होय हा एक अनुभवच आहे, अनुभूती आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली लाखो भारतीयांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात प्रवेशगत होऊन आता काही दिवस झाले आहेत आणि विदर्भ मार्गे ती मध्यप्रदेश मध्ये जाणार आहे. काल याच मार्गावर हिंगोली येथे मी या यात्रेत सहभाग नोंदवला.
ही यात्रा जेंव्हा पासून सुरू झाली आहे तेंव्हा पासूनच हिच्या बद्दल एक उत्सुकता, कुतूहल होत. ही यात्रा हा एक चांगला प्रयोग आहे आणि हा जनमानस घडवण्याच्या दृष्टीने यशस्वी होईल असे मला अगदी सुरुवातीपासूनच वाटत होते.
देशात जे द्वेषाचे, तिरस्काराचे, फोडाफोडीचे वातावरण जाती जाती मध्ये आणि धर्मा धर्मा मध्ये मतांच्या राजकारणासाठी ठरवून तयार केले गेले आहे आणि भारतीयांच्या मनात एकमेकांसाठी जो दुरावा निर्माण केला गेला आहे ती मने जोडण्याचा हा प्रयत्न अनेक भारतीयांचा एकमेकांच्या साथीने राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू आहे. स्वागत आहे.
या यात्रेत आपण सहभाग तरी नोंदवावा असे मला महाराष्ट्रात ही यात्रा आली तेंव्हा पासून वाटत होते. ही नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्रात प्रवेशगत झाली. तिथे ही प्रयत्न केला पण गर्दी इतकी होती नांदेड जिल्ह्यातल्याच नागरिकांची की बाहेर जिल्ह्यातील लोकांना फार संधी नव्हती. मग ती जेंव्हा हिंगोली जिल्ह्यात आली आणि तिथल्या व्यवस्थेची जबाबदारी लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्याकडे असल्यामुळे ती लातूरकरांकडेच होती, त्यामुळे गर्दी या विषयातून मार्ग काढणे शक्य होते.
मी या यात्रेत सहभाग नोंदवला असता आणि नसता तरी गर्दीत काही फरक पडला नसता. पण मुळात गर्दी हा विषयच या यात्रेचा नव्हता, सामाजिक सलोख्याचा संदेश हा विषय होता. पण मला या यात्रेला जावं अस वाटत होतं, मन ओढ खात होत, एक ऐतिहासिक once in a life time यात्रा आपल्या प्रदेशातून, आपल्या एवढ्या जवळून जात आहे आणि आपण त्याचे साक्षीदार सुद्धा होऊ नये, सहभाग निंदवू नये हे माझ्या स्वभावाला मान्य नव्हतं. गेलो…….
हिंगोलीला पहोंचलो आणि वातावरण राहुल गांधीमय झालं होतं. एक उत्साह जाणवत होता. तिरुमला लॉन्स येथे गेलो, इथे कॅम्प होता. तिथे गेल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या लोकांना भेटलो. काही राजकीय होते, काही सामाजिक होते, काही कला क्षेत्रातील होते, काही वकील होते, समाज माध्यमात काम करणारी मंडळी होती, सामाजिक जागरूकता करणारी मंडळी होती.
सर्व काही तर सांगणार नाही पण जे मला ठळक जाणवले ते नक्की सांगेन. सर्वात ठळक जे जाणवलं ते हे की एक नेता म्हणून राहुल गांधी यांच्या प्रति काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड आदर निर्माण झाला आहे. त्यांचे कष्ट, त्यांची सहजता, त्यांचं कुटुंबवत्सल असणं भावल आहे. आपला नेता एक तपश्चर्या करतो आहे असा भाव आहे. कदाचित आधी कधीच नव्हतं एवढं प्रेम आपल्याच सहकाऱ्यांच्या मनात निर्माण करण्यात राहुल गांधी यशस्वी झाले आहेत. पार्टी केडर मोबिलाईज झाला आहे यात शंका नाही.
