इचलकरंजी : प्रतिनिधी
येथील रोटरी क्लब या संस्थेच्या वतीन ‘रोटरी सेंट्रल अन्न उत्सव – फूड फेस्टिवल’ हा उपक्रम मोठ्या स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली, सातारा, मिरज, बेळगाव इत्यादी शहरातील तसेच दिल्ली, पंजाब, राजस्थान, सिक्कीम या राज्यातील नामांकित हॉटेल्स आणि केटरिंग व्यावसायिकांचे फूड स्टॉल त्याचबरोबर विविध ग्राहक उपयोगी वस्तूंचे प्रदर्शन या ठिकाणी होणार आहे.
दिनांक १९ जानेवारी ते २४ जानेवारी २०२३ या कालावधीत दररोज दुपारी ४ ते रात्री १० पर्यंत राजीव गांधी सांस्कृतिक भवन इचलकरंजी येथे हा उपक्रम होत आहे. या ठिकाणी महाराष्ट्रीयन, गुजराथी, साउथ इंडियन, पंजाबी, कॉन्टिनेन्टल, फास्ट फूड, पॅकिंग फूड, कबाब, चाट, तंदूर अशा प्रकारचे शाकाहारी आणि मांसाहारी रुचकर खाद्यपदार्थ उपलब्ध असतील. समाजातील सर्व जाती धर्म तसेच श्रीमंत गरीब नागरीक वर्गासाठी त्याचबरोबर शहरातील हॉटेल व्यावसायिक आणि घरगुती व छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसाय वाढीसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणारा आहे.
सदर उपक्रमाचे उदघाटन गुरुवार दिनांक १९ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता रोटरी प्रांत ३१७०चे प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे, बेळगाव यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार प्रकाशराव आवाडे यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असून सहाय्यक प्रांतपाल पन्नालाल डाळ्या यांची सन्माननीय उपस्थिती राहणार आहे.
सदरच्या उपक्रमाचा समारोप मंगळवार दिनांक २४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता प्रमुख पाहुणे खासदार अण्णासाहेब ज्वोले, चिकोडी आणि सौ. शशिकला ज्वोल्ले – कॅबिनेट मंत्री कर्नाटक राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. यावेळी रोटरी प्रांत ३१७०चे नामनिर्देशीत प्रांतपाल अरूण भंडारे आणि सिग्नेचर प्रोजेक्टचे प्रांत सेक्रेटरी राजेश सुराणा हे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर या उपक्रमास शुक्रवार दिनांक २० जानेवारी रोजी खासदार धैर्यशील माने सदिच्छा भेट देणार आहेत तर रविवारी २२ तारखेला माजी आमदार सुरेशराव हाळवणकर भेट देणार आहेत.
अन्न उत्सव उपक्रमाच्या ठिकाणी दर्शकांसाठी दररोज मनोरंजनाचे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये हिंदी व मराठी गीत गायन, लाईव्ह आर्केस्ट्रा, लाईव्ह बँड, ग्रुप डान्स व मिमिक्री, फनी गेम्स आणि कराओके गीत गायन अशा कार्यक्रमांचा समावेश आहे. त्याचबरोबर दिनांक २०, २१ आणि २२ जानेवारी रोजी कडधान्यापासून तिखट व गोड पदार्थ, सॅलड आणि चिकन पासून स्नॅक्स पदार्थ या पाककला स्पर्धा होणार आहेत. सदरच्या उपक्रमात दररोज निवडक रसिकांसाठी आकर्षक भेटवस्तूही देण्यात येणार आहेत. तरी या अन्न उत्सव उपक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी शहर व परिसरातील नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.