वारसा लातूरचा.. ( भाग 1 )
लेखमालिका
जागतिक वारसा सप्ताह 19 नोव्हेंबर पासून 25 नोव्हेंबर पर्यंत असतो.. आपला संपन्न वारसा लोकांना कळावा त्याचे जतन व्हावे… तो वारसा गौरविला जावा… हा सप्ताह मागचा उद्देश आहे. त्यानिमित्ताने लातूर जिल्ह्यातील नागरिकांना आपलाही संपन्न वारसा कळावा म्हणून आम्ही 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर ” वारसा लातूरचा” ही लेखमाला देत आहोत…!!
लातूर जिल्ह्याला प्रचंड अभिमानाचा वारसा मिळाला आहे. त्या वारसाचे पुरावे ग्रंथात जागोजागी पाह्यला मिळतात.. त्यात “रत्नापूर महात्म्य’, ‘ जैमिनी अश्वमेध’ आणि ‘स्कंध पुराण’ यात आढळतो. या बरोबर नव्या काळातील पुरातत्वीय संशोधनात्मक ग्रंथातही अत्यंत गौरवशाली इतिहास असल्याचे पानोपानी अधोरेखित केले आहे. यात प्रसिद्ध इतिहास संशोधक ग.ह. खरे, लातूर जिल्ह्यातील शिरूर ताजबंद येथील सुपुत्र आणि लातूर जिल्ह्याचा वारसा शोधण्यासाठी गावोगावी फिरून ताम्रपट आणि त्यासह अनेक दस्तऐवज गोळा करून जिल्ह्याचा अनमोल इतिहास महाराष्ट्राला देणारे सु. ग. जोशी, प्रसिद्ध इतिहास लेखक वि. भि. कोलते, ग. वा. तगारे, यांच्यासह अनेक लेखकांनी लातूर संदर्भात भरभरून लिहलं आहे.
लातूर शहरातील पापविनाश मंदिर तिथला शिलालेख, सिद्धेश्वर मंदिर शिलालेख, गणेशवाडी, शिरूर अनंतपाळ, पाणगाव, रेणापूर, निलंगा,औसा, उदगीर… हे गाव इतिहासाच्या पानांतून जिल्ह्याचा समृद्ध इतिहास घेऊन… त्या इतिहासाच्या खुणा आजही समृद्ध वारसा घेऊन उभ्या आहेत. त्या वारसा खुणा अधिक गडद व्हाव्यला हवा.. जो इतिहास पानात आहे तो मना पर्यंत पोहचावा यासाठी अनेक संदर्भ एकत्र करून ही लेख माला लिहीत आहोत.
आम्ही पूर्वीच सांगितल्या प्रमाणे अर्ध्या भारतभूमीवर ज्या महापराक्रमी राष्ट्रकुट साम्राज्याची सत्ता होती. त्यांची वतनभूमी लातूर म्हणजेच लत्तलूर होती, हे सिद्ध झाले आहे. तसेच या जिल्ह्याच्या भूप्रदेशावर सातवाहन, कलचुरी, राष्ट्रकूट, चालुक्य, होळसळ, यादव या राजघराण्यांनी मुघल, निजामशाही पूर्व काळात इथं वैभवशाली राज्य केल्याचे पुरावे इथल्या शिलालेख, ताम्रपट आणि प्राचीन कागदपत्रावरून आढळतात… राष्ट्रकुटाचे वतनगाव लातूर म्हणजेच लत्तलुर होते… आणि त्यांच्या ज्या मानपूर, विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील एलीचपूर ( आजचे आचलपूर ), कर्नाटक राज्यातील आजच्या कलबुर्गी जिल्ह्यातील मान्यखेत या शाखा होत्या. त्या त्या ठिकाणी सापडलेल्या शिलालेखावरून लत्तलूरपुरविनिर्गत, लत्तलूरपुरपरमेश्वर, लत्तलुरपुरवराधिश्वर, इत्यादी बिरूदाने त्यांना गौरविल्याचा उल्लेख आहे. हा प्रचंड वैभवी इतिहास … या भागाच्या प्राचीन समृद्धीचा पुरावा आहे.
लातूर जिल्ह्यातील लेण्या, प्राचीन मंदिरं, इथल्या बारवा खूप काही सांगून जातात. हे मंदिर त्या त्या काळातील फक्त धार्मिक नाही तर सांस्कृतिक खुणा पण विशद करतात. उदाहरणच द्यायचे झाले तर पानगावच्या मंदिराचे देता येईल. मुख्य मंदिर सोडून इतर ओवऱ्याचा भव्य भागाचा अभ्यास केल्यास विद्यादानापासून, कला उपासनेपर्यंतच्या अनेक बाबीपुढे येतात. खरोशाच्या लेण्याचा इतिहासपण अत्यंत दैदिप्यमान आहे. हे सगळं लातूर जिल्ह्यात आहे. वारसा सप्ताह निमित्ताने तुमच्या समोर ठेवत आहोत…
क्रमशः
@युवराज पाटील,
जिल्हा माहिती अधिकारी, लातूर