते, क्रांतीचे निर्माते आहेत, असे गौरवोद्गार काढले आहेत.
सावरकरांवर खटला
धिंग्रांच्या हौतात्म्यानंतर भारतात सावरकरांचे अनुयायी, साथी यांचा छळ सुरु झाला. त्यांच्यावर खटले दाखल झाले.बाबाराव सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली. या शिक्षेचा सूड उगविण्यासाठी अनंत कान्हेरे या तडफदार, निधड्या छातीच्या तरुणाने नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याला 21 डिसेंबर 1909 रोजी गोळी घालून ठार मारले. जॅक्सन खून प्रकरणात सावरकरांनाही दोषी ठरविण्यात आले. त्यांनी धिरोदात्तपणे या परिस्थितीला तोंड दिले.
सावरकरांवर एकूण 38 दोषारोप ठेवण्यात आले होते. एकूण 68 दिवस खटला चालून त्यांना सर्व मालमत्ता जप्त करण्याची आणि जन्मठेप, काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली.
आपल्या निकालपत्रात न्यायमूर्तींनी सावरकरांच्या
“वंदे मातरम” या पत्रकातील उतारा दिला होता. या उताऱ्यात सावरकर म्हणतात, “नोकरशाहीला गलितगात्र करुन सोडण्यास आणि जनतेची उठावणी घडून आणण्यास, वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या राजकीय वधाची मोहिम हीच प्राप्त परिस्थितीत सर्वोत्कृष्ट पद्धत आहे.” या निकालपत्रात न्यायमुर्तींनी शेवटी म्हटले होते “युद्धाला चिथावणी देण्याऱ्या छापील वाङमयाचा प्रसार करुन शस्त्रास्त्रांचा पुरवठा करुन आणि स्फोटकांच्या निर्मितीचे शिक्षण देण्याची सोय करुन, आरोपीने युद्धाला प्रोत्साहन देण्याचा गुन्हा केल्याचे आमच्या दृष्टीने सिद्ध झाले आहे.
अंदमानच्या तुरुंगातूनही पत्रकारिता
अंदमानच्या तुरुंगात शारिरिक, मानसिक कष्ट, हाल अपेष्टा, अतोनात छळ सोसत असुनही सावरकर खचले नव्हते.अशाही परिस्थितीत त्यांनी गुप्तपणे पत्रकारिता सुरुच ठेवली होती.
बातमीसाठी सावरकरांनी एकदा लिहिलेली चिठ्ठी पकडल्या गेली. त्यामुळे त्यांना हातकडीत टांगण्याची शिक्षा झाली. त्यावेळी जेलर बारीने त्यांना विचारले,
“ हे कशासाठी हो ” ? त्यावर सावरकर म्हणाले “हा बातमीसाठी भरलेला टपाल खर्च आहे ”. त्यावर बारी म्हणाला “तुम्हाला बातमी बरीच महाग पडली म्हणायची !” यावर सावरकर ताडकन् उद्गारले “छे, मुळीच नाही ! तुम्हाला बातमीसाठी वृत्तपत्रांची वर्गणी भरुन वर टपाल खर्चही द्यावा लागतो. आम्हाला बातमी फुकट मिळते ! मात्र हा असा टपालखर्च तेवढा वर्षातून एक दोन वेळा भरावा लागतो.”
क्रांतीकारक इंदूभूषण आणि उल्लासकर यांच्या छळाचे आणि हौतात्म्याचे थरारक वृत्तांत भारतीय वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाले.ब्रिटिश अधिकारी त्यामुळे हादरले. वृत्तपत्रातून झालेली टिका, मध्यवर्ती मंडळात विचारले गेलेले प्रश्न, लोकमताचे वाढते दडपण या सर्वांचा सरकारवर दबाव पडला. शेवटी 1913 साली सर रेजिनाल्ड क्रॅडॉक याने अंदमानला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली, कैद्यांशी बोलणे केले. 16 नोव्हेंबर 1913 रोजी क्रॅडॉकशी सावरकरांची भेट झाली.
सावरकरांनी अंदमानातून पाठविलेली पत्रे सर्व प्रांतिक वृत्तपत्रांमधून छापली जाऊन त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली.
