यशोगाथा
जेव्हा स्वतः पालक मुलांना वाढवताना वेगळा विचार करतात, प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन देखील मुलांना प्रोत्साहन देतात, त्यांचा कल ओळखून योग्य दिशा दाखवतात, मुलगा- मुलगी या चौकटीत न अडकता अथवा असा कोणताही भेदभाव न करता प्रेरणा देतात,
लोक काय म्हणतील ? या पलीकडे जाऊन विचार करतात ,उत्तम संस्काराबरोबर आधुनिकतेची कास धरतात, तेव्हाच असे चमत्कार घडू शकतात जे पुढील पिढीसाठी एक आदर्श उदाहरण ठरतात. तर आज जाणून घेऊ अशाच एका अतिशय महत्वाकांक्षी, निर्भीड, अष्टपैलू रणरागिणी ऋतुजा इंदापुरे हिची एक आगळीवेगळी कहाणी, जी अनेकींना लढायला बळ देईल.
अतिशय धाडसी व धडाडीचे व्यक्तीमत्व लाभलेली ही पुण्याची झाशीची राणी म्हणजेच ऋतुजा शिवाजी इंदापुरे ही प्रा श्री शिवाजी बाळकृष्ण इंदापुरे व प्रा सौ विमल शिवाजी इंदापुरे यांची एकुलती एक कन्या.
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कासार शिरंबे हे त्यांचे मूळ गाव.ऋतुजा हिचा जन्म १६, ऑक्टोबर १९७२ रोजी झाला.
ऋतुजा एक वर्षाची असताना वडिलांनी नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेऊन केवळ मुलीच्या भवितव्यासाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करून तिला वेळ देऊन तिचा सर्वांगीण विकास कसा होऊ शकतो याकडे लक्ष दिले.
ऋतुजा अवघी तीन चार वर्षाची असताना वडील तिला सायकल वरून घेऊन जात. त्यामुळे तिला लहान वयात व्यायामाची आवड निर्माण झाली. ती रोज धावत असे.
ऋतुजा हिचे खाणे पिणे, शाळेत ने आन करणे ही सर्व जबाबदारी वडील चोख बजावत असत. तर आई प्राध्यापिकेची नोकरी करून तिच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडत असे.
ऋतुजा हिचे शालेय शिक्षण नागपूर येथील सेंट जोसेफ कॉव्हेंट स्कूल मध्ये झाले.
मुलांचे प्रथम गुरू हे त्यांचे पालकच असतात. त्याप्रमाणे आईने तिच्या अभ्यासाची पूर्ण जबाबदारी घेतली. अतिशय हुशार व मेहनती असलेली ऋतुजा नेहमीच अभ्यासात आघाडीवर असायची. आई वडील दोघेही प्राध्यापक असल्याने घरातील वातावरण देखील तिच्या हुशारीला वाव देणारे , पोषक असेच होते.
अतिशय सकारात्मक वातावरणात वाढलेली ऋतुजा हिच्या मध्ये आईचा प्रेमळ स्वभाव व वडिलांची शिस्त बाणवली गेली .
त्यावेळी आई वडिलांनी एकच अपत्य होण्याचा निर्णय घेतला .मुलगी असली तरी तिला तिच्या पायावर उभे करणे, उच्च शिक्षण देणे व तिचा सर्वांगीण विकास होणे यावर दोघांचा भर राहिला. त्यावेळी हा अतिशय धाडसी निर्णय होता .मात्र याविषयी दोघांचे एक मत होते.
वयाच्या सातव्या वर्षांपासून ऋतुजाने भरतनाट्यम चे प्रशिक्षण घेतले. नागपूर,चंद्रपूर तसेच अनेक ठिकाणी परफॉर्म केले. अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला.
वयाच्या अकराव्या वर्षांपासून ती बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेऊ लागली व थोड्याच कालावधीत तिने स्वतःचे वर्चस्व सिद्ध केले. अतिशय मेहनतीने, सातत्याने ती सराव करत असे.या खेळात तिचे प्रथम गुरू हे तिचे वडील होते जे नियमितपणे सराव करून घेत. रोज सकाळी लवकर उठून व्यायाम करणे, सहा ते सात किलोमीटर धावणे, दोरीच्या उड्या मारणे हे ती नियमितपणे करत असे.वयाच्या तेराव्या वर्षी सलग अकरा हजार दोरीच्या उड्या मारण्याचा ऋतुजाने विक्रम केला होता. ही तिच्या यशाची बातमी अनेक वृत्तपत्रात झळकली होती.
