लातूर दि.24-9-2022
महाराष्ट्र नागरी बँकेच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून केले जात आहे. बचत गटातील महिलांचे योगदान वाढावे यासाठी महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेने उद्योगिणी स्वाभीमानी योजना सुरू केली आहे. यामध्ये बचत गटाच्या महिलांना पाच हजारापासून ते एक लाखापर्यंत कर्ज देवून उद्योगाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत सहा हजार महिलांना कर्ज देवून उद्योगाच्या माध्यमातून सक्षम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हीच परंपरा कायम ठेवत तब्बल 10 हजार महिलांना सक्षम करण्याचे काम एमएनएस बँकेच्या माध्यमातून करण्याचा संकल्प केलेला आहे. त्यामुळे यापुढील काळातही महम्मद यूनुस यांच्या कार्याचा आदर्श घेवून बँकेच्या माध्यमातून महिलांना आर्थीकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम आपण करू असे प्रतिपादन एमएनएस बँकेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्यावतीने स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक कॉलेजच्या सभागृहात आयोजित 26 व्या वार्षीक सर्वसाधारण सभेत अध्यक्षीय भाषणात बोलत होते. यावेळी एमएनएस बँकेचे व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, बँकेच्या संचालिका तथा जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, बँकेचे संचालक बाबासाहेब कोरे, रावसाहेब पाटील, सुभाषअप्पा सुलगुडले, सूर्यकांतराव शेळके, एमएनएस बँकेचे सल्लागार संचालक निळकंठराव पवार, शिवाजीराव देशमुख, रविंद्र कांबळे, विश्वास जाधव, बँकेचे कार्यकारी संचालक बाळासाहेब मोहिते, बँकेचे जनरल मॅनेजर गहेरवार, धनराज पाटील धामणगावकर, मार्केट यार्ड शाखेचे व्यवस्थापक प्रविण जाधव, शाखा व्यवस्थापक शिवाजी सूर्यवंशी, डी.एम. पाटील, गणेश पवार, विश्वनाथ भामरे, डी.एस.पवार, संतोष कदम, आदित्य पवार, रामेश्वर इंगळे, आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी पुढे बोलताना माजी आमदार शिवाजीराव कव्हेकर म्हणाले की, महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेची आज 26 वी वार्षीक सर्वसाधारण सभा होत आहे. यामध्ये सर्वांचे स्वागत करून कोरोनाच्या जागतिक संकटाच्या काळात गोरगरीबांना अन्नधान्याच्या किट्स, अन्नसेवा, मोफत ऑक्सिजनची घरपोच सेवा, अॅम्बूलन्स सेवा, देवून सर्वसामान्य नागरीकांना आधार देण्याचे काम आपण बँकेच्या माध्यमातून केलेले आहे. तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मदत करण्याचे कामही महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. तसेच आत्महत्याग्रस्त कुटुबिंयाच्या पाल्यांना दत्तक घेऊन त्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे कामही केलेले आहे. सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन विवेकानंद कॅन्सर रुग्णालयास 11 लाखांची मदत करण्याचे काम केले. याबरोबरच बँकेची ही सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन राष्ट्रीय पातळीवरील 6 पारितोषिके बँकेला मिळालेली आहेत. त्यामुळे बँकेला अ दर्जा मध्ये ठेवण्याचे काम आरबीआयने केलेले आहे.
देशामध्ये नवनवीन तंत्रज्ञान आलेले आहे. तब्बल 37 वर्षानंतर सीबीसीएस शिक्षणपद्धती आलेली आहे. तरीही सर्वांधिक उच्चशिक्षीत तरूण भारत देशातच आहेत व सुशिक्षित बेकारीची संख्याही आपल्याच देशात त्यामुळे हा आपल्या शिक्षण पद्धतीतील दोष आहे. त्याला दूर करण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. जागतीक स्पर्धेमध्ये बराक ओबामा हे सर्वाधिक लोकप्रिय नेते होते. त्यानंतर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरलेले आहेत. हे जगातील 42 टक्के जनतेच्या सर्वेवरून समोर आलेले आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जगातील 13 राष्ट्रांनी गौरव केला असून यामध्ये तीन मुस्लीम राष्ट्रांचा समावेश आहे.
एमएनएस बँकेकडील ग्राहकांचा कल लक्षात घेवून 15 टक्कयावरील व्याजदर ग्राहकांच्या हितासाठी 11 टक्क्यावर आणण्यात आलेला आहे. त्यामुळे भविष्यातही ग्राहकांच्या हितासाठी योग्य तो निर्णय घेवून बँकेची वाटचाल यशस्वी चालू राहील असा विश्वासही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद याच्या प्रतिमेचे पूजन करून व दिपप्रज्वलन करून मान्यवरांच्या उपस्थितीत एमएनएस बँकेच्या वार्षीक सर्वसाधारण सभेची सुरुवात करण्यात आली. प्रारंभी वेळेत कर्जाची परतफेड करणार्या बचत गटाच्या पाच महिलांचा सत्कार करून नवीन पाच गटाच्या महिलांना कर्जाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एमएनएस बॅँकेचे कार्यकारी संचालक बाळासाहेब मोहिते यांनी केले तर आभार बँकेचे तज्ज्ञ संचालक विश्वास जाधव यांनी मानले.
अडचणीच्या काळात मदत करणारी बँक
– सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर
महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचे काम केले जात आहे. आतापर्यंत सहा हजार महिलांना कर्ज वाटप करून उद्योगाच्या प्रवाहात आणण्याचे काम केलेले आहे. तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करून त्यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे सर्वांना अडचणीच्या काळात मदत करणारी बँक म्हणून महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेकडे पाहिले जाते. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी केले.