रत्नागिरी तुरुंगात
सावरकरांना अंदमानहून रत्नागिरी तुरुंगात हलविण्यात आले. या रत्नागिरीच्या तुरुंगातच सावरकरांनी ‘ हिंदुत्व’ हा अमर प्रबंध लिहून, तुरुंगातून गुप्तपणे बाहेर पाठवला. सावरकर तुरुंगात असल्यामुळे तो ‘मराठा’ या टोपण नावाखाली प्रसिद्ध करण्यात आला. या प्रबंधात हिंदु राष्ट्रवादाची तत्वे, हिंदूराष्ट्र आणि हिंदू राजकारण यांची संपूर्ण चळवळ यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
सावरकरांची मुक्तता
6 जानेवारी 1924 रोजी सावरकरांची काही अटींवर सुटका करण्यात आली. सावरकरांचे पूर्व सहकारी
शिवरामपंत परांजपे यांचा दृष्टिकोन पूर्वीहून बदलला होता. पूर्वीच्या महान क्रान्तिकारकाचे विकृत रुपांतर झालेले सावरकरांना आढळले. परांजपे ‘नवाकाळ’ या नव्या संकल्पित दैनिकाविषयी सावरकरांशी बोलले. त्यावेळी सावरकर कोटी करुन तटकन् उद्गारले, “मी ‘नवाकाळ’ ओळखीत नाही. मी जुना ‘काळ’ तेवढाच
जाणतो.”!
अस्पृश्यता निर्मुलन
सावरकरांच्या अस्पृश्यता निर्मुलनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या ‘जनता’ पत्राने पाठिंबा दिला. त्याच्या आधी काही दिवस सावरकरांनी एक पत्रक काढले होते आणि डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांनी नासिकला चालविलेल्या मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहाला आपला पाठिंबा व्यक्त केला होता.
‘ दलित वर्गाच्या हिंदूंना काळाराम मंदिर उघडे करा’ अशी नासिकच्या सवर्ण हिंदूंना सावरकरांनी त्या पत्रकाद्वारे विनंती केली होती. भाऊराव गायकवाड यांनी नासिकच्या सवर्ण हिंदूंमध्ये ते पत्रक वाटले.
अखिल भारतीय गुरखा लिगचे अध्यक्ष ठाकूर चंदनसिंग यांनी सावरकरांच्या लेखांचे अनुवाद करुन ते ‘तरुण गुरखा’, ‘हिमालयन टाइम्स’ यांमध्ये प्रसिद्ध केले होते.
विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन
सावरकरांचा दृष्टीकोन संपूर्णत: आधुनिक, विज्ञाननिष्ठ आणि धर्म निरपेक्ष होता. मानव जातीच्या हिताला जे साधक ते चांगले आणि तिच्या प्रगतीला जे बाधक ते वाईट, अशी त्यांची विचारसरणी होती. यंत्र हा शाप नसून ते मानवाला मिळालेले वरदान आहे. बेकारी हा यंत्राचा दोष नसून तो विषम वाटणीचा आहे, असे प्रतिपादन सावरकर कटाक्षाने करित. या विषयांवर लिहिलेल्या एका लेखात त्यांनी निरिश्वरवादी रशियाच्या अंतराळ प्रगतीचे वर्णन करुन विज्ञानाची कास धरण्याचे हिंदूंना कळकळीचे आवाहन केले आहे. मानव हातासाठी नव्हे तर मानव हितासाठी विज्ञानाचा उपयोग करण्याचे उद्दिष्ट मनुष्य जातीने ठेवले तर विज्ञान हे वरदान ठरेल, असा निष्कर्ष सावरकरांनी काढला आहे.
सावरकरांनी 1935 साली किर्लोस्कर मासिकात मूर्तिपूजेवर एक विशेष लेख लिहिला होता.या लेखात ते म्हणतात, जशी एक धार्मिक मूर्तिपूजा आहे, तशीच एक बौद्धिक मूर्तिपूजाही आहे. ती बुद्धिवादाच्या कसोटीस पूर्णपणे उतरते. परंतु आपल्याकडील लोक समाधी , कबरींचे दर्शन घेतात, ते नवसास पावतात, मुले देतात. उपाहाराचा भोग घेतात, न भोग दिला तर रागावतात. या भावनेने या प्रकारास मात्र बुद्धिवाद धर्मवेड म्हणतो.