वडील अतिशय कडक व शिष्टप्रिय असल्याने तिने देखील कधीही कंटाळा केला नाही आणि त्याचेच फळ म्हणून तिला शाळेच्या वतीने बॅडमिंटन खेळण्याची संधी मिळाली.ऋतुजाने संधीचे सोने केले . महाराष्ट्राच्या टीम मध्ये तिचे सिलेक्शन देखील झाले.१९८४ साली गुवाहाटी येथे त्यांच्या टीमने सुवर्ण पदक मिळवले होते. त्यावेळी ऋतुजाला स्पोर्ट्स अथोरिटी ऑफ इंडिया यांच्या वतीने स्कॉलरशिप प्राप्त झाली. तिने बॅडमिंटन मध्ये जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय पदके मिळवली आहेत.
ऋतुजा हिने पुणे व नागपूर युनिव्हर्सिटी मध्ये टीमच्या कॅप्टनची भूमिका चोख बजावली.
वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी ती नॅशनल चॅम्पियन झाली. तिच्या कष्टाची ती पावती होती.
ऋतुजाने अकरावी व बारावीचे शिक्षण नागपूर येथील सोमलवर हायस्कुल मधून पूर्ण केले. प्रत्येक क्षेत्रात तिची झळाळी चमकत असे.
ऋतुजा अठरा वर्षाची असताना आईची निमित्ताने मुंबई येथील नामांकित कोलेज मध्ये बदली झाली. मात्र ऋतुजाच्या भविष्याचा विचार करून ऋतुजा व तिच्या वडिलांनी पुण्यात राहण्याचा निर्णय घेतला.ऋतुजाचे बी. ए. चे प्रथम वर्ष नागपूर येथे तर पुढील शिक्षण पुणे येथील अतिशय प्रतिष्ठित अशा एस.पी.कॉलेज मध्ये झाले. बी. ए. मध्ये ती टॉपर होती . तिने कॉलेज मधील पूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक केला होता. ऋतुजा कायम मेरिट विद्यार्थी होती.
ऋतुजा जेव्हा ती सुट्टीसाठी आजोळी येत असे तेव्हा ती आजी, आजोबा व मामा यांचे सामाजिक कार्य पाहत असे.आई, वडील देखील सामाजिक कार्यात पुढे असायचे. लहानपणापासून ती हे पहात होती. अनुभवत होती. त्यामुळे सामाजिक कार्याचे बीज तिच्यात बालपणापासून रुजले .
आजी शिकलेली नव्हती. मात्र मुलांनी शिकावे यावर तिचा भर असायचा .शिक्षणाने माणूस घडतो, मोठा होता असे आजीचे आधुनिक विचार होते.
ऋतुजा बी ए करून थांबली नाही तर पुढे प्रख्यात आय.एल.एस.कॉलेज मध्ये एल. एल. बी. या पदवीत distinction मिळवून तिला scholarship मिळाली.त्यावेळी ऋतुजाला जस्टिस अभ्यंकर पारितोषिक देऊन सन्मानित देखील करण्यात आले.
पुढे ऋतुजा ने इंग्लंड मधील युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅम येथे मास्टर्स इन इंटरनॅशनल कमर्शियल लॉ पूर्ण केले.शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने पुण्यात येऊन तिने सिंघानिया अँड कंपनी,मुंबई येथे ती रुजू झाली.
लग्नानंतर १९९७ मध्ये ऋतुजा अमेरिकेत स्थायिक झाली. तेथे तिने सॉफ्टवेअर क्षेत्रात झेप घेतली . आता ती कॉस्को कंपनीत मॅनेजर आहे. पती श्री दिनेश कोरडे हे बहुराष्ट्रीय कंपनीत मोठे अधिकारी असून मुलगी इशा वॉशिंग्टन डीसी या शहरात सरकारी नोकरी करत आहे व मुलगा तनुश याचे शिक्षण सुरू आहे.
Sammamish शहरात २०१७ मध्ये ऋतुजा यांनी कौन्सिल मेंबर पदासाठी निवडणूक लढवली होती. पण विजय थोडक्यात हुकला. त्यानंतर कौन्सिलरच्या दोन जागा रिक्त झाल्यावर स्थानिक प्रशासनाने त्या भरण्यासाठी अर्ज मागविले. त्यात तिचाही अर्ज होता. मुलाखतीच्या प्रक्रियेदरम्यान सामाजिक उपक्रमातील सहभाग लक्षात घेऊन १२ जुलै २०२२ रोजी तिची निवड झाली. त्यात सहा ज्युरी होते. त्या सगळ्यांनी एका मताने तिची निवड केली.
तेथील सरकारनेही तिच्या नियुक्तीला मान्यता दिली. त्यानुसार ऋतुजा कौन्सिल मेंबर म्हणून काम पहात आहे.
