19.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeकृषी*लातूर बाजार समितीचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाजारपेठेत रुपांतर झाले पाहिजे - आ.देशमुख*

*लातूर बाजार समितीचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाजारपेठेत रुपांतर झाले पाहिजे – आ.देशमुख*

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील उत्कृष्ट काम केलेल्या 

व्यापारी आडते गुमास्ते व हमाल-मापाडी यांचा सत्कार

लातूर प्रतिनिधी ३० जूलै २०२२ : 

  लातूर उच्च्तम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आम्हाला ज्या विश्वासाने लोकांनी निवडून दिले त्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे. आज मुंबईनंतर लातूर बाजार समितीचा उल्लेख केला जातो एवढा नावलौकीक मिळवला आहे. या  बाजार समितीचे आधुनिक, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाजारपेठेत रुपांतर झाले पाहिजे ही काळजी गरज आहे. यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न केले जातील, असे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.

  लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत  गेल्या तीन वर्षात उत्कृष्ट कार्य केलेल्या उद्योजक, व्यापारी, आडते, गुमास्ते व हमाल-मापाडी यांचा शनिवार दि. ३० जुलै रोजी पुरस्कार सन्मान चिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. 

  कार्यक्रमास लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ललितकुमार शहा, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी उपसभापती मनोज पाटील, प्रशासक बी.डी.दुधाटे, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, सहाय्यक सचिव सतीश भोसले, रमेश सूर्यवंशी, बालाप्रसाद बीदादा, सुधीर गोजमगुंडे, अजिंक्य सोनवणे, हर्षवर्धन सवइ, प्रवीण पाटील, चंदू पाटील, तुकाराम आडे, अरविंद पाटील, गणेश रुकमे, मधुकर गुंजकर, शिवाजी कांबळे, भुतडा, कलंत्री, मालू, आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी कर्मचारी व्यापारी आडते गुमास्ते हमाल मापाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

   प्रारंभी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व मान्यवरांनी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. सन २०१९ ते २०२२ या तीन वर्षात लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील उत्कृष्ट काम केलेल्या व्यक्तींचा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, शाल, बुके देऊन सत्कार करण्यात आला.

लातूर बाजार समितीच्या परंपरेला साजेसे काम

   माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यावेळी बोलतांना म्हणाले की, बाजार समितीच्या पुढाकाराने उद्योजक, गुमास्ते, व्यापारी, मापाडी यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात येत आहे. लातूर बाजार समितीची एक परंपरा आहे, त्याला साजेश काम सुरुवातीपासूनच या ठिकाणी झालेले आहे. या कामातील सातत्य आजही टिकवून ठेवल आहे. यासाठी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांच मी कौतुक करतो. लातूर बाजार समितीच्या सुरुवातीला १२ कोटी ठेवी होत्या आज ९५ कोटी रूपये ठेवीचे उद्दिष्ट गाठलेल आहे. सभासदांनी ज्या विश्वासाने निवडून दिले त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली आहे. स्वर्गीय दगडोजीराव देशमुख, लोकनेते विलासराव देशमुख, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राहिले आहेत. व्यापारी कर भरतात म्हणून ही बाजारपेठ चांगली चालते त्या सर्व पैशाचा योग्य गोष्टीवरच खर्च केला जातो. लोकनेते विलासराव देशमुख यांनी आपल्याला जी शिस्त लावून दिली, शेतकऱ्यांची बांधिलकी जपण्याचा विचार त्यांनी दिला त्यापासून आपण कधीही फारकत घेतली नाही. 

लातूर  बाजार समितीचे जागतिक दर्जाच्या

बाजारपेठेत रुपांतर व्हावे

   लातूर बाजार समितीने आपल्या कामातून लौकीक मिळवला आहे. यामुळे मुंबईनंतर लातूर बाजार समितीचा उल्लेख केला जातो. मुंबई बाजार समिती ही शिखर संस्था आहे. तेथे राज्यातील बाजार समिती मधून निवडून संचालकांना जावे लागते. आम्ही अभ्यास करतोय आणखी या ठिकाणी काय चांगले काम करता येईल. लातूर  बाजार समितीचे आधुनिक आंतरराष्ट्रीय जागतिक दर्जाच्या बाजारपेठेत रुपांतर  झाले पाहिजे ही काळजी गरज आहे. या बाजार समितीचे स्थलांतरामुळे व्यापाऱ्यांना चांगली जागा मिळेल तसेच लातूर शहराच्या वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी मदत होणार आहे. परजिल्हा व परराज्यातून शेतकरी येथे माल द्यायला येतात आपला माल जगात जातो, नवीन जागेत राष्ट्रीय महामार्गचे जाळ आहे. एमआयडीसी आहे, खत, बियाणे, मोटार, हा सगळा व्यापार तेथे होणार आहे. तेथे सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणार आहोत असे सांगितले. यानंतर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी व पुरस्कार प्राप्त झालेल्या व्यक्तींचे कौतुक करून अभिनंदन करून सर्वाना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