तुरुंगात चांगल्या रितीने वागविले जावे यासाठी जितेंद्रनाथने तेथेच उपोषण करुन बलिदान केले.हे कसे चूक आहे, हे सांगताना सावरकर एका लेखात म्हणतात, राजकीय बंदिवानांना कितीही बऱ्या रितीने वागविले तरी काय ? स्वत:स बंदिवान म्हणून घेण्याचे दौर्बल्य तर राहणारच ना ? अगदी खुर्चीवर बसून जरी ताजे पत्र वाचीत राहिले तरी इंग्रजांचा बंदिवानाच !
”आजच्या तिबेटमधील गमती जमती” या लेखात ते आपला नीतिविषयक दृष्टीकोन स्पष्ट करतात. नीती, अनीती या वस्तु चौकोन वा त्रिकोणाप्रमाणे ठराविक साचाच्या, एकठशी, एकछापी, त्रिकालाबाधित असतात किंवा पुराणात जे चांगले ते म्हणून वा वाईट म्हणून सांगितले आहे, तेच सर्व परिस्थितीत, सर्व मनुष्य समाजात चांगले वा वाईट ठरलेच पाहिजे, हा हट्ट चुकीचा आहे. आपणास जो उपचार शुद्ध आणि हितकर वाटतो तो आपण आचरावा, पण तो सनातन, त्रिकालाबाधित, ईश्वरोक्त ”धर्म” होय आणि इतर साऱ्या परिस्थितीतही तोच मानला पाहिजे, असा धर्मवेडा दुराग्रह मात्र धरु नये.
साप्ताहिक श्रध्दानंद
सामाजिक सुधारणेच्या आपल्या महान कार्याला पूरक म्हणून आणि प्रचलित राजकारणावरील आपली मते गुपचूप मांडता येण्याचे साधन म्हणून डॉ. सावरकर यांच्या संपादकत्वाखाली मुंबई येथून सावरकारांनी ‘श्रध्दानंद’नावाचे एक साप्ताहिक सुरु केले होते. त्यामधून सावरकारांचे अनेक स्फुर्तिदायक लेख प्रसिध्द होत. ते लेख त्यांच्या नावावर प्रसिध्द होत नसले तरी, त्यांचा एकदंर सूर आणि शैली यावरुन ते कोणाचे आहेत हे महाराष्ट्राला कळून चुकले होते. हे साप्ताहिक अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय झाले होते आणि त्याचा खपही भरपूर वाढला होता.
सावरकरांची सुटका
लोकशाही स्वराज्य पक्षाचे नेते जमनादास मेहता यांच्या प्रयत्नांमुळे अखेर 10 मे 1937 रोजी सावरकरांची बिनशर्त सुटका करण्यात आली. सत्तावीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सावरकरांनी पुन्हा राजकीय जीवनात आणि संघर्षात पदार्पण केले.
सावरकरांचे एक पूर्व सहकारी वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय हे युरोपात होते. ते कम्युनिस्ट बनले असल्याची बोलवा होती. पण ते ट्रॉटस्कीवाद्यांच्या गोटात शिरल्यामुळे स्टालिन सरकारने त्यांना गोळी घालून ठार मारले असल्याचे वृत्त पसरले होते. सावरकर हे एकमेव भारतीय नेते होते की, ज्यांनी याविषयी एक पत्रक काढून वीरेंद्रनाथांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली होती. परंतु त्यांच्या मृत्यूविषयी ब्रिटिश, रशियन या दोन्ही सरकारांनी मौन पाळले.
सुभाषचंद्र बोस रहस्यमय रीतीने गायब झाल्यानंतर, सावरकरांनी एक पत्रक काढले आणि इतर कोणाही पुढाऱ्यापेक्षा वेगळी वृत्ती दाखवून म्हटले, ‘ ते कोठेही असले तरी,उभ्या राष्ट्राची कृतज्ञता, संमती, सदिच्छा यांच्यापासून त्यांना सदैव स्फूर्ती, समाधान लाभो. ते कोणत्याही स्थळी असोत, भारतीय स्वातंत्र्याच्या काजासाठी प्रकृती वा प्राण यांची पर्वा न करता, ते आपले जीवन सर्वस्व वेचीत राहातील याविषयी मला संशय नाही.’
