गुरुवारी सकाळी १० वाजता पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यविधी
लातूर दि.२० :- ज्येष्ठ कवयित्री, लेखिका व माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या पत्नी उर्मिला विश्वनाथ कराड यांचे बुधवारी आकस्मिक निधन झाले. लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, पुतणे, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. एमआयटी संस्थेच्या जडणघडणीत प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांना त्यांनी मोलाची साथ दिली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या त्या काकू होत्या. कवयित्री व लेखिका म्हणून त्यांनी त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.
मूळच्या नाशिकच्या असलेल्या उर्मिला कराड यांचे शिक्षण नाशिकच्या एच. पी. टी. महाविद्यालयातून झाले. १९६४ साली त्यांनी मराठी विषयात बी. ए. (ऑनर्स) ही पदवी प्रथम क्रमांकाने संपादित केली. लग्नानंतर त्या लातूर येथील रामेश्वर (रुई) येथे आल्या. त्यांचे माहेर व सासर ही दोन्ही घराणी संपूर्ण वारकरी सांप्रदायाची असल्याने त्यांच्या मनावर संतसाहित्याचा विशेष प्रभाव होता. लहानपणापासून त्यांना काव्यलेखनाची आवड होती. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त आदरणीय कविवर्य कुसुमाग्रज हे त्यांचे स्फूर्तिस्थान होते.
ह.भ.प. संतु राजाराम पाटील हे त्यांचे वडील होते. ते अतिशय विद्वान, निष्ठावंत वारकरी आणि हाडाचे शिक्षक होते. त्यांच्या संस्कारातून त्या घडल्या. लग्नानंतर खेड्यातील वातावरण, घरात सतत माणसांचा राबता, रगाडा आणि कष्टाची कामे यातही त्यांनी त्यांचे कविमन जपले, जोपासले. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘समीर’ हा १९८९ मध्ये प्रकाशित झाला. पुढे त्यांनी ‘अरे संसार संसार’, ‘अनुभूती’, ‘माझी माय दुधावरची साय’ यासह अनेक लोकप्रिय कवितासंग्रह त्यांनी लिहिले. विविध वृत्तपत्रांतून त्यांनी अनेक विषयांवर विपुल लेखन केले. संत साहित्यावर त्यांचा गाढा अभ्यास होता. विविध साहित्य संमेलने, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमातील त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. गेली अनेक वर्षे पंढरपूरची पायी वारी त्या करत असत. त्यांच्या विपुल लेखनाबद्दल, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना अनेक संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे. सुरसंगम परिवारातर्फे ‘वत्सल माता गुरुमाई पुरस्कार’, आदी पुरस्कार त्यांना मिळाले होते.
एमआयटी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या मातोश्री, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, तसेच आ. रमेशआप्पा कराड यांच्या त्या