वंशाला दिवाच पाहिजे असे ऋतुजाच्या पालकांनी कधीही मानले नाही कारण पणती देखील स्वतःच्या प्रकाशाने दाही दिशा उजळून टाकते असे त्यांचे मत होते . हेच सिद्ध केले ऋतुजा .आज तिने प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेऊन आकाशाला गवसणी घातली आहे व स्वतः बरोबर पालकांचे व देशाचे नाव
सातासमुद्रापार नेले जी अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. ऋतुजाची यशस्वी वाटचाल पाहता अजून एक गोष्ठ सिद्ध करते की क्षेत्र कोणतेही असो, महिलांनी तिथे विजयाचा झेंडा फडकविला आहे. ती एक आधुनिक दुर्गा आहे . प्रचंड इच्छाशक्ती मुळे अशक्य ही शक्य करण्याचे साहस तिच्यामध्ये आहे. प्रचंड आत्मविश्वासाने तिची यशस्वी वाटचाल सुरू आहे.
ऋतुजा या वॉशिंग्टन राज्याच्या स्टेट वुमन्स कमिशनच्या अध्यक्ष आहेत. २०१८ मध्ये त्यांची तेथील गव्हर्नरने नियुक्ती केली. तसेच अनेक सामाजिक संघटनात त्या सक्रिय आहेत.
Sammamish शहरात एकूण सात कौन्सिल मेंबर आहे त्यात तिचा समावेश झाला आहे. शहरातील नगर नियोजनाच्या कामात लक्ष देतानाच नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा टी सातत्याने प्रयत्न करते. मुली व महिलांवर होणारे अत्याचार या विरुद्धची तिची लढाई चालू आहे. शिक्षणातून जनजागृती करण्याचा सात्यत्याने प्रयत्न करत असताना, समाजात समानता राखण्याकडे तिचा जास्त कल आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे व महिलांना न्याय मिळाला पाहिजे असे तिचे मत आहे.
ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाला आपलेही काही देणे आहे असा एकमेव प्रामाणिक विचार करून ती काम करत आली आहे. मी फक्त समाजाची सेवा करते व त्यातून मला आनंद मिळतो,असे ती म्हणते.
सामाजिक कार्याची आवड असेल तर भाषा, प्रांत याचा अडथळा येत नाही हे ऋतुजाने आज सिद्ध करून कौन्सिल मेंबर होण्याचा बहुमान पटकाविला आहे. ही एक अतिशय अभिमानास्पद कामगिरी तिने मराठी चा झेंडा अमेरिकेत फडकविला आहे. शेवटी म्हणतात ना पाण्यात उतरल्या शिवाय पोहता येत नाही तसेच राजकारणात काम करायचे असेल, सामाजिक कार्य करायचे असेल तर त्यात सहभाग घ्यावाच लागतो. आपले अनुभव खूप काही शिकवून जातात. चांगले अनुभव अथवा योग्य निर्णय संधी निर्माण करतात. तर चुकीचे निर्णय, वाईट अनुभव देखील खूप काही शिकवून जातात. प्रवाहात उतरल्याशिवाय चढ उत्तरांचा सामना केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही. आत्मविश्वासाने काम केले तर नक्कीच यशाची दार उघडतात.स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी स्वतःचे हक्क मिळवण्यासाठी लढावे लागते .जर निर्णय व दिशा योग्य असेल तर जिंकणे अवघड नसते असे ऋतुजाचे ठाम मत आहे.
आई वडिलांनी अनेक त्याग, समर्पण केले. खूप कष्टाने वाढविले. आपल्या निर्णयावर ते ठाम राहिले. मुलगा मुलगी असा भेदभाव न करता स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवले, त्यामुळेच हा प्रवास सुखकर होऊ शकला असे टी सांगते. आई वडिलांनी तिच्याकडे वैयक्तिक लक्ष दिले, तिला वेळ दिला, वेळोवेळी मार्गदर्शन केले, तिला धाडसी बनवून तिला स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले त्यामुळे मी आज घडली असे ती प्रांजलपणे कबूल करते.
एक अविस्मरणीय आठवण सांगताना ऋतुजा म्हणाली, बालपणी सुट्टीला जेव्हा ती आजोळी पुण्यात येत असे,तेव्हा आजी आजोबा गोष्टी सांगत. आजी नेहमी सांगायची “काम केल्याने कोणीही झिजत नाही ” हे वाक्य ऋतुजाच्या मनावर बिंबवले गेले. त्यामुळेच आज ती नेहमीच उत्साही व आनंदी असते. प्रत्येक कामात शंभर टक्के देते.