अखंड राष्ट्राची भूमिका
सावरकरांची भूमिका देशभक्तीची नि व्यवहारी वृत्तीची होती.
10 ऑगस्ट 1942 रोजी काढलेल्या एका पत्रात ते म्हणाले, भारत-ब्रिटनसह भारत स्वतंत्र नि समान भागीदार असल्याची ब्रिटिश लोकसभेने घोषणा करणे आणि लगेच ती घोषणा कृतीत आणणे, हाच चालू समस्येवरचा एकमेव तोडगा आहे.
26 ऑगस्ट 1942 च्या ‘बाँबे क्रॉनिकलच्या अंकात त्यांच्या लंडनच्या वार्ताहराने लिहिले होते, ‘सावरकरांनी ब्रिटिश जनतेला उद्देशून केलेल्या आवाहनाला इकडच्या वृत्तपत्रांनी भरपूर प्रसिध्दी दिली. ‘टाइम्स,’ ‘मँचेस्टर गार्डियन,’ ‘डेली हेरल्ड,’ ‘न्यूज क्रॉनिकल,’ आणि यॉर्कशायर पोस्ट, या प्रमुख वृत्तपत्रांनी ठळक मथळे देऊन पण कोणतेही भाष्य न करता, हे निवेदन लोकांच्या नजरेत भरेल अशा रीतीने प्रसिध्द केले.
भारताचे स्वातंत्र्य
15 ऑगस्ट 1947 चा दिवस उजाडला. भारत स्वतंत्र झाला. तो देशात राष्ट्रीय महोत्सव दिन म्हणून आनंदाने साजरा केला.
भारतीय स्वातंत्र्याच्या रुपाने आशियामध्ये एक महान शक्ति अवतीर्ण झाली होती. पण देशाच्या फाळणीमुळे पंजाबमध्ये जागोजागी दंगली उसळल्या. जाळपोळ, खून, लुटालूट आणि सर्व प्रकारचे गुन्हे यांनी थैमान घातले. प्रचंड लोकसंख्येने स्थलांतर केले. पुढील काही काळ देशात अशांतताच होती.
महात्मा गांधींचे हौतात्म्य
शुक्रवार दि. 30 जानेवारी 1948 रोजी सायंकाळी 5.30 वाजता प्रार्थना स्थळाच्या वाटेवर महात्मा गांधींवर नथुराम गोडसे याने गोळी घातली. हे वृत्त सर्वीकडे पसरताच देश
शोकसागरात बुडाला.
सावरकरांनी
31 जानेवारीलाच एक पत्रक काढून त्यात म्हटले की, “महात्मा गांधींच्या अवचित हत्येचे वृत्त आत्यंतिक धक्का देणारे आहे. या प्रसंगी जनतेने स्वतंत्र भारताच्या केंद्रीय सरकारच्या पाठीशी उभे राहावे आणि देशात सुव्यवस्था राखण्यास सर्वतोपरी सहकार्य द्यावे अशी माझी जनतेला विनंती आहे.”
सावरकरांचे अंगरक्षक, अप्पा कासार, वैयक्तिक कार्यवाह गजाननराव दामले यांना गांधी हत्येनंतर आठ तासांनीच रातोरात अटक करण्यात आली होती.
सावरकरांना अटक
सर्व समंजस माणसांनी गांधी हत्येच्या कृत्याचा नि:संदिग्धपणे निषेध केला होता. अटक होण्यापूर्वी काही तास आधी सावरकरांनी एक पत्रक काढले होते आणि भोपटकर, हिंदु महासभेच्या कार्यकारिणीचे सदस्य यांनी ‘महात्मा गांधींच्या भीषण हत्येचा धिक्कार करणारे जे संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले होते, त्याला परिपूर्ण दुजोरा दिला होता.
