श्रीराम जन्मभूमी मुक्ती आदोलनाचा तो काळ होता. १९८७ पासून रामज्योत पूजन, श्रीराम जप यात्रा, श्रीराम पादुका पूजन, रामशीला पूजन असे एका पुढे एक कार्यक्रम आखले गेले होते. राम जन्मभूमी मुक्त झालीच पाहिजे म्हणून विविध कार्यक्रमातून जनजागृती करून केंद्र सरकारवर हिन्दू समाजाच्या भावभावनांचा रेटा वाढला पाहिजे यासाठी प्रयत्न चालू होते. मी डिचोली येथे वास्तव्यास होतो. श्रीराम पादुका पूजनाच्या रथयात्रा सर्व देशभर चालू होत्या. पादुका पूजनासाठी रथयात्रा डिचोलीत येणार होती. प्रभू श्रीरामचंद्राच्या पादुका म्हणजे हिन्दुंच्या श्रद्धेचा विषय. विश्व हिन्दू परिषदेने पादुका पूजनाच्या कार्यक्रमाची आखणी केली होती त्याप्रमाणे डिचोली गावात तयारीला जोर येत होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून वाढलेल्या प्रत्येकाच्या अंगवळणी एक पद्धत पडलेली असते. कितीही मोठा कार्यक्रम असो त्याची तयारी स्वयंसेवकांनीच करायची. कामगार लावायचे नाहीत. (१९८९ साली डिचोली गावामध्ये कामगार मिळणे सुद्धा दुरापास्त होते.)
विश्व हिन्दु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिन्दु एकजूट व संघ परिवारातील अन्यान्य संघटनांनी कंबर कसली. संघ परिवारातील संघटनांचे प्रेरणा स्रोत एकच ते म्हणजे प्रा. सुभाष वेलिंगकर. त्यांच्या घणाघाती भाषणाने आमच्यासारखे स्वयंसेवक पेटून उठायचे व आपल्या वाट्याला येईल ते काम न थांबता, न थकता पूर्ण करायचे. असे कित्येक कार्यकर्ते डिचोली गावामध्ये प्रा.सुभाष वेलिंगकर यांच्याकडून प्रेरणा घेऊन तयार झालेले. मी सुद्धा त्यातीलच एक.
माझ्या अजूनही स्मरणात आहे. श्रीराम पादुका पूजनाचा भव्यदिव्य कार्यक्रम डिचोलीच्या छ.शिवाजी महाराज मैदानावर होणार होता. वेलिंगकर सरांनी बैठक घेतली व छ.शिवाजी महाराज मैदानावर मोठा मंडप घालायचे ठरले. सर्व कार्यकर्ते आपापल्या कामाला लागले. माझ्याकडे मंडप उभे करण्यासाठी लागणारे खांब उभारण्याची जबाबदारी होती. मी, दामोदर नाईक (साखळी), शशिकांत नाईक (साखळी) इत्यादींनी खड्डे खोदण्याचे ठरवले. खड्डा कमीतकमी १ फूट खोल खोदायचा होता. एक दोन दिवसावर कार्यक्रम येऊन ठेपला. वेलिंगकरांनी आम्हाला विचारेपर्यंत मी एकट्याने जवळ जवळ ३४ खड्डे एका रात्रीत खोदले. आज मलाच आश्चर्य वाटते! पण हे शक्य झाले ते वेलिंगकर सरांच्या प्रेरणेमुळे असेच मला वाटते. वेलिंगकर सरांनी मला कौतुकाची थाप दिली, मी अक्षरश: भरून पावलो होतो.
मी २३ वर्षाचा होतो, झोकून द्यायची सवय होती, श्रीराम श्रद्धेचा विषय होता आणि वेलिंगकर सरांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास होता. वेलिंगकर सर म्हणजे, त्यावेळी धगधगता अंगार होता, राष्ट्रासाठी कार्य करणा-यांची पिढी तयार करणारा स्रोत होता, माझ्या डोळ्यासमोरचा आदर्श होता आणि एकंदरीतच सर्व संघ स्वयंसेवकांसाठी पितृतुल्य, मातृतुल्य, देवतुल्य माणूस
होता.
