वाढदिवस विशेष
…………….
अरुण खोरे,
(पत्रकार, लेखक,पुणे).
………………..
पुणे शहराच्या कोथरुड उपनगरातील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाची वास्तू मी गेली अनेक वर्षे पाहत आलो आहे. विद्यापीठात रूपांतरित होण्यापूर्वी माईर्स एमआयटी शिक्षण संस्था म्हणून आम्हा सर्वांना ही संस्था परिचित होती. या संस्थेच्या वास्तूत प्रवेश करणे, तिथे वावरणे हा एक वेगळ्याच आनंदाचा भाग असतो. कारण या संस्थेचे संस्थापक असलेले डॉ. विश्वनाथ दादाराव कराड सर हे संत ज्ञानदेव आणि तुकाराम महाराज यांच्या विचारांचे पाईक आहेत.
कराड सरांचे कार्यालय
एमआयटीतील ज्ञानेश्वरांच्या भव्य मूर्तीमागील संत ज्ञानेश्वर सभागृहाला लागून असलेल्या जागेत आहे.मी त्याला अलीकडेच ‘ग्रेट हॉल’, असे अनौपचारिक स्वरूपात नाव दिले आहे. कराड सरांच्या कार्यालयात सर्वधर्मसमभावाचे दर्शन होते. हा
हॉल म्हणजे पंढरी आहे की एखाद्या शिक्षण संस्थेचे कार्यालय असा प्रश्न तेथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला पडतो. सर्व धर्मांचे पवित्र ग्रंथ आणि धर्मांची प्रतीके या हॉलमध्ये ठळकपणे ठेवलेली आहेत.सरांच्या खुर्चीच्या बरोबर मागे विठुरायाची भव्य प्रतिमा आहे. या प्रतिमेचे उजवीकडे संत ज्ञानेश्वर आणि डावीकडे संत तुकोबांची प्रतिमा आपण पाहतो. सर येथे आल्यावर विठुरायाला नमस्कार करतात आणि मग कामाला सुरुवात होते. सरांच्या टेबलासमोर पूर्वेच्या बाजूला प्रभू रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती एका काचेच्या दालनात आहेत. या मूर्ती कराड सरांचे मूळ गाव रामेश्वर (जिल्हा लातूर), येथील जिर्णोध्दार केलेल्या मंदिरातील प्रतिकृती आहेत. सतत समोर राम आणि मागे पांडुरंग यांच्या सानिध्यात असलेले कराड सर देशातील आणि जगातील एका मोठ्या शिक्षणसंस्थेचा कारभार हाकत बसलेले असतात.
कराड सर यांच्या नेतृत्वाखाली एमआयटीने स्वतंत्र विद्यापीठांच्या स्वरूपात नवी झेप घेतली आहे. कोथरूड, लोणी, उज्जैन अशा ठिकाणी एमआयटीची विद्यापीठे स्थापन झाली असून त्याचा कार्यभार पुढील पिढीतील डॉ.मंगेश कराड,प्रा.राहुल कराड, डॉ.सुनील कराड,डॉ.सुचित्रा
घागरे,स्वाती चाटे,ज्योती ढाकणे,डॉ.आदिती कराड हे सर्वजण सांभाळत आहेत.
गेली जवळपास चार दशके या शिक्षण संस्थांचा कारभार विस्तारत असतानाच कराड सरांच्या मनातील वारकऱ्याने मराठी आणि भारतीय संस्कृतीला एक मोठे योगदान दिले आहे. विशेषत: यावर्षी संत ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीची सप्त शताब्दी रौप्यजयंती साजरी होत असताना त्यांनी केलेले योगदान आवर्जून अधोरेखित केले पाहिजे.
कराड सरांच्या ८२ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या काही ठळक गोष्टी मी पुढीलप्रमाणे नोंदवतो.
संत ज्ञानदेवांच्या श्री क्षेत्र आळंदीत विश्वशांती केंद्राची स्थापना झाली आहे. यामागची प्रेरणा संत ज्ञानदेवांच्या पसायदानाची. या प्रेरणेने त्यांना फार मोठे बळ दिले आहे आणि त्या बळावर ते मोठी कामे करू शकले आहेत. पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात कार्यक्रमाच्या सांगतेप्रसंगी पसायदान म्हणण्याची व्यापक पद्धत कराड सरांच्या आग्रहामुळे सुरू झाली हे लक्षात घेतले पाहिजे. या पसायदानाचे इंग्रजी रूपांतरही कराड सरांनी केले आणि आता ते जगभर पोहोचले आहे.