त्या पत्रकात पुढे सावरकरांनी म्हटले होते, “हिंदु महासभेचा एक उपाध्यक्ष या नात्याने मीही या नेत्यांनी व्यक्त केलेल्या भावनांशी संपूर्ण सहमत आहे. असे गुन्हे वैयक्तिक क्षोभाने झालेले असोत वा सामूहिक क्रोधाच्या भरात घडलेले असोत, ते मी सर्वथैव धिक्कारार्ह मानतो.” त्या पत्रकात अखेरीस सावरकरांनी म्हटले होते : “कोणत्याही राष्ट्रीय क्रांतीला, नवजात राष्ट्रीय सत्तेला अरिष्टकर ठरणारा सर्वाधिक मोठा शत्रू जर कोणता असेल, तर तो म्हणजे बन्धुघातकी यादवी युद्ध हा होय. विशेषत: आपले राष्ट्र परकीय शत्रूंनी वेढलेले असताना तर अशा यादवीपासून फारच मोठा धोका असतो, हा इतिहासाचा कडक इशारा प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाने आपल्या अंत:करणावर कोरुन ठेवला पाहिजे.”
निर्दोष मुक्तता
महात्मा गांधींच्या हत्येप्रकरणी सावरकरांना अटक झाली. सात महिने न्यायालयाचे कामकाज चालल्यानंतर 10 फेब्रुवारी 1949 रोजी न्यायालयाने आपला निकाल दिला. या निकालपत्रात न्यायाधीशांनी आपला निर्णय घोषित केला, “विनायक दामोदर सावरकर यांच्यावर ठेवलेले आरोप सिद्ध झाले नसून ते दोषी नाहीत, असे आढळून आले आहे आणि त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. ते कैदेत आहेत. इतर काही कारण नसल्यास त्यांना तात्काळ सोडून देण्यात यावे.”
भारतीय प्रजासत्ताकाची स्थापना
26 जानेवारी 1950 या दिवशी डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या राष्ट्रपतित्वाखाली सार्वभौम लोकशाही भारतीय प्रजासत्ताक अस्तित्वात आले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त काढलेल्या पत्रकात सावरकरांनी भूदल, नौदल नि वायुदल या तिन्ही लढाऊ दळांत लक्षावधींच्या संख्येने भरती होण्याचे हिंदू तरुणांना आवाहन केले. ते म्हणाले, “आपल्या राष्ट्राच्या मोक्याच्या सीमा अजूनही आपल्या हातात आहेत. केवळ सुरम्य सिद्धांताची सुगीते गाऊन आपण त्यांची मैत्री संपादन करु शकणार नाही. अशी वेडगळ धोरणे ठेवली, तर दीर्घकालीन रक्तरंजित लढा देऊन आपण जे काही कमावले आहे ते सर्व आपण गमावून बसू. दुसरा ज्या तऱ्हेने आपल्याशी वागतो त्याच तऱ्हेने त्याच्याशी वर्तन ठेवणे, हाच आपले अस्तित्व टिकविण्याचा एकच एक मार्ग आहे. आपले राष्ट्र टिकवायचे असेल, यशस्वी बनवायचे असेल, तर ‘जशास तसे’ हेच एकमेव धोरण ठेवल्याखेरीज आपणास गत्यंतर नाही.”
लिपी सुधारणा
सावरकरांनी देवनागरी लिपी सुधारणेकडे विशेष लक्ष दिले. राजकारणात भाग घेण्यास प्रतिबंध असल्यामुळे, सामाजिक सुधारणा, लिपी सुधारणा, पंचांग-सुधारणा या गोष्टींकडे सावरकरांनी आपले लक्ष वळविले. या विषयांवर त्यांनी वृत्तपत्रांमधून अनेक लेख लिहिले, पुस्तके प्रसिद्ध केली आणि मुंबईत अनेक ठिकाणी व्याख्याने दिली.
सावरकरांनी छापखान्यातील नागरी टंकांची संख्या 250 वरुन 80 वर आणून दाखविली होती. उच्चारशास्त्राच्या दृष्टीने नागरी ही सार्वाधिक शास्त्रीय लिपी आहे असे सावरकरांनी सांगितले.
‘राष्ट्रीय पंचांगाची आवश्यकता’ या विषयावर 1951 सालात त्यांनी ‘केसरी’ मध्ये दोन लेख लिहिले.
सावरकरांनी अनेक इंग्रजी शब्दांना समर्पक मराठी शब्द सुचविले आणि ते प्रचारात आणले. ‘मेयर’ ला ‘महापौर’ , ‘बजेट’ ला ‘अर्थसंकल्प’ टेलिव्हिजन’ ला ‘दूरदर्शन’,‘टेलिप्रिंटर’ ला ‘दूरमुद्रक’ हे त्यांनी सुचवलेले शब्द हा हा म्हणता लोकांच्या तोंडी रुढ झाले.
