मराठवाडा मुक्ती गाथा ( भाग -4 )
निजाम उल मुल्कचा कालखंड हा निजामशाहीच्या उदयाचा होता. त्या कालखंडात मराठ्यांशी कधी मैत्री तर कधी तह करून कधी माफी मागून निजामशाही टिकून राहिली. इ.स. 1724 ते 1748 अशी 24 वर्ष ही कारकीर्द राहीली. त्यानंतर निजामाच्या वारसदारांमध्ये इ.स. 1748 ते 1762 पर्यंत वारसायुध्द घडुन आले. निजाम-उल-मुल्क नंतर त्याचा मुलगा निजाम अली हा हैद्राबाद संस्थानचा राजा झाला. त्याने स्वत:ला निजाम अशी पदवी धारण केली.म्हणून नंतरच्या सर्व राजांना निजाम असे संबोधण्यात येते. निजाम-उल-मुल्कला मोगल सम्राटाकडून ‘आसफ जहा’ असा किताब मिळाला होता. म्हणून या घराण्याचा उल्लेख आसफ जाह घराणे असाही करण्यात येतो.
निजामाशाहीने सुरुवातीपासूनच बलदंड सत्ते बरोबर दोस्ती करून वा नमते घेऊन आपले राज्य केल्याचे दिसून येते. 18 व्या शतकाच्या पुरवार्धात भारतात ब्रिटिशांचा दबादबा वाढायला लागला होता. हे हेरूनच निजाम अली यांनी ईस्ट इंडिया कंपनी यांच्या बरोबर 12 आक्टोबर 1800 मध्ये तैनाती फौजेचा करारकेला.या कराराद्वारे संरक्षणासाठी इंग्रजांची फौज सिकंदराबादला कायम झाली. या कारणामुळे निजामाने हिंदुस्तानातील कोणत्याही राजाबरोबर कसलाही संबध ठेवणार नाही, हे मान्य केले. इंग्रजांना फौजेच्या खर्चासाठी कडाप्पा, कर्नुल, अनंतपुर व बेल्लारी हे जिल्हे निजामाने ईस्ट इंडिया कंपनीला दिले. या करारामुळे परकीय आक्रमणापासून व अंतर्गत बंडखोरापासून पूर्ण रक्षण करण्याची जबाबदारी कंपनीने स्वत:वर घेतली.या करारापासुन हैद्राबादच्या निजामाचे स्वातंत्र्य नष्ट झाले. निजामअली नंतर (सन 1763 ते 1803) निजाम सिकंदरशहा (सन 1803 ते 1829), नासिरदौला (सन 1829 ते 1857), अफजूदौला (सन 1857 ते 1869), महेबुब अली खान (सन 1869 ते 1911) यांनी राज्य केले.
मीर उस्मान अलीची कारकिर्द (इ.स. 1911 ते 1948)
सातवा व शेवटचा निजाम मीर उस्मान अली खान 29 ऑगस्ट 1911 रोजी सत्तेवर आला.पहिल्या महायुध्दात निजामाने इंग्रजांना पैसा, सैन्य,वस्तू यांची भरपूर मदत केली. युध्दातील मदतीचे बक्षीस म्हणून ब्रिटीश सम्राट पाचवा जॉर्ज ह्याने निजामाला ‘हिज एक्झाल्टेड हायनेसस’ असा किताब दिला. निजाम मीर उस्मान अली खूप महत्वकांक्षी होता. स्वतंत्र इस्लामी राज्य स्थापन करण्याचे त्याचे स्वप्न होते. हैद्राबाद राज्यात राजभाषा फारशी होती.
1920 पर्यंत मराठवाड्यात हायस्कूलची संख्या सहा एवढी होती. 1917 मध्ये हैद्राबादला उस्मानिया विद्यापीठ स्थापन झाले तर 1927 मध्ये औरंगाबादला इंटरमिजिएट कॉलेज स्थापन झाले. तोपर्यंत मराठवाडयात एकही कॉलेज नव्हते. महाविद्यालयीन शिक्षण उर्दूतून दिले जात असे. राज्यात खाजगी शिक्षण संस्था व वाचनालये यावर निर्बंध होते. हैद्राबाद राज्यात नौकऱ्या वरिष्ठ व प्रसिध्द कुटुंबातील लोकांना मिळत असत. हैद्राबाद राज्यात 11 टक्के मुस्लिम लोकसंख्या होती.
क्रमशः
@युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, लातूर