लातूर : लातुरात रक्तदान शिबीर, महाराजा अग्रसेन यांची आरती, शैक्षणिक – सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानासह विविध उपक्रमांनी अग्रसेन जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १९ रक्तदात्यांची ऐच्छिक रक्तदान केले. लातूर येथील अग्रवाल समाज ट्रस्ट, अग्रवाल समाज, अग्रवाल महिला मंडळ व अग्रवाल नवयुवक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे सोमवारी लातुरात अग्रसेन जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर नंदकिशोर अग्रवाल, अशोक अग्रवाल, कमलकिशोर अग्रवाल, सुरेंद्र अग्रवाल, विनोद अग्रवाल, आनंद अग्रवाल, ओम पोद्दार, गिरीधारीलाल बंसल , संजय अग्रवाल, सौ. वंदना ब्रिजवासी, सौ. स्नेहलता अग्रवाल, महेश अग्रवाल, रवी अग्रवाल आदी मान्यवरांची उपस्थिती होती. लातूर शहरातील महाराजा अग्रसेन भवन येथे सोमवारी सकाळी १० वाजता श्रीमती शांतादेवी विष्णुदासजी अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण व आरती करण्यात आली. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत रक्तदान शिबीर संपन्न झाले. या रक्तदान शिबिरात अग्रवाल समाजातील १९ रक्तदात्यांनी ऐच्छिक रक्तदान केले. सायंकाळी अग्रवाल समाज ट्रस्टचे अध्यक्ष नंदकिशोर इंद्राजजी अग्रवाल यांच्या हस्ते महाराजा अग्रसेन यांची आरती करण्यात आली. त्यानंतर रक्तदान शिबिरात रक्तदान केलेल्या समाज बांधवांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. तसेच विशेष सन्मान सोहळ्यात किडनीदात्या सौ. सरोजबाला राजकमल अग्रवाल, १०० हून अधिकवेळा रक्तदान करणाऱ्या विक्रमी रक्तदात्या सौ. नंदीनी गोपाल ब्रिजवासी , इंटरनॅशनल इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट एडिटरपदी निवड झाल्याबद्दल सौ. अनुराधा आनंद अग्रवाल व महिला मंडळाच्या कार्यक्रमात विशेष योगदान देणाऱ्या सौ. किरण राजगोपाल अग्रवाल यांचा यावेळी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला. तसेच दहावी – बारावी परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करणारे विद्यार्थी व पदवीधारकांचाही या कार्यक्रमात शैक्षणिक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अग्रवाल समाज ट्रस्टचे अध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल, सचिव अशोक अग्रवाल, सहसचिव कमलकिशोर अग्रवाल, महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. वंदना ब्रिजवासी, अग्रवाल नवयुवक मंडळाचे अध्यक्ष महेश अग्रवाल आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल अग्रवाल यांनी तर आभार प्रदर्शन सुरेंद्र अग्रवाल यांनी केले. ————————————-