विलास युनिट २ उदगीर परिसरात आर्थिक क्रांती घडवेल
उदगीर( प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील साखर कारखानदारीक्षेत्रात विश्वासार्हता आणि सामाजिक बांधिलकीवर चालणारा परिवार म्हणून मांजरा परिवार ओळखला जातो आहे या परिवारांतर्गत चालणारा विलास युनिट टू हा कारखाना उदगीर परिसरात निश्चितपणे क्रांती घडवेल असे प्रतिपादन, माजी मंत्री सहकार मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले,
विलास सहकारी साखर कारखाना युनिट २ तोंडार ता.उदगीर जि. लातूर च्या आसवणी प्रकल्पाचा शिलान्यास आणि २०२२-२३ गळीत हंगाम शुभारंभ रविवार दिनांक ६ नोव्हेंबर रोजी माजी मंत्री,सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, माजी राज्यमंत्री संजय बनसोडे आमदार धीरज देशमुख यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख बोलत होते. या कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करीत दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
यावेळी बोलताना सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की, आपल्या सर्वांच्या उपस्थिती मध्ये आज गोरज मुहूर्तावर या कारखान्यातील एका नव्या प्रकल्पाची आणि गळीत हंगामाची सुरुवात करण्यात आली. या कारखान्याला नाव इंदिराजींचे नाव होते म्हणून आणि येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी हा कारखाना ना नफा ना तोटा तत्त्वावर सुरू केला. आणि आज विलास सहकारी साखर कारखाना युनिट १ आणि युनिट २ अतिशय उत्तम पद्धतीने चालतोय याचा मनस्वी आनंद होतो आहे.
ज्या जमिनीत ऊसाचे पीक कधी घेतले गेले नाही आशा या जमिनीवर योग्य नियोजन,चांगले ऊस उत्पादन आज होत आहे याचे आपणास श्रेय जाते.
मला जो पुरस्कार मिळाला त्याचे खरे वारसदार या लातूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सरकार विकासाच्या योजना आणते पण सहकार क्षेत्र हे सर्व सामान्य माणसाचा प्रपंच चालवण्याचे काम करते यासाठी सहकार हा टिकला पाहिजे. आपली सर्वांची आर्थिक आणि सामाजीक उन्नती व्हावी याकरिता सहकार क्षेत्र काम करीत आहे.
मांजरा परिवार म्हणजे विश्वासहर्ता,तत्त्व, सामाजिक बांधिलकीवर चालणारा परिवार आहे आणि याला तडा जाणार नाही याची आपण सर्वांनी आजवर पुरेपूर काळजी घेतली तशीच यापुढे देखील काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सद्याची राजकिय परिस्थिती,धर्म आणि जातीचे राजकारन याचे वाढते प्रमाण पाहता आपण सर्वांनी जागृत व्हावे आणि अशा भावनिक विषयाला बळी न पडता देशाच्या विकासाचा विचार आपल्याकडून व्हायला हवा, वाढती महागाई, इंधन दर वाढ ,पाहता नागरिकांनी या वाढत्या जिजिया कर व महागाई बाबत आपण सर्वांनी विचार करायला हवा आणि यासाठी सामाजिक बांधिलकी चा विचार घेऊन जाणाऱ्या काँग्रेस पक्षासोबत आपण राहायला हवे असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान या वेळी “सहकारातील नेतृत्व” पुरस्कार मिळाल्या बद्दल सहकार महर्षी माजी मंत्री आदरणीय दिलीपराव देशमुख यांचा विलास सहकारी साखर कारखाना युनिट २ च्या वतीने सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की,देशातील सहकारातला अग्रगण्य पुरस्कार नुकताच आदरणीय काकांना प्राप्त झाला ज्याची कार्याची पावती महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातून मिळाली याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतो.
मांजरा परिवारातील विलास साखर कारखाना युनिट १ आणि युनिट २ या दोन्ही कारखान्याचे उद्घाटन आदरणीय सोनियाजी गांधी यांच्या हस्ते झाले हा एक विलक्षण योगायोग म्हणावा लागेल.