१९९० मध्ये अयोध्येला राममंदिर मुक्ति आंदोलनासाठी जायचे ठरले. वेलिंगकर सरांनी बैठकांचा धडाका लावला. दिवसरात्र एक केले व गोव्यातून हजार ते दीड हजार स्वयंसेवक अयोध्येला जातील याची निश्चिती केली. डिचोलीतून आम्ही ५२ कर सेवकांचा गट अयोध्येला गेलो होतो. गजेंद्र कळंगुटकर, नेताजी आमोणकर, मुकेश होबळे, दामोदर नाईक, शशिकांत नाईक (सगळी नावे आठवत नाहीत) इत्यादी ५२ करसेवकांनी अयोध्येला कूच केली. ५२ मधील काही झाशीला जेलबंद झाले,
काही प्रयागराज (इलाहाबाद)ला, काही सतना ला, काही बांदा (उ.प्र.) जेलमध्ये व काही चिलबीला गावात पोलीस स्टेशनवर जेरबंद झालो. चिलबीला अयोध्येपासून अंदाजे ८०-९० कि.मी. असेल. ५२ पैकी आम्ही ८ जण चिलबीला येथे पोचलो होतो. पोलिसांना गुंगारा देऊन काळोख्या रात्री २ वाजता चिलबिला गावाबाहेर पडलो. माथूर आणि गुप्ता या दोन वकील महाशयांनी आम्हाला आडवाटेने अयोध्येला पोचण्याचे नकाशे दाखवले व कूच करायला सांगितली. आम्ही त्या किर्र अंधारात वाटेला लागलो. थंडी मी म्हणत होती पण अंगावर आहे त्या कपड्यानिशी आम्ही ८० ते ९० कि.मि. चे अंतर दोन दिवसात पार केले व अयोध्येला पोचलो. मुलायमसिंग ने मुख्य रस्त्यावर खड्डे खणून ठेवले होते म्हणून हा आडमार्ग स्वीकारावा लागला. हे वर्णन खूप आहे. सगळे लिहित नाही. अयोध्येला कसल्याही परिस्थितीत पोचायचेच हा निश्चय करण्यापाठीमागे प्रेरणा वेलिंगकर सरांचीच हे मान्य करावेच लागेल .
महाराष्ट्रात (मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रात) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे भटा बामणांचा असे म्हणण्याची पद्धत होती. पण गोव्यामध्ये असे नाही. गोव्यातील रा.स्व.संघ हा सर्व समाजाचा संघ आहे हे मला दिसले, मनोमन पटले. सर्वसामान्य लोकांचा संघ ही प्रतिमा होण्यापाठीमागे गोव्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते, तत्कालीन प्रचारक कारणीभूत आहेत पण त्यामध्ये सुद्धा वेलिंगकर सर अग्रभागी आहेत हे मान्य करावेच लागेल.
वेलिंगकर सर संघ स्वयंसेवकांचे आदर्श होते व आजही आहेत, पण २०१६ नंतरच्या घडामोडीत ब-याच स्वयंसेवकांनी त्यांची साथ सोडली त्यात मी सुद्धा आहे.
वेलिंगकर सरांचे श्रेष्ठत्व मान्य करून सुद्धा, मातृभाषा या एका विषयासाठी त्यांना साथ देणे हे ब-याच संघ स्वयंसेवकांना मान्य नव्हते तसे मलाही मान्य नव्हते. व्यक्तिनिष्ठेला प्राधान्य देणे संघाच्या कार्यपद्धतीत बसतच नाही म्हणून मतभेद होत गेले. सरांनी विभाग संघचालक म्हणून तत्त्वाचे पावित्र्य राखले पण भाषेची सोज्वळता सांभाळणे सरांना कठीण गेले, असे वाटते. देशासाठी कार्य करणे हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिकवण जी वेलिंगकर सरांनी स्वयंसेवकांमध्ये रुजवली. या तत्वापासून त्यांनी फारकत घेतली असे आजही
दिसत नाही आणि ते घेतील असे वाटतही नाही. पण रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांचे शासन असताना फक्त एका मुद्यावरून जो गदारोळ उठला तो बाजूला ठेवता आला असता तर, आज गोव्यातील चित्र वेगळे असते, असे मला वाटते. वेलिंगकर सरांनी जरा वेळ दिला असता तर गेल्या ६-७ वर्षात जे झाले ते थांबवता आले असते. सरांच्या एका तत्ववादी भूमिकेमुळे हिन्दुत्वाचे, संघाचे नुकसानच झाले आहे व मतभेदातून निर्माण झालेल्या मनभेदाचे परिणाम गोव्यातील समाजाला द्विधा मनस्थितीत लोटत आहेत असे मला वाटते.
वेलिंगकर सर अमृत महोत्सवी वाढदिन साजरा करत असताना मला वेलिंगकर सरांच्या कार्यकर्तृत्वाचा आजही अभिमान वाटतो. त्यांना ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना मी त्यांच्या प्रमुखत्वाखाली जो प्रदीर्घ अनुभव घेतला तो मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या आनंदाच्या दिवशी यापुर्वीचा परिच्छेद लिहिणे संयुक्तित नव्हते, पण ज्यांना आदर्श मानले, त्यांनीच ते मोठे मन करून सोडून द्यावे ही अपेक्षा ठेवतो. वेलिंगकर सरांना ईश्वर आरोग्ययुक्त दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना.
श्रीहरी आठल्ये
पर्वरी गोवा.