महाराष्ट्राची स्थापना
प्रदीर्घ लढ्यानंतर
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. त्यावेळी मराठी जनतेला, राज्याला उद्देशून दिलेल्या संदेशात सावरकरांनी म्हटले होते, ‘ महाराष्ट्र हा भारताचा खड्गहस्त व्हावा अशी माझी इच्छा आहे. असाही एक दिवस उजाडेल की ज्या दिवशी आजचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतंत्र, स्वायत्त भारताचा झेंडा पुन्हा एकवार अटकेवर फडकावून भारताचे पंतप्रधान होतील.’
तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कवी यशवंतांना महाराष्ट्राचे राजकवी ही पदवी अर्पण केली आणि साताऱ्याला एक सैनिकी विद्यालय सुरु केले, या दोन गोष्टींसाठी सावरकरांनी चव्हाणांचे अभिनंदन केले. महाराष्ट्र सरकारने मराठी ही प्रशासनाची भाषा ठरवली, म्हणून सावरकरांनी राज्य सरकारचेही अभिनंदन केले.
सावरकरांचे आत्मार्पण
1965 साली त्यांनी लिहिलेल्या एका लेखात, त्यांच्या दृष्टीसमोर तरळणाऱ्या अंतकाळाची सूचक कल्पना मांडली होती. सावरकर त्या लेखात म्हणाले होते, ‘अत्यंत असमाधानाने विफलतेच्या तीव्र जाणिवेने, संकटांना कंटाळून, इच्छा असतानाही सुखाने जगता येत नाही म्हणून, अत्यंत अतृप्त अशा मनस्थितीत वैतागाच्या भरात जे बळाने जीव देतात, त्यांच्या त्या कृत्याला साधारणत: ‘आत्महत्या’ म्हटले जाते. परंतु आपले जीवितकार्य, जीवनाचे ध्येय, जीवनाचा हेतू पूर्णपणे सफल झालेला आहे, अशा सफलतेच्या, कृतकृत्यतेच्या भावनेने जे आपल्या ऐहिक अस्तित्वाची हर्षभराने समाप्ती करतात त्यांच्या त्या कृत्यास ‘आत्मार्पण’ म्हणतात. या परिवर्तनशील किंवा अखंड विकसनशील जगात सर्वतोपरी परिपूर्णता अशी केव्हाही असू शकणार नाही. जे जीवनात संपादवयाचे होते ते सर्व संपादिलेले आहे म्हणून आता कर्तव्य असे काही उरलेले नाही, अशा कृतकृत्य भावनेने रिक्तकाम किंवा पूर्णकाम झालेले धन्य पुरुष आपण होऊन आपले प्राण विसर्जन करतात. ते आपले नश्वर जीवन विश्वाच्या चिरंतन जीवनात विलीन करुन टाकतात.’
1966 मध्ये प्राणांतिक उपोषण करुन आत्मार्पण करण्याचा त्यांनी निर्धार केला.
3 फेब्रुवारी 1966 या दिवशी त्यांनी हे उपोषण सुरु केले. ते 23 दिवस चालले. शेवटी 26 फेब्रुवारी 1966 रोजी
सकाळी अकरा वाजता, वयाच्या 83 व्या वर्षी सावरकरांनी आपला देह मृत्यूला अर्पण केला.
सावरकरांचा गौरव
सबंध भारतभरच्या नेत्यांनी, वृत्तपत्रांनी सावरकरांच्या मृत्यूची त्वरेने दखल घेतली आणि त्यांना गौरवपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
सावरकरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, प्रसंगी परदेशात राहून, तुरुंगात राहून, हाल अपेष्टा सोसून जी जाज्वल्य पत्रकारिता केली, निर्भयपणे आपले विचार मांडले, समाजाला जागे करण्याचा सतत प्रयत्न केला यावरुनच त्यांचे निस्सिम राष्ट्रप्रेम आणि दूरदृष्टी दिसून येते. आपल्या पत्रकारितेद्वारे त्यांनी मांडलेले विचार किती तंतोतंत खरे ठरत आहे, हे आजची जागतिक अशांततेची परिस्थिती पाहता आपणास पटतात.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र आदरांजली.