प्रियदर्शनी साखर कारखाना २ वर्ष भाडे तत्वावर चालवून कारखाना बँकेने ज्या वेळेस विक्रीस काढला त्या वेळी कारखाना खरेदी करण्यासाठी बऱ्याच जणांना शंका होती पण आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख साहेबांनी उदगीर तालुक्यातील जनतेला शब्द दिला होता आणि तो शब्द पाळत कारखाना खरेदी केला आणि आज हा कारखाना दमदार पावले टाकत आहे. यापुढे या कारखान्याच्या ऊस गाळापातून आपण भविष्यात इंधन निर्माण करणार आहोत.
महा विकास आघाडी सरकारच्या काळात उदगीर व जळकोट तालुक्यातील मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजूर केली जी पूर्णत्वास येत आहेत.यापुढे देखील उदगीर व जळकोट तालुक्याचि क्षमता पाहता आणखी विकासात्मक कामे तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ताकत देऊन आणखी गाळप वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे.कारण सर्वाधिक ऊस पुरवठा करणारा ऊस उत्पादक शेतकरी हा उदगीर चा असून या शेतकऱ्याचा सन्मान जागतिक स्तरावर झाला आहे हे विसरून चालणार नाही.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही एक असून महा विकास आघाडी च्या माध्यमातून आम्ही सर्व धर्म समभावाचा विचार घेऊन महाराष्ट्राच्या विकासाची घोड दौड सुरू ठेवण्यास कटिबद्ध आहोत.असे म्हणत राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा महाराष्ट्र राज्यात येणार असून यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की,सण १९८४ साली मांजरा सहकारी साखर कारखाना उभारणी पासून ते पुढे १९९९ विलास सहकारी साखर कारखाना उभारणी व आज मांजरा परिवारातील वाढत असलेल्या व यशस्वी वाटचाल करीत आलेल्या जिल्ह्यातील सर्व कारखान्याची उजळणी करीत तोंडारचा त्या वेळचा प्रियदर्शनी व आजचा विलास साखर कारखाना युनिट २ चा कार्यप्रवास विशद करीत हा कारखाना म्हणजे उदगीर सह देवणी व जळकोट तालुक्याचा पाठीचा कणा आहे आणि हा कणा आणखी मजबूत व्हावा यासाठी आपण सर्वांनी या कारखान्याच्या व देशमुख कुटुंबियांच्या मागे आणि काँग्रेस पक्षाच्या मागे खंबीरपणे उभे राहायला हवे असे आवाहन करीत कारखाना प्रशासनास शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना आ.धीरज देशमुख म्हणाले की,या कारखान्याच्या उभारणी पासून आजतागायत बऱ्याच जणांनी आपले योगदान दिले. आणि आईसाहेब अध्यक्ष झाल्यानंतर शेतकऱ्यांना सर्वाधिल भाव देण्याचे काम कारखान्याने केले.ज्याचे फलित म्हणून आज या परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक दृष्टीने सक्षम बनला आहे.
प्रत्येक गोष्टीला आर्थिक मदत आवश्यक असते ज्या करिता आदरणीय काकांच्या सहकार्यातून जिल्हा बँकेने अर्थ सहाय्य केले आणि कारखाना वाटचेवर प्रगती करीत आहे याचा सार्थ अभिमान आहे असे म्हणत कारखान्याच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रास्ताविकपर भाषणात बोलताना कारखान्याचे व्हा.चेअरमन रवींद्र काळे यांनी कारखाना उभारणी,कार्यक्षेत्र, ऊस गाळप क्षमता,ऊसाला दिलेला उच्चांकी दर, ऊसाचा उतारा, यंत्र सामुग्री,चालू गळीत हंगामाची कारखाण्याकडून केलेली तयारी,चालू वर्षांतील गाळप उद्दिष्ट, यासह आसवणी प्रकल्प या बाबत सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.