लातूर : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ६२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवरील अजिंक्य सिटीमधील ग्रीन बेल्टमध्ये १११ वृक्षांचे रोपन करण्यात आले. विशेष म्हणजे या सर्व वृक्षांना सुरक्षेसाठी ट्री गार्डही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शिवसेनेचे जिल्हा कार्यालय प्रमुख दिनेश बोरा, शहर संघटक संदीपमामा जाधव यांच्या नियोजनात सदर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिवाजी माने, महिला जिल्हा संघटक शोभाताई बेंजरगे, ज्येष्ठ शिवसैनिक तथा माजी उपशाखा अध्यक्ष मुंबई गंगणे काका, महानगरप्रमुख विष्णुपंत साठे, शहर प्रमुख रमेश माळी , तानाजी करपुरे, श्रीनिवास लांडगे, राजू कतारे , राहुल रोडे, लातूर वृक्ष प्रतिष्ठानच्या पदाधिकारी अभियंता सुनंदा जगताप, आशालता बिराजदार ,चंद्रकांत शिंदे,गरड गुरुजी, अरिहंत किवडे यांची उपस्थिती होती.
या वृक्षारोपणानंतर आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केवळ असा एकच वृक्षारोपण कार्यक्रम नव्हे तर प्रत्येकाने आपल्या घरात, शेतात, अंगणात किमान एक झाड लावून त्याचे संगोपन व्यवस्थितरीत्या करून पुढच्या वर्षी ठाकरे यांच्या वाढदिवसासोबत त्या झाडाचाही वाढदिवस साजरा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर लातूर वृक्ष प्रतिष्ठानच्या सुनंदा जगताप यांनी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या या वृक्षारोपणाचे स्वागत केले. तसेच या वृक्षांची आपण चांगल्या प्रकारे काळजी घेऊन संगोपन व जोपासना करु आणि पुढील वर्षी या झाडांचाही वाढदिवस साजरा करू अशी ग्वाही दिली. यावेळी सर्व उपस्थितांनी वृक्ष संवर्धनाची प्रार्थना केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश बोरा यांनी केले. संचलन श्रीनिवास लांडगे यांनी तर आभार प्रदर्शन संदीपमामा जाधव यांनी केले. ———————