लेखन:देवेंद्र भुजबळ
ईमेल : devendrabhujbal4760@gmail.com
मो.क्र.:9869484800
स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनक्रम
1) 28 मे, 1883 : जन्म. भगूर, जिल्हा नाशिक
2) 1898 : चाफेकरांना फाशी : सावरकरांनी सशस्त्र क्रांतीची शपथ कुलस्मामिनीच्या मूर्तीसमोर घेतली.
3) 1900 : मित्रमेळ्याची स्थापना.
4) 1901 : लग्न. मॅट्रिक परीक्षेत उत्तीर्ण.
5) 1902 : फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश
6) 1904 : मित्रमेळा हे नाव बदलून अभिनव भारत या नावाच्या गुप्त क्रांतिकारक संघटनेची स्थापना.
7) 1905 : परदेशी कपड्यांची होळी.
बी.ए. उत्तीर्ण.प्रथम पुत्र प्रभाकर याचा जन्म.
8) 1906 : इंग्लंडला प्रयाण.
9) 1909 : बाबारावांना जन्मपेठ
: मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायलीला ठार मारले. प्रभाकराचा मृत्यू, बॅरिस्टरी उत्तीर्ण पण न्यायमंडळाने पदवी घेण्यास नकार दिला.
10) 1910-11 : अटक, मार्सेलिसला समुद्रात उडी, नाशिक कटाच्या खटल्यात मालमत्ता जप्त व दोन जन्मठेपांची शिक्षा.
11) 1911 : अंदमानला रवानगी.
12) 1913 : अंदमानात शुद्धिकार्यास प्रारंभ.
13) 1915 : येसू वहिनींचे निधन, पत्नी व धाकट्या भावाची अंदमानात भेट.
14) 1921 : सावरकर बंधूंची अंदमानातून भारतात पाठवणी.
15) 1924 : येरवडा तुरुंगातून सशर्त सुटका. रत्नागिरीत स्थानबद्ध.
: रत्नागिरी हिंदुसभेची स्थापना.
16) 1925 : अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्याला प्रांरभ.
: भाषाशुद्धीची चळवळ सुरु. कन्या प्रभा हिचा जन्म.
17) 1927 : ‘श्रद्धानंद’ साप्ताहिक सुरु, रत्नागिरी येथे गांधीजी-सावरकर भेट.
18) 1928 : पुत्र विश्वास याचा जन्म.
19) 1930 : रत्नागिरीत पहिले प्रकट सहभोजन.
20) 1931 : पतित पावन मंदिराचे उद्घाटन.
21) 1937 : बिनशर्त मुक्तता, अहमदाबाद हिंदुमहासभेचे अध्यक्ष. पुढे 1943 पर्यंत प्रतिवर्षी असे सलग सात वेळा अध्यक्ष.
22) 1938 : मुंबई येथील महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
: भागानगर नि:शस्त्र प्रतिकाराचे आंदोलन.
23) 1943 : षष्टयब्दी निमित्त भव्य सत्कार, साहित्यिकांकडून मानपत्र, सांगली येथे झालेल्या मराठी रंगभूमीच्या शतसांवत्सरिक महोत्सवाचे अध्यक्ष
24) 1947 : गांधीजींचा खून, अटक
25) 1949 : गांधी – खून खटल्यातून निर्दोष मुक्तात.
26) 1952 : पुणे येथे अभिनव भारत सांगता समारंभ.
27) 1956 : लोकमान्य टिळक जन्मशताब्दी समारोहाचे अध्यक्ष, पुणे.
28) 1957 : सत्तावनच्या स्वातंत्र्यसमराचा शताब्दी समारोह दिल्ली येथे साजरा. तेथे सत्कार व भाषण.
29) 1961 : मृत्युंजय दिनानिमित्त पुण्यात भव्य सत्कार. सावरकरांचा सामर्थ्यसंपन्न होण्याचा संदेश. प्रकट समारंभातील अखेरचे भाषण.
30) 1936 : पत्नी सौ. यमुनाबाई यांचे निधन.
31) 26 फेब्रु.1966 : 23 दिवसांच्या प्रायोपवेशानंतर मृत्यु.