भागवत कथेच्या शेवटच्या दिवशी वीस हजार भाविक भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
लातूर ; दि.१ ( प्रतिनिधी ) – क्रांतिकारी महाराज म्हणून उभ्या महाराष्ट्राला ज्यांची ओळख आहे , त्या गातेगाव येथील पूजनीय विद्यानंदजी सागर महाराज (बाबा ) यांनी काल्याच्या कीर्तनामध्ये उपस्थित हजारो भाविक भक्तांना आपल्या कीर्तनाने मंत्रमुग्ध करून भक्ती रसात तल्लीन व्हायला लावून भक्ती रसात दंग केले . या काल्याच्या कीर्तनामध्ये जवळपास 20 हजार भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
श्री राधाकृष्ण सत्संग समितीच्या वतीने राजीव गांधी चौकातील पंचमुखी हनुमान परिसरात दि. 25 डिसेंबर 2022 ते 1 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये पूजनीय विद्यानंदजी सागर महाराज यांच्या अमोघ वाणीतील श्रीमद् भागवत कथाज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते . या भागवत कथेमध्ये महाराजांनी आपल्या अमोघवाणीने हजारो श्रोत्रवर्गांना मंत्रमुग्ध तर केलेच तसेच वेळोवेळी हितोपदेशही केला. वास्तविक पाहता कुठल्याही भागवत कथेमध्ये काल्याचे कीर्तन पहावयास मिळत नाही ; परंतु पूजनीय विद्यानंदजी सागर महाराज यांच्या भागवत कथेमध्ये काल्याचे कीर्तन हमखास होते. त्यानुसार रविवारी काल्याचे कीर्तन झाले. या काल्याच्या कीर्तनाचा लाभ हजारो भाविक भक्तांनी घेतला .भारतीय जनता पार्टीचे औसा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह अनेकांनी मंडपामध्ये हजेरी लावून बाबांचे काल्याचे कीर्तन पूर्णपणे श्रवण केले .
टाळ , मृदंगाच्या साथीने आणि सुश्राव्य भजनाच्या तालावर बाबांनी संपूर्ण भाविक भक्तांना भक्तीरसामध्ये तल्लीन तर केलेच आणि त्यांना भक्ती रसामध्ये अक्षरशः डोलायला लावले. " विठ्ठल माझा माझा माझा …विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा…" या भजनावर तर संपूर्ण सभामंडळ भाविकांनी डोक्यावर घेत नृत्याचा फेर धरीत भजनाचा आस्वाद घेतला.
पूजनीय विद्यानंदजी सागर महाराज यांच्या भागवत कथेला काल म्हणजे शनिवारी पूर्णाहुती झाली असली तरी आज काल्याच्या कीर्तनाने या सत्संगाला खऱ्या अर्थाने पूर्णविराम मिळाला , असेच म्हणावे लागेल . भागवत कथेच्या पूर्णावतीच्या आशीर्वचनात महाराजांनी पसायदान व राष्ट्रगीत म्हणून ही भागवत कथा राष्ट्राला अर्पित केली , असेच म्हणावे लागेल.
महाराज आपल्या कीर्तनात म्हणाले की, परमेश्वर हा फक्त भक्तीचा भुकेला असतो, प्रेमाचा भुकेला असतो … तो तुमच्या प्रसादाला , दक्षिणेला किंवा हळदी कुंकवाला भुकेला नसतो. आपण देवाला जे द्यायचे ते द्यायचे असते . परमेश्वर तुमच्याकडून काहीही मागत नाही .फक्त तो भक्ती मागत असतो. आपण दररोज वेगवेगळ्या मंदिरामध्ये जाऊन देवाची पूजा, आरती केलीच पाहिजे असेच काही नाही ज्याला जे शक्य असेल ते त्यांनी करावे.परंतु घरी बसून भक्तीभावाने त्याचे नामस्मरण केले तरी पुरेसे आहे. परंतु ज्याला खरी गरज आहे त्याला अन्नदान द्यावे .ज्ञानदाना बरोबरच अन्नदानही तेवढेच महत्त्वाचे असते. परमपिता परमेश्वराला शुद्ध अंत:करणाची, प्रेमाची गरज असते असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जोपर्यंत आपल्याला देहाची आसक्ती असते तोपर्यंत परमात्म्याची आसक्ती आपल्याला कधीच लागत नाही.
सप्ते लावण्याचे दलाल तयार झाले.
धर्माला ग्लानी आली आहे असे काही तथाकथित महाराज आपल्या प्रवचन, कीर्तनामध्ये सांगून भोळ्या- भाबड्या भक्तांची दिशाभूल करीत असतात. हा महाराज आपल्या संप्रदायाचा नाही असाही अपप्रचार आपल्याबद्दल केला जातो हे सांगताना विद्यानंदजी महाराज म्हणाले , धर्माला ग्लानी आली आहे , वारकरी संप्रदाय अडचणीत आला आहे असे सांगणारे तथाकथित महाराज व कीर्तनकार हे खऱ्या अर्थाने सर्वांची दिशाभूल करत आहेत. अशा लेच्यापेच्या विचारांच्या माणसांनी धर्माला संकटात टाकण्याचे काम केले आहे. अनेक ठिकाणी भागवत सप्ताह किंवा इतर सप्ताहाचे आयोजन केले जाते .त्यावेळी कुठल्या कीर्तनकार , प्रवचन व कथाकरांना तसेच साथ संगत करणाऱ्यांना भजनी मंडळांना बोलवायचे याचे नियोजन करण्याचे काही जणांनी कंत्राट घेतलेले आहे धार्मिक कार्यक्रमात दलाली करणारे खऱ्या अर्थाने आपल्या धर्माचे शत्रू आहेत , असेच म्हणावे लागेल . दलालीच्या नावाने सप्ते सुरू झाले आहेत हे खरे दलाल वारकरी संप्रदाय व धर्म बुडवायला निघाले आहेत. माझ्या भावा- बहिणींनो , माता-पित्यांनो हे अगोदर समजून घ्या. माझ्या बोलण्यावर ,रागावण्यावर किंवा माझ्या शब्दावर जाऊ नका. माझा भाव लक्षात घ्या ..तुमची दिशाभूल जे लोक करीत आहेत त्यांच्यापासून सावध राहण्यासाठी मला असे कठोर शब्द वापरावे लागतात , असेही बाबांनी स्पष्ट केले.
देवभोळे , अंधश्रद्धाळू बनू नका
तुम्ही देव भोळे बनू नका तुमचा अंधश्रद्धा बनवू नका तुम्ही तुमचा विवेक जागृत ठेवा स्वतःला ओळखायला शिका समाजाची दिशाभूल करणाऱ्यांपासून सावध राहा असे कळकळीचे आवाहनही पूजनीय बाबांनी काल्याच्या कीर्तनामध्ये बोलताना केले.
१८ व्या महायज्ञाचे लवकरच आयोजन
श्री राधाकृष्ण सत्संग समितीचे अध्यक्ष व या कथेचे संयोजक संजय बोरा यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये लातूर नगरीमध्ये अठराव्या महायज्ञाचे आयोजन करण्यात यावे , त्याची संपूर्ण जबाबदारी ही समिती घेईल आणि हा यज्ञ यशस्वी करून दाखवेल असे आवाहन केले होते .त्याला प्रतिसाद देत पूजनीय विद्यानंदजी सागर महाराज यांनी या नवीन वर्षाच्या शेवटी किंवा पुढील वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये लातूर नगरीमध्ये १८ वा महायज्ञ घेण्यात येईल अशी घोषणा केली .त्यावेळी संपूर्ण सभागृहाने टाळ्याच्या कडकडाटात त्यांच्या या घोषणेचे स्वागत केले.