घरात सर्व काही आहे आणि शिकण्याची इच्छा नाही आणि घरात काहीच नाही पण शिकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे असे विरोधाभास मला वस्तीवरील मुलांच्या संपर्कात आल्यापासून पदोपदी जाणवायला लागले.
सुनीता अशीच अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने शिकणारी मुलगी. कुठलीच परिस्थिती तिला अनुकूल नाही पण त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ती शिकत आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगावचे प्रल्हाद गिरी भिक्षा मागून आपला संसार चालवत होते. शिक्षण तिसरी पास. एका नंतर एक असे त्यांना नऊ अपत्य झाली. भिक्षेवर एवढ्या मोठ्या परिवाराचे भरणपोषण करणे त्यांना अशक्यच होते. शेवटी मोठा मुलगा संतोष कृत्रिम दागिन्यांचा व्यवसाय करत गावोगावी फिरू लागला. तरीही प्रश्न प्रश्न आणि प्रश्नच होते.
शेवटी मिळेल ते काम करायला घरातील सर्वच जण लागले. असेच फिरस्तीवर असताना अंबाजोगाईत त्यांचा मुक्काम होता. थोडे फार चांगले काम मिळायला लागले. जोगाईवाडी परिसरातील MIDC भागात ते आपले पाल ठोकून राहू लागले.
सुनीता ही प्रल्हाद गिरीचे सहावे अपत्य. जोगाईवाडी जिल्हापरिषद शाळेतील सावंतसरांची नजर ह्या पालावर राहणाऱ्या गिरी कुटुंबावर गेली. त्यांनी सुनीता,पूजा आणि सचिनला शाळेत घालण्या बाबत विनंती केली. त्यांनी त्याचा खूपच पाठपुरावा केला. सुनीता आणि पूजाला वया नुसार थेट पाचवीला प्रवेश दिला. फक्त अक्षर ओळख असणाऱ्या सुनीताला अभ्यासाची आवड लागली व तिची प्रगती खूपच चांगली होऊ लागली. याच काळात तिला चित्र काढायला पण आवडायला लागले.
कोविडची महामारी सुरू झाली आणि गिरी कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढवले. परिसराचे सर्वेक्षण करत असताना माझी त्यांची गाठभेट झाली. आपली भूक विसरण्यासाठी चित्र काढत बसणाऱ्या सुनीता पाहून मन हेलावून गेले.
सुनीता आता आठवीत आहे. सकाळी भल्या पहाटे तिचा दिवस सुरू होतो. घरातील कुणी उठायच्या आधी उठून ती सकाळी इंग्रजीचे शब्द पाठ करत बसते. तिच्याकडे इंग्रजी शब्दकोश (Dictionary) नसल्याने ती आपल्या मैत्रिणीकडील Dictionary तुन दररोज शब्द वहीत लिहून आणते. शब्द पाठ झाले की सुनीताचे कामं सुरू होतात. घरातील भांडे घासणे,धुनी धुणे आणि वेळ पडली तर स्वयंपाक करणे हे सगळे करून ती शाळेला निघते. शाळेच्या बसने ती तीन किलोमीटरवर असणाऱ्या शाळेत जाते.
काही दिवसांपासून बस गच्च भरून येऊ लागली. मुलींना बस मध्ये चढणे अवघड होऊन बसले त्यात त्या वर चढल्या तर वयात आलेल्या मुलांचे त्यांना त्रास देणारे विकृत चाळे. सुनीताला शाळेत जाणेच असह्य झाले होते. ती काही दिवस शाळेत गेली नाही. शाळेची प्रचंड आवड असणारी सुनीता शाळा बुडवून घरी बसतेय हे मला पचनी पडणारे नव्हते.काही दिवसांपूर्वीच तिने तालुका पातळीवर चित्रकला स्पर्धेत द्वितीय बक्षीस पण मिळवले होते. तिच्याशी बोलल्यावर तिच्या मनातील सल मला कळली. तिला शाळेत रिक्षाने जाण्यासाठी लागणारी रक्कम मी तिला लगेच दिली. ती इवलीशी मदत मात्र सुनीताच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद देणारी होती.
सुनीता शाळेतून परत येते पाच वाजता. आल्यावर थोडं काही खाल्ले की तिला पाणी भरावे लागते मोठ्या हंड्याने. ते झाले की ती आपल्या आनंद शाळेत येते. त्यानंतर ती अभ्यासाला बसते. मला नवल वाटले ती सलग पाच तास म्हणजे संध्याकाळी सात ते रात्री 12 वाजेपर्यंत अभ्यास करते. घरातील सर्वात उशिरा झोपणारी आणि सर्वात लवकर उठणारी सुनीता आहे. घरातील सर्वांना तिला आता अभ्यास बस कर आणि झोप म्हणावे लागते. सुनीताच्या या मेहनतीने ती आज अनेक विषयात 100 %मार्क घेतेय.
अभ्यासाच्या बरोबरच ती घराला आर्थिक हातभार लागावा म्हणून शेतातील कामे करायला रविवारी शनिवारी रोजाने जाते. सोयाबीन काढणे प्रचंड अवघड पण ते काम पण खूप कौशल्याने करते. आम्ही झेंडूच्या फुलांचा हार बनवण्याचा उपक्रम घेतला होता. त्यात सर्वात जास्त कमाई करणारी जोडी म्हणजे सुनीता आणि पुजाची जोडी.
ती जे काही करते ते अगदीच मनातून करते. हे सर्व करून ती मुलखाची शांत आहे. नेहमीच एक छान स्मित तिच्या चेहऱ्यावर असते.
तिच्याकडे पाहिल्यावर एक नवीनच प्रेरणा आम्हाला मिळते. मला माहित नाही भविष्यात काय होईल. ती किती शिकू शकेल ? घरचे लोक तिला किती शिकू देतील? शिकून तिचे पुढे नेमके काय होईल ? खुप सारे प्रश्न डोक्यात येतात….मन सुन्न होऊन जातं.
तिला प्रचंड अडचणी येणार आहेत. खूप अवघड गोष्टींना तिला सामोरे जावे लागणार आहे. एक तर ती मुलगी आहे.गरीब घरची आहे आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ती आता प्रचंड मेहनत करत आहे.
सुनीता तुला लढायचे आहे..नाही नाही तर लढावेच लागेल तुला आणि खूप शिकावे पण लागेल. कारण तुझ्या मुळे अनेकांना एक आदर्श मिळणार आहे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी होण्याचा !!
लेखन :प्रसाद चिक्षे , अंबाजोगाई