लातूरचा इतिहास कायमच गौरवशाली राहिला आहे.

आमदार धिरज विलासराव देशमुख

   केवळ राजकारण, शिक्षण, कला, क्रीडा अशा क्षेत्रांतच नव्हे तर कृषी, उद्योग या क्षेत्रातही लातूरने राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि ती कौतुकास्पद अशीच आहे. लातूरच्या या सर्वांगीण विकासाच्या घोडदौडीत लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचेही मोठे योगदान आहे असे उदगार लातूर ग्रामिणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी या प्रसंगी बोलतांना काढले.

– लातूरच्या बाजार समितीतील तूर व सोयाबीनचा सौदा, बाजारभाव याचा लौकिक राज्यात आहे. हे एकट्याचे काम नाही. शेतकऱ्यांपासून आडते, व्यापारी, हमाल, गुमास्ता यांची त्यामागे मेहनत आहे. अशा सामूहिक प्रयत्नांमुळे, एकजुटीमुळे, मेहनतीमुळे आपली बाजार समिती राज्यात आघाडीवर आहे. विकासकामांसाठी अर्थपुरवठा वेळेत आणि चांगल्या दरात मिळाला नाही तर ते विकासकाम उभे राहत नाही. आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या शिस्तीमुळे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यात आघाडीवर आहे. राष्ट्रीयकृत बँकेबरोबर व्यवहार करण्यास परवानगी मिळालेल्या ११ जिल्हा बँकेत लातूर जिल्हा बँकेचा समावेश आहे. १९८४ मध्ये आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्याकडे बँकेचा कारभार आला. तेव्हा बँकेची ३४ कोटींची उलाढाल होती. आज ती ५,००० कोटींच्या पुढे गेली आहे. यामुळेच यावर्षी १,७०० कोटी रुपये बिनव्याजी कर्जाचे वाटप केले आहे. ते सुरूच आहे. कर्ज व क्षेत्र मर्यादा वाढवून अधिकाधिक शेतकऱ्यांना या बिनव्याजी कर्ज योजनेत सामावून घेतले आहे. वाढता उत्पादन खर्च असल्यामुळे शेतकऱ्यांना कोणाकडेही हात पसरायची वेळ येवू नये, अशी व्यवस्था बँकेने केली आहे असे सांगितले. 

– लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही इतर राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे ग्राहकांना योजना, सेवा, सोयीसुविधा देण्यास कटिबद्ध आहे. बाजार समिती व तिच्याशी संबंधित घटक हे शेती क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यामुळे बँक येथील विविध घटकांसाठी योजना आखून पतपुरवठा करण्यास तत्पर आहे. जिल्हा बँकेने १०० ऊसतोडणी यंत्रासाठी पतपुरवठा करण्याची योजना आखली आहे. यामुळे युवकांच्या हाताला काम मिळेल, असा मला विश्वास आहे असे म्हटले.

– लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि बाजार समिती यांच्या माध्यमातून गावपातळीवर शेतीशी निगडित पायाभूत सुविधा निर्माण करून ग्रामीण व्यवस्था सुधारणे, नव्या अत्याधुनिक व्यवस्था उभारून रोजगार निर्मिती करणे आणि स्थानिक युवकांच्या हातांना काम उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे. यासाठी जिल्हा बँक खंबीर आहे. जेणेकरून युवकांना त्यांच्या पायावर उभं राहता येईल, युवकांमध्ये उद्योजकीय क्षमता निर्माण होतील, त्यांची आर्थिक उन्नती होईल. त्या दिशेने पावले टाकण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन आमदार धिरज देशमुख यांनी केले.

  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ललितभाई शहा यांनी करून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. तर माजी आमदार वैजनाथराव शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन सूर्यवंशी यांनी केले, तर शेवटी आभार लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी.डी दुधाटे यांनी मानले.

—————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]