डॉ. मधुकरराव कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प
लातूर ; दि. २५ ( माध्यम वृत्तसेवा )-डॉक्टर मधुकरराव कुलकर्णी लातूर मधील समाजसेवेतील एक अग्रगण्य नाव…! ‘ रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा ‘ हा वारसा , वसा समजून वाटचाल करणाऱ्या ममता चँरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉ. मधुकरराव कुलकर्णी ( बाबा ) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘ मोफत स्त्री पुरुष कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया ‘ करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे.
डॉ. मधुकरराव कुलकर्णी यांचा रविवार दि. 28 ऑगस्ट 2022 रोजी 86 वा वाढदिवस आहे. बाबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि. 28 ऑगस्ट 2022 ते दि. 28 ऑगस्ट 2023 या कालावधीत म्हणजे वर्षभर 'मोफत स्त्री-पुरुष कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया ' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे . या उपक्रमात 75 स्त्रियांच्या मोफत नसबंदी शस्त्रक्रिया व पुरुषांच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत , अशी माहिती सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वास कुलकर्णी व सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. अनुजा कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
लातूर मधील सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. मधुकरराव कुलकर्णी यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून आपल्या तरुण वयामध्ये नेत्र शस्त्रक्रिया शिबिरात सहभागी होत देश - विदेशात त्यांनी असंख्य लोकांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून त्यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत आपले योगदान लातूरकरांसाठी दिले आहे .
डॉ. एम. एस. कुलकर्णी यांनी वैद्यकीय क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे .एक नि:स्पृह व्यक्ती म्हणून त्यांचा सर्वत्र परिचय आहे . ममता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गत दहा वर्षापासून मोफत स्त्री-पुरुष कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येते. ममता हॉस्पिटल मधील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. अनुजा कुलकर्णी व त्यांच्या चमुने आतापर्यंत जवळपास 1000 मोफत शस्त्रक्रिया केलेल्या आहेत .डॉ. मधुकराव कुलकर्णी यांचा वाढदिवस पारंपारिक पद्धतीने साजरा न करता त्याला सामाजिक टच देण्यासाठी यावर्षी 75 मोफत शस्त्रक्रिया हा संकल्प सोडण्यात आला आहे.
यावेळी घरगुती स्वरूपात एम. एस .कुलकर्णी यांच्या जन्मगावी म्हणजे खुलगापूर या गावी व मित्र नगर भागातील ममता हॉस्पिटल येथे छोटेखाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वर्षभर चालणाऱ्या या मोफत स्त्री-पुरुष शस्त्रक्रिया उपक्रमाचा लातूर जिल्ह्यातील गोरगरीब गरजू लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन, ममता हॉस्पिटलचे डाँ.सौ माया कुलकर्णी , डॉ. विश्वास कुलकर्णी , डॉ.सौ. अनुजा कुलकर्णी , श्रीपाद उर्फ पप्पू कुलकर्णी आदींनी केले आहे.