19.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*'चला जाणुया नदीला’ उपक्रमाची आढावा बैठक*

*’चला जाणुया नदीला’ उपक्रमाची आढावा बैठक*

जलसंवाद यात्रेतून नागरिकांना नदीसाक्षर बनविण्यासह मांजरा नदी प्रदुषण रोखण्यासाठी उपाययोजना आखणार – जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.


जिल्हात 11 जानेवारीपासून जलसंवाद यात्रेला प्रारंभ

लातूर, दि. 03 (जिमाका) : ‘चला जाणुया नदीला’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यात 11 जानेवारीपासून मांजरा नदी जलसंवाद यात्रेला सुरुवात होणार आहे. या यात्रेच्यामाध्यमातून नदी काठच्या गावांतील सर्वसामान्य नागरिकांना नदीसाक्षर बनविण्यासह पूर, नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी उपाययोजना आखल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज झालेल्या ‘चला जाणुया नदीला’ उपक्रमाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपजिल्हाधिकारी जीवन देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी एम. एस. दुशिंग, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूजल वैज्ञानिक एस. बी. गायकवाड, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी पी. व्ही. कांबळे, मांजरा नदी जलसंवाद यात्रेचे समन्वयक प्रा. डॉ. संजय गवई, सहसमन्वयक कॅप्टन प्रा. डॉ. बाळासाहेब गोडबोले, बी. पी. सूर्यवंशी, डॉ. गुणवंत बिरादार, वन विभागाचे सचिन रामपुरे, रवी नारायणकर यावेळी उपस्थित होते.

‘चला जाणुया नदीला’ उपक्रमातून मांजरा नदीच्या प्रदूषणाची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहेत. नदी काठच्या गावांमधील सर्वसामान्य नागरिकांना नदीसाक्षर बनविण्यासाठी प्रभातफेरी, व्याख्यान यासह विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी प्रबोधनासह प्रशासकीय स्तरावरूनही प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी नदीमध्ये झालेले अतिक्रमण, पुरामुळे होणारे नुकसान, पिण्याच्या पाण्याची समस्या, नदी काठची जमीन खरडून जाण्यासह नदी परिसरातील रस्ते याबाबतची माहिती संकलित करून त्याबाबत उपाययोजना आखल्या जाणार असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

मांजरा नदी जलसंवाद यात्रेस जिल्ह्यातील सारसा येथून 11 जानेवारी रोजी सकाळी प्रारंभ होणार आहे. यामध्ये संबंधित गावातील सर्व शाळा, महाविद्यालये यांच्या सहभागातून जलसाक्षरता, स्वच्छताविषयी जनजागृती करावी. तसेच प्रत्येक गावामध्ये वृक्षारोपण करावे. मांजरा नदी काठच्या गावांमधील जलसंवाद यात्रेच्या नियोजनासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी यांनी बैठक घेवून त्याबाबतचा आराखडा तयार करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या. मांजरा नदी जलसंवाद यात्रेसोबतच जिल्ह्यातील लेंडी, मन्याड, तावरजा आणि तेरणा नदी काठच्या गावांमध्येही जलसंवाद यात्रेचे आयोजन करावे. यासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी स्तरावर नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.

जलसंवाद यात्रेमध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जल नमुने तपासणीचे प्रात्यक्षिक आयोजित करावे. नदी काठच्या गावांमध्ये जलस्त्रोतांची तपासणी करून त्याविषयीची माहिती प्रसिद्ध करावी. तसेच गावातील सांडपाणी नदीमध्ये जाणार नाही, यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती द्यावी. तसेच यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून करावयाच्या कामांविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोयल यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यापूर्वी झालेल्या बैठकीत मांजरा नदीच्या प्रदुषणाची कारणे शोधण्याबाबत दिलेल्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी श्री. कांबळे यांनी नदी प्रदूषणाची माहिती सादर केली. नदीमध्ये शहरातील कोणतेही उद्योग, व्यावसयिक आस्थापानेतून दुषित पाणी सोडले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

प्रास्ताविकामध्ये समन्वयक डॉ. गवई यांनी मांजरा नदी जलसंवाद यात्रेच्या नियोजनाबाबत माहिती दिली. तसेच या यात्रेदरम्यान प्रत्येक गावामध्ये तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन, पथनाट्य, चित्ररथ आदी माध्यमातून लोकांना नदीचे स्वास्थ जपण्यासाठी काय काळजी घ्यावी, याविषयी माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जलसंवाद यात्रेच्या आराखड्याचे सादरीकरण केले. सहसमन्वयक कॅप्टन डॉ. गोडबोले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]