ग्रंथोत्सवासारख्या उपक्रमांमुळे वाचन संस्कृती वाढून विचारविश्व समृद्ध होण्यास मदत-अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे
• दोन्ही दिवस साहित्यप्रेमी, वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर, दि. 22 (जिमाका) : ग्रंथोत्सवामुळे विविध ग्रंथ एकाच छताखाली उपलब्ध होण्यासोबतच यानिमित्त आयोजित विविध परिसंवाद, मुलाखतीमधून वाचकांना वैचारिक मेजवानी मिळते. त्यामुळे
ग्रंथोत्सवासारख्या उपक्रमांमुळे वाचन संस्कृती वाढून विचारविश्व समृद्ध होण्यास मदत होत असल्याची भावना अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी व्यक्त केला.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल) येथे आयोजित दोन दिवसीय ‘लातूर ग्रंथोत्सव 2022’च्या समारोपीय कार्यक्रमात श्री. लोखंडे बोलत होते. शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे, शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. जयद्रथ जाधव, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे यावेळी उपस्थित होते.
आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाविषयी जाणून घेण्यासाठी ग्रंथवाचन आवश्यक आहे. पुस्तकांमुळे आपल्या ज्ञानात वाढ होते, आपले हक्क, अधिकार, कर्तव्ये याची जाणीव होण्यासाठी ग्रंथवाचन आवश्यक असून प्रत्यकाने ग्रंथ वाचनाची आवड जपली पाहिजे. ग्रंथोत्सवासारखे वाचन संस्कृतीला चालना देणारे, वैचारिक मंथन करणारे कार्यक्रम यापुढेही नियमितपणे आयोजित होणे आवश्यक असल्याचे श्री. लोखंडे यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर ग्रंथोत्सवामुळे वाचकांना चांगली वैचारिक मेजवानी मिळाली आहे. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रत्येकाला वाचनाचे स्वातंत्र्य देण्याची आवश्यकता असून काय वाचावे किंवा वाचू नये, याविषयीची बंधने घालणे चुकीचे आहे. प्रत्येकाला वाचनातूनच याविषयीचे ज्ञान मिळते, असे सांगून औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील शाळांमध्ये ‘एक तास वाचनाचा’ हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले.
वाचनामुळे माणसाचे व्यक्तीमत्व विवेकी बनते. त्यामुळे समाजातील वाईट प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी वाचन संस्कृती रुजविणे आवश्यक आहे. यासाठी शालेय जीवनापासूनच वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी प्रयत्न व्हावेत. तसेच ग्रंथाचे केवळ वाचन न करता त्यातील आशय समजून घेण्याची क्षमता प्रत्येकात विकसित होणे आवश्यक असल्याचे डॉ. जाधव यावेळी म्हणाले. तसेच ग्रंथोत्सवामध्ये दोन्ही दिवसांत विविध विषयांवर प्रभावी मांडणी झाल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. गजभारे यांनी, तर सूत्रसंचालन माधव बावगे यांनी केले. सोपान मुंडे यांनी आभार मानले.
उत्कृष्ट वाचकांचा सन्मान
ग्रंथोत्सव समारोपीय कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट वाचकांचा सत्कार अपर जिल्हाधिकारी अरविंद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. सार्वजनिक वाचनालयाचे सभासद असलेल्या व जास्तीत जास्त ग्रंथ वाचन केलेल्या 18 वाचकांना यावेळी सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.
ग्रंथ प्रदर्शनी व विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद
‘लातूर ग्रंथोत्सव 2022’निमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनी व विक्रीला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याठिकाणी उभारण्यात आलेल्या अकरा दालनांमध्ये विविध विषयांवरील ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध होते. दोन दिवसात सुमारे दोन लाख रुपयांची ग्रंथविक्री झाली. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ग्रंथोत्सवात मराठवाडा मुक्तीसंग्रामाविषयी माहिती देणारी दुर्मिळ वृत्तपत्रे, बातम्यांची कात्रणे आणि छायाचित्रांचे दालन तयार करण्यात आले होते. या दालनासही साहित्यप्रेमी, वाचकांनी भेट दिली.