संत श्रेष्ठ ज्ञानदेव यांचे आळंदी आणि जगद्गुरू तुकोबारायांचे देहू या मराठी माणसांच्या मनातील पावनतीर्थांना सुनियोजित रित्या विकसित करण्याचा संकल्प सरांनी सोडला आणि तो त्यांनी साकार केला आहे. ज्ञानोबा तुकोबाचा नामघोष करत ते स्वतः अनेक वर्षे पंढरपूरची वारी करत आले आहेत. पंढरपूरलगतच्या वाखरी मध्ये त्यांनी आपल्या ज्येष्ठ भगिनी प्रयाग अक्का यांच्या स्मरणार्थ वारकरी निवास उभे केले आहे.
गेली सुमारे बारा वर्षे
एमआयटीच्या वतीने संत ज्ञानदेवांच्या नावे जागतिक शांतता पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार देताना ज्या ज्ञानदेवांनी साऱ्या विश्वाचे आर्त जाणले त्यांचेच नाव या पुरस्काराला द्यावे, याबाबत कराड सर आणि त्यांचे बंधुतुल्य स्नेही ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ.विजय भटकर यांचे एकमत झाले आणि मग हा पुरस्कार सुरू झाला.
या पुरस्काराचा सोहळा देखील अतिशय अपूर्व असा असतो.कोथरुड एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या प्रांगणात २०१७/१८ साली अमेरिकेतील चर्चेसचे एक विद्वान पंडित
ख्रीस्थोपरसन यांची निवड झाली आणि त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नोबेल शांतता पुरस्कार समितीचे माजी अध्यक्ष डॉ. मायकेल नोबेल हेही उपस्थित राहिले होते. युनेस्को अध्यासनाच्या करार आणि जगातील अनेक
विद्यापीठांबरोबर एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे नाते जोडले गेले आहे.
संतांच्या वैश्विक विचार परंपरांशी नाते जोडत काही वर्षांपूर्वी कराड सरांनी आळंदीचे आणि सूफी संतांच्या अजमेर दर्ग्याचे नाते जोडले. या दर्ग्याची पवित्र चादर तत्कालीन केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत सरांनी आळंदी समाधीस्थानापर्यंत आणली आणि या देशातील दोन धर्म प्रवाहांना नम्रपणे जोडण्याचा प्रयत्न केला.
अमेरिकेतील जागतिक धर्म परिषदेत १८९३ साली स्वामी विवेकानंदांनी केलेले भाषण हे कराड सरांना ऐतिहासिक महत्त्वाचे वाटते आणि त्याचा खोलवर प्रभाव त्यांच्या अंत:करणात आणि विचारांवर झाला आहे, हे त्यांच्याशी बोलताना जाणवते. या परिषदेप्रमाणे जागतिक धर्म परिषद २०१५ साली अमेरिकेतील सॉल्ट लेक सिटी परिसरात घेण्यात आली होती. या परिषदेसाठी कराड सर तेथे गेले होते. विवेकानंदांच्या १८९३ च्या अमेरिकेतील सुविख्यात व्याख्यानाचा संदर्भ देऊन त्यांनी आपले विचार मांडले होते. यानिमित्ताने धर्माचा आणि अध्यात्माचा विधायक विचार करणारे विचारवंत व अभ्यासकांचा सरांशी जवळून संपर्क आला. त्यांच्याशी
बोलतानाही कराड सरांनी ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे आमचे संत तत्त्वज्ञ आहेत, असे प्रतिपादन केले. आधुनिक जगातील अल्बर्ट आईन्स्टाईन सारख्या विचारवंत वैज्ञानिकांच्या विचारांचा मागोवा घेत नवे
भानही आपल्या वक्तव्यात जाणीवपूर्वक व्यक्त करतात. सॉल्ट लेक सिटीमधल्या त्यांच्या भाषणाला हजारो उपस्थितांनी स्टँडिंग ओव्हेशनचा प्रतिसाद दिला आणि टाळ्यांचा गजर सुरू ठेवला होता…
ज्ञानदेव तुकोबा यांच्या विचारांचा मागोवा घेतच जागतिक व्यासपीठावर कराड सरांनी विवेकानंदांचा विचार मांडायला सुरुवात केली.एमआयटीमध्ये १९९६ साठी भरलेल्या जागतिक तत्वज्ञान परिषदेत त्यांनी विवेकानंदन आणि आईन्स्टाईन यांच्या विचारांचा धागा जोडत मांडणी करायला सुरुवात केली.