या यात्रेत ज्या लोकांनी सहभाग नोंदवला आहे त्यातील काही इंजिनियर्सना मी भेटलो. यांनी हा विचार लोकांपर्यंत पहोंचवण्यासाठी एक ग्रुप स्थापन केला आहे. त्या ग्रुपमध्ये हे स्वतःच्या पगारातील 15% रक्कम डोनेट करतात आणि या contribution मधून स्वखर्च करून ते हा ग्रुप चालवतात. काँग्रेस साठी काम करतात. राजकीय पक्षासाठी कोणी पदरमोड करत असेल आणि तो ही उच्च शिक्षित वर्ग हे कोणाला खरे वाटेल का? आणि ते ही काँग्रेससाठी!!! कभी नही, अशी प्रतिमा असताना हे तरुण इंजिनियर्स मला भेटले आणि सुखद धक्का मला दिला.. खूप आदर, आपुलकी वाटली.
या यात्रेत काँग्रेसचेच कार्यकर्ते आहेत अस नाही तर इतर क्षेत्रातील अनेक लोक, सामान्य माणस या यात्रेत सहभागी आहेत. अर्थात काँग्रेसचा कार्यकर्ता तर असणारच कारण आपला नेता एक तपश्चर्या करतो आहे आणि आपण त्यात सहभागी असलं पाहिजे अस त्याला वाटण खूप स्वाभाविक आहे. आणि त्याचा ‘भारत जोडो’ वर नैसर्गिक अधिकार ही आहे. तोच या जोडण्याचा विचाराचा खरा पाईक आहे. पण विविध क्षेत्रातील लोक यात सहभागी आहेत, वेगवेगळ्या वयोगटातील लोक, मुलं, महिला मोठ्याप्रमाणात सहभागी आहेत हे या यात्रेच यश आहे. ‘भारत जोडो’ हा संदेश पहोंचन हे खरं यश आहे.
या यात्रेसाठी जी मुक्कामाची ठिकाण निवडली जातात ती सहसा शेतकऱ्यांची शेत असतात. हिंगोलीच्या पुढील मुक्कामासाठी जे शेत निवडल गेलं होतं त्यात तूर हे पीक होत. शेतकऱ्याच पीक काढणं नको म्हणून आयोजक दुसरी जागा शोधत होते तर तो शेतकरी स्वतःहून पुढे होऊन म्हणाला की मी तूर काढून घेतो पण हीच जागा निवडा, मला धन्यता वाटेल. आणि त्याने तूर काढून घेतली. त्याचा मोबदला त्याने काय मागवा?? तर राहुल गांधी यांनी एक आंब्याचे झाड इथे लावावे, तोच माझा मोबदला असेल असे तो म्हणाला अस मला तिथल्या लोकांनी सांगितले. किती कृतार्थ करणारी ही भावना आहे.
असे अनेक अनुभव काल मी घेतले. पण सर्वात विलक्षण अनुभव घेतला तो हा की महाराष्ट्राच्या हवेत आदरणीय विलासराव देशमुख साहेब वसतात, वाहतात. त्यांचा सुगंध संबंध महाराष्ट्रात दरवळतो. काल मुंबई, शिर्डी, कळमनुरी, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद एक ना अनेक ठिकाणचे लोक भेटले, विषय एकच ‘साहेब.’ आणि साहेबांच्या आठवणी. प्रत्येकजण तेच सांगत होता. साहेबांच्या जवळच्या कोणाला तरी भेटलो हा आनंद त्यांना होता आणि त्यांना तो आनंद, ते समाधान मी देऊ शकलो ही माझी साहेबांच्या चरणी सेवा अर्पण झाली असे मी समजतो.
लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्या सहकाऱ्यांनी खूप चांगली व्यवस्था यात्रेकरूंची केली होती. सोपं नसत एवढं लातूर वरून दूर हिंगोलीला जाऊन ही व्यवस्था करणं. पण अत्यंत चांगली व्यवस्था या सर्वांनी केली. खूप कष्ट पडले असतील. रात्रंदिवस काम केले असेल तेंव्हा हे यश, समाधान त्यांच्या पदरी पडलं असेल. आपल्या जिल्ह्याच, नेत्याचं नाव आपण राखल यांचा कार्यसिद्धी भाव त्यांना आला असेल.
अभय साळुंके, किरण जाधव, विजय देशमुख, पांडुरंग कोळगे, प्रवीण सूर्यवंशी, समाधान गायकवाड, इम्रान सय्यद, समद पटेल, रवी काळे, प्रवीण कांबळे, अभिषेक पतंगे, अभिजित इगे, अनिल, सिकंदर शेख, पप्पू घोलप एक ना अनेक सहकारी हे सर्व यशस्वी करण्यामध्ये योगदान करते झाले. सर्वांच कौतुक आणि आभार.
अभिजित देशमुख