लातूर ; ( प्रतिनिधी )
महाविद्यालयीन विद्यार्थी साहित्याचा जाणकार वाचक व संवेदनशील लेखक व्हावा.विद्यार्थ्यांनी अवतीभवतीचा समाज,समाजाचे प्रश्न समजून घेत लिहिते व्हावे या जाणिवेतून लातूर जिल्ह्यात पहिले विद्यार्थी साहित्य संमेलन होत असून ते अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन समारोप सत्रात डॉ.जयद्रथ जाधव यांनी केले.
विद्यार्थी सहायता निधी लातूर व शिवजागृती वरिष्ठ महाविद्यालय नळेगाव यांच्या संयुक्तपणे पहिले विद्यार्थी साहित्य संमेलन नुकतेच नळेगाव येथे संपन्न झाले.
समारोप सत्रात विचारपीठावर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ जनार्दन वाघमारे, ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ नागोराव कुंभार, संस्थेचे अध्यक्ष व संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री माधवराव पाटील, प्राचार्य डॉ नागनाथ मोटे, श्री मन्मथअप्पा भांताब्रे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय वाघमारे, संमेलनाध्यक्ष विद्यार्थ्यांनी कुमारी सना नवाडे होते.
महाराष्ट्राला अनेक साहित्य संमेलने भरवण्याची प्रथा आहे. साहित्य संमेलन ही साहित्याच्या विचार प्रवाहांनी जशी भरवली जातात तशीच ती वर्ग, जात व धर्माच्या विचारांनी भरविले जात आहेत. परंतु हे विद्यार्थी साहित्य संमेलन विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, आणि मानसिक आणि चिंतनशील विचारात भर घालत लेखनाचे संस्कार करणारे आहे. पहिले विद्यार्थी साहित्य संमेलन २७ नोव्हेंबर १९८५ ला नागपूर येथे भरले होते. इथपासून विद्यार्थी साहित्य संमेलनाची परंपरा महाराष्ट्रात सुरू झाली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची विशिष्ट वयात जडणघडण करण्यासाठी वर्तमान परिस्थिती समजून हे संमेलन भरवले आहे.आजचा काळ मोठा विचित्र आहे.अभ्यासक्रमाचा संकोच होत आहे.वाचन कमी, गुणवत्तेसाठी जीवघेणी स्पर्धा, मोबाईलचा विळखा, शिक्षणातून कौशल्याचा अभाव, योग्य दिशेचा गोंधळ आणि चौकोनी कुटुंबामुळे संस्कारांचा अभाव अशा परिस्थितीत या संमेलनाचे महत्त्व आहे.तसेच हा काळ सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक गुंतागुंतीचा काळ आहे.समाजासमोरच एक भ्रमाची अवस्था आहे.अशा सर्व परिस्थितीत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन यातून मिळाले.विद्यार्थ्यांनीआत्मचिंतन करून स्वतःचा आत्मशोध घ्यावा.ग्रंथाच्या सानिध्यातून आपली दृष्टी व्यापक करावी.उद्याच्या सुसंस्कृत समाजासाठी हे विद्यार्थी संमेलन भरीव कामगिरी करेल.
याप्रसंगी प्राचार्य डॉ नागोराव कुंभार यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.एक जागरूक पिढी निर्माण करण्यासाठी हे संमेलन आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी मूल्य घेऊन जीवनाची वाटचाल करावी. शिक्षण हे शाश्वत सत्याचा आणि शाश्वत जीवनाचा मुख्य आधार आहे. आज दिवसभर झालेल्या चर्चेतून संमेलनाचा हेतू सफल झाला असून विद्यार्थ्यांना साहित्य लेखनात मार्गदर्शन मिळालेले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय वाघमारे म्हणाले की, विद्यार्थी सहायता निधी लातूर यांनी ही संधी आम्हाला दिली.लिहित्या विद्यार्थ्यांच्या समोर साहित्याचे मूल्यात्मक संस्कार करता आले.असे समाधान व्यक्त केले.
या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. ओमशिवा लिगाडे, सहसमन्वयक प्रा. अमोल पगार,मराठी विभाग प्रमुख डॉ. लहू वाघमारे, हिंदी विभाग प्रमुख डॉ.बालाजी भुरे, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.विनोद सोनवणे यांनी परिश्रम घेतले.या सत्राचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी खोसे यांनी तर आभार प्राचार्य डॉ मोटे यांनी मानले.