बालवयात झालेले उत्तम संस्कार, आजी आजोबांची, आई वडिलांची शिकवण व गुरुजनांचे मार्गदर्शन व सर्व कुटुंबाची भक्कम साथ लाभल्याने ती हे यश मिळवू शकली असे तिचे म्हणणे आहे.
आज आई वडिलांना खूप आनंद व समाधान आहे की मुलीने आपले नाव मोठे केले . आज मुलीमुळे आपली ओळख निर्माण झाली. आज दोघेही जास्तीजास्त सामाजिक कार्य करण्यात मग्न आहेत. पालक म्हणून ऋतुजाच्या खूप अभिमान वाटतो हे सांगताना दोघेही अतिशय भावनिक होतात.
ऋतुजाला बुलेट चालवायला व ट्रेकिंग करायला खूप आवडते. तिला वाचनाची व पोहण्याची देखील आवड आहे.तिने पूर्वी podcast, इंटरव्ह्यू तसेच काही documentary फिल्म्स केल्या आहेत. सतत काहीतरी नवीन करायला, शिकायला , निसर्गाच्या सानिध्यात रहायला तिला आवडते.
पॉलिटिक्स मध्ये महिलांचा अतिशय कमी सहभाग आहे.मात्र ज्या महिलांची तयारी आहे, या क्षेत्रात येण्याची इच्छा आहे अशा महिलांना ती नक्कीच मदत करेल . तसे करायला तिला आवडेल. स्वतः बरोबर इतरांना पुढे घेऊन जाण्याची, दुसरी पिढी तयार करण्याची तिची मनस्वी इच्छा आहे.
ऋतुजा सांगू इच्छिते की, स्वतःच्या क्षमता ओळखुन त्याचा पुरेपूर उपयोग करा व समाजात सक्रिय सहभाग घ्या. नाविन्याची व आधुनिकतेची कास धरा. मग यश निश्चित आहे. कधीही हार मानू नका .आशावादी व प्रयत्नवादी रहा. संकटांचा सामना जिद्दीने करा. घाबरू नका.थांबू नका. खचू नका. अपयशावर मात करून पुढे चाला. नेहमी कार्यरत राहून आपले काम प्रामाणिकपणे करा असा मोलाचा सल्ला ती सर्व तरुणांना देते.
आजची युवा पिढी अतिशय हुशार आहे. त्यामुळे त्यांना योग्य दिशा दाखवण्याचे काम पालकांनी केले पाहिजे. मुलांनी नेहमी कष्टाची तयारी ठेवली पाहिजे असे तिला वाटते.
ऋतुजा स्वतःला खूप भाग्यवान समजते की तिला पूर्णपणे साथ देणारे प्रोत्साहन देणारे आई वडील लाभले. माझ्या बाबतीत जसे झाले तसेच इतर पालकांनी देखील जर मुलांचा कल ओळखून त्यांना आपले करियर निवडण्याचे स्वतंत्र दिले तर नक्कीच ही युवा पिढी खूप पुढे जाऊ शकते यात शंका नाही असे ऋतुजाचे ठाम मत आहे.
असे पुण्याचे हसतमुख, मनमिळावू, सरस्वतीची पूजा करणारे इंदापुरे कुटुंब समाजासाठी एक आदर्श आहे.न कोणता गर्व ,न कोणता अहंकार. केवळ निस्वार्थी काम हा कुटुंबाचा वारसा ऋतुजाने जपला आहे.
अशी या ऋतुजा दिनेश कोरडे / इंदापुरे एक राष्ट्रीय बॅडमिंटनपटू, आंतराष्ट्रीय स्पीकर, अमेरिकेतील वॉशिंग्टन स्टेट मधील सम्मामिश सिटीची नगरसेविका, सियाटन सन्मान योजनेच्या वॉशिंग्टन स्टेटची वूमेन कमिशनर, एक आदर्श पत्नी, प्रेमळ मुलगी, धडाडीची आई, उत्कृष्ट सामाजिक नेतृत्व करणारी कार्यकर्ती, असे अनेक भूमिका चोख बजावणारी ऋतुजा दिनेश कोरडे/ इंदापुरे यांच्या पुढील वाटचालीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा व तिच्या कार्याला सलाम.
ऋतुजाच्या हिंमतीची गोष्ट लिहिताना आवर्जून सांगावे वाटते,
जो पर्यंत मनाला
आशेचे पंख आहेत,
अंतःकरणात जिद्द आहे,
डोळ्यांसमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे !
आणि असे आशावादी नागरिकच
देशाची खरी संपत्ती आहेत !!
लेखन : रश्मी हेडे.
संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️9869484800.