जागतिक परिप्रेक्ष्यात भारतीय संतांचे स्थान शोधण्याचा कराड सरांचा प्रयत्न त्यापूर्वी वीस वर्ष सुरू होता आणि तो वैचारिक, बौद्धिक असा शोध त्यांनी विख्यात तत्वज्ञ, अभ्यासक प्रा. डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला. त्याबाबत कराड सरांशी बोलणे आणि तो त्यांचा अनुभव ऐकणे, हा एक वेगळाच आनंद असतो. सरांनी अलीकडेच वर्षभरापूर्वी ‘फ्रेंड्स यू मे बिलिव्ह इट ऑर नॉट: रियलायझेशन ऑफ गॉड- द युनिव्हर्सल ट्रुथ अँड एक्सपिरियांसिंग पीस’, हा सुमारे साडेतीनशे पानांचा ग्रंथ लिहिला आहे. डॉ. बारलिंगे सरांबरोबर कराड सरांशी जी वैचारिक चर्चा झाली ती आपल्याला यात वाचायला मिळते. सरांनी हे संदर्भ अनेक अनौपचारिक भेटीत माझ्याशी बोलतानाही शेअर केले होते. ही चर्चा कराड सरांच्या मूळ ग्रंथात वाचली पाहिजे,इतकी ती मोलाची आहे.
डॉ. बारलिंगे यांना कराड सरांनी विचारले,” संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांचा उल्लेख तत्वज्ञ म्हणून का होत नाही?” त्यावर बारलिंगे सरांनी,” तुम्ही तत्त्वज्ञान विषयाचे विद्यार्थी आहात का? आणि तुम्ही यांचा अभ्यास केलेला आहे का?” असा प्रश्न त्यांना विचारला. बारलिंगे सर पुढे म्हणाले की, हे सर्व संत धार्मिक व्यक्तिमत्व म्हणून जगात ओळखले जातात. तत्त्वज्ञानाच्या जगात त्यांची वेगळी अशी ओळख नाही. त्यावर कराड सरांनी पुन्हा बारलिंगे सरांना विचारले, मग जगात हे ठरवते कोण ?त्यानंतर मग एका जागतिक परिषदेचे आयोजन एमआयटीच्या प्रांगणात करण्यात आले आणि तिथे व्यापक विचारमंथन काही दिवस चालले. संत ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीच्या सप्त शताब्दी वर्षाच्या काळात हे विचारमंथन जगातील नामवंत तज्ञ विचारवंत अभ्यासकांच्या उपस्थित पार पडले ही परिषद २४ नोव्हेंबर ते ३०नोव्हेंबर १९९६ या काळात झाली.या परिषदेच्या समारोपात इस्लामचे विद्वान जाणकार जनाब मौलाना वाहीउद्दीन खान यांनी जगभरातील प्रतिनिधींना सांगितले की, संत ज्ञानेश्वर हे जगातील एक महान तत्त्वज्ञ आहेत आणि जगाने त्यांचा तसा गौरव केला पाहिजे, तशी जागतिक मान्यता दिली पाहिजे. डॉ. बारलिंगे आणि डॉ.कराड या दोघांचे डोळ्यात यावेळी अश्रू दिसत होते.
यानंतर जवळपास वीस वर्षांनी
कराड सरांनी पुणे सोलापूर रस्त्यावरील लोणी राजबागेच्या जागेत संत ज्ञानेश्वर विश्वशांती प्रार्थना सभागृह वैश्विक घुमट उभारणीला सुरुवात केली.त्याचे उद्घाटन २०१८ साली भारताच्या उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. आज त्याला जोडूनच गीता भवन उभारण्यात आले आहे.
आपल्या शैक्षणिक कार्याच्या वाटचालीत भारतीय संस्कृतीला डॉ. कराड सरांनी जे योगदान दिले,ते एवढ्यावरच पूर्ण होत नाही. वयाची ऐंशी उलटल्यानंतरही गेल्यावर्षी बद्रीनाथ येथे जाऊन कराड सरांनी डॉ. विजय भटकर, पंडित वसंतराव गाडगीळ यांच्याबरोबर भारतीय संस्कृतीचा आरंभबिंदू असलेल्या सरस्वतीचे मंदिर उभे केले आहे.ज्ञानोबा,तुकोबा आणि विठुरायाच्या मूर्ती आता तिथे प्रतिष्ठापीत करण्यात आल्या आहेत. विश्वशांती केंद्र आणि एमआयटीच्या वतीने सुमारे अडीचशे ते तीनशे वारकरी भक्त बद्रीनाथ येथे मंदिर उभारणीसाठी उत्तराखंडमध्ये गेले होते. विलक्षण अशा थंडीत हे मंदिर तिथे उभे राहिले. भारतीय संस्कृतीच्या आरंभबिंदूचे एक संघटित आणि सगुण असे रूप आता तिथे आपल्याला पाहायला मिळते.
आज ८२ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय संस्कृतीसाठी आणि ज्ञानोबा, तुकोबाची महती गात कराड सर पुढे निघाले आहेत. त्यांना उदंड शुभेच्छा आणि दीर्घायुरारोग्य लाभो हीच आपल्या सर्वांची मनोकामना आहे.