38 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeसाहित्य*नभ ही ओला झाला,क्षण ही चिंब भिजला*

*नभ ही ओला झाला,क्षण ही चिंब भिजला*

शब्दांकित साहित्य मंचावर बरसल्या “श्रावण सरी”…

 लातूर ; दि. ( प्रतिनिधी) – शब्दांकित साहित्य मंचच्या वतीने श्रावणमास व जागतीक मैत्री दिनाच्या निमित्ताने  “श्रावणसरी” हा काव्य मैफीलीचा कार्यक्रम घेण्यात आला. या श्रावण सरीत रसीकजण  चिंब भिजून गेले होते. निसर्गाने ही साजेशी अशीच साथ दिली. जणू ‘नभ ही ओला झाला, क्षण ही चिंब भिजला या शब्दाचा प्रत्यय आला.

  शब्दांकित साहित्य मंचच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मोठया संख्येने ऑनलाईन व ऑफलाईन हजेरी लावली. कार्यक्रमात कवयित्रींनी एकापेक्षा एक दर्जेदार कवीता सादर करून रसीकांची मने जिंकली.  बहुतांश कविता पावसावर अधारित होत्या, काही सामाजिक विषयाच्या कवितांचे सादरीकरण करण्यांत आले. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध लेखिका  कवयित्री सौ. अरुणा दिवेगावकर होत्या. शब्दांकित साहित्य मंचच्या संस्थापक अध्यक्ष कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नयन भादुले राजमाने यांनी केले.

या कार्यक्रमात शैलजा कारंडे यानी आपली भावपूर्ण ‘कडकडून मिठी मारता, विसरून जावे नांव, डोळ्यामध्ये ओथंबून यावे युगायुगांचे मैत्रभाव’ कवीता सादर केली. प्रा.नयन राजमाने यांनी ‘झिम्माड पाऊस’ कविता सादर करून मनीचे गुज सांगितले…

असा झिम्माड पाऊस

सखे रोज खुणवितो

सजणाच्या भेटी साठी

मला रोज झुरवितो…

तसेच मैत्री दिनानिमित्त “ऋतूचक्र” या रचनेद्वारे स्रीच्या आत्मिय सखीला नयन राजमाने खडसावून सांगतात ….

प्रत्येक महिन्याला भेटणारी तू

अशी विलंबाने भेटून ढवळून टाकतेस अंतरंग

एकतर भेटीत सातत्य ठेव

नाहीतर मैत्री विसर…’

आठवते का? म्हणत जणू गझलकार विमल मुंदाळे यांनी प्रश्नच विचारला आहे. पावसात मी भिजले होते आठवते का? तू नजरेने टिपले होते आठवते का?, सुनीता मोरे यांनी एक क्षण भेटीचा आपल्या कधी येईल संख्या जिवनी’ अशी आर्तता कवीतेत व्यक्त केली., ‘परिक्षा’ या संबंधीची कवीता सुलक्षणा सोनवणे यांनी सादर केली. परिक्षा या नावाची ही उगाच वाटते भिती..,’निलिमा देशमुख यांनी ‘नभ’ या कवीतेत, ‘नभ ही ओला झाला,क्षण ही चिंब भिजला- कवीता सादर करून ओलावा आणला.

 विजया भणगे यांच्या कवीतेतून श्रावण बरसल्याचे वर्णन आहे….’बरखून गेला घन निळ श्रावणात झाली अवघी सृष्टी प्रफुलीत’ साक्षी कुलकर्णी यांनी कवीतेतून देवाला वर मागितला आहे त्या म्हणतात…’खरंच घडावं असचं सगळे,असा जगाला वर दे’

अमिता पैठणकर यांनी आपल्या कवीतेत ‘खरे तर सावळी माझी तुझ्यागत भासते आई म्हणोनी विठ्ठला मी टेकते मस्तक तुझ्या ठाई, अशी उत्तम कवीता सादर केली. सौ उषाताई भोसले यांनी ‘तुचतर’ या रचनेद्वारे भावना व्यक्त केल्या…

सृष्टीच सजीवपण, शतकोटीच जगण

पहिला श्वास देणारी ,तुचतर आहेस

होरपळतेस घुसमटतेस , दुशनांच्या आगीत

प्रसव वेदना रेटणारी, तूच तर आहेस’

सौ. शीला कुलकर्णी यांनी ‘श्रावण सर’ ही रचना सादर केली…

श्रावण सर अलींगन देते,

अवचित वसुंधरेला.

धरती मग ती फुलून येते,

रुप अनोखे सुंदर घेते’

कवयित्री अरुणाताई दिवगांवकर यांनी ‘बयो’ या कवीतेत स्त्री जिवनाचे वास्तव दाहक असे चित्रण व्यक्त केले …

लिहित जाऊ नको ग तुझ खरं खूर जगणं तुझी लेखणी झिजून जाईल, काळा केलेला कागद विरून जाईल’

अशा भावना व्यक्त करत कविसंमेलनाचा अध्यक्षीय समारोप केला. कवयित्रींनी स्वरचित उत्तम अशा कविता सादर करून रसीकांची मने जिंकली.

 बाहेर श्रावण सरी कोसळत होत्या तर मैफीलीत काव्यधारा बरसत होत्या. कवी संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन कवयित्री शैलजा कारंडे यांनी केले. वातावरण मैफीलीस अनुकूल असे होते. अध्यक्षीय समारोपानंतर काव्यमय कार्यक्रमाची सांगता करण्यांत आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]