मुंबई;( प्रतिनिधी) –
“स्वतःचे जीवनचरित्र लिहिणे सोपे नसते .त्यात ते प्रामाणिकपणे सर्वांसमोर मांडणे खूप अवघड असते. पण लेखिका सौ वर्षा महेंद्र भाबल यांनी हे सारे “जीवन प्रवास” या त्यांच्या आत्म चरित्रात उघडपणे व अतिशय उत्कृष्ट शैलीत मांडले आहे. व्यक्तिगत जीवनावर आधारीत हे पुस्तक सामाजिक स्थित्यंतराचा ऐतिहासिक मूल्य असलेले दस्तावेज आहे,असे मत या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ज्येष्ठ लेखक व समीक्षक प्रा.अविनाश कोल्हे यांनी व्यक्त केले.
कोकणातील एका खेड्यात जन्मलेल्या, गावातील पहिली दहावी पास झालेल्या, स्वकर्तृत्वाने स्वतःचे जीवन घडविलेल्या गाबित समाजातील सौ.वर्षा महेंद्र भाबल यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास उलगडणाऱ्या “जीवन प्रवास” या पुस्तकाचे शानदार प्रकाशन नुकतेच मुंबईत झाले.त्या प्रसंगी प्रा कोल्हे बोलत होते.

यावेळी न्यूज स्टोरी टुडे चे संपादक देवेंद्र भुजबळ म्हणाले , वर्षा महेंद्र भाबल यांचा “जीवन प्रवास” हे पुस्तक म्हणजे त्यांचे जीवनपट उलगडणारे कोडे आहे. त्या प्रांजलपणे व निर्भीडपणे आपल्या भावनांशी प्रामाणिक राहून जीवन जगल्या आहेत. इतकेच नव्हे तर मोकळे पणाने त्यांनी स्व:जीवन सर्वांसमोर उलगडले आहे.
पुस्तकाच्या प्रकाशिका सौ. अलका भुजबळ यांनी पुस्तक प्रकाशना मागील भूमिका स्पष्ट करीत लेखिकेचे कौतुक केले.तसेच सुंदर भाष्य करत शुभेच्छा दिल्या.
लेखिका वर्षा महेंद्र भाबल यांनी आपल्या मनोगतातून आपला “जीवन प्रवास” कसा घडला, हे
संदर्भासहित उलगडून करून रसिकांची मने जिंकली. हा जीवन प्रवास क्रमशः प्रथम न्यूज स्टोरी टुडे पोर्टलवर प्रसिध्द करून लेखनासाठी सतत प्रवृत्त केले, याबद्दल आभार व्यक्त केले.
श्री अशोक साई खरात यांच्या अमृतधारा प्रिंटिंग आणि पब्लिकेशन ने मुद्रण केलेले हे पुस्तक अतिशय देखणे झाले असून फार वाचनीय आहे,असे साहित्यिक श्री शांतीलाल ननवरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
महाराष्ट्र राज्य गाबित समाजाचे अध्यक्ष सुजय धुरत आपल्या अध्यक्षीय म्हणाले, वर्षा महेंद्र भाबल यांनी “स्वतःमध्ये माणुसकी जागृत ठेवली. आयुष्यात येणाऱ्या सर्व चढउतारात महेंद्र आणि वर्षा या दोघांनी धरलेला हात कधी सुटू दिला नाही.चांगल्या संस्कारातील त्यांनी दोन गोष्टी जपल्या, त्या म्हणजे “जोडणे” आणि “जपणे.” आपल्या जीवन प्रवासात त्यांनी निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांची संख्याही वाढवत नेली. त्यांनी आपल्या आयुष्यात जी माणसे जोडली ती त्यांच्या आयुष्यभराची कमावलेली संपत्ती होय.”
यावेळी उच्च शिक्षण घेऊन यशस्वी कामगिरी करीत असलेल्या
डॉ.सुशांत भाबल,डॉ. जुई प्रल्हाद भाबल, डॉ. भक्ती टिकम,
डॉ. अनिल पराडकर यांना विशेष सन्मान चिन्ह देऊनगौरविण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्वश्री संतोष कदम व महेंद्र भाबल यांनी केले.कार्यक्रमास विविध मान्यवर, साहित्य प्रेमी,स्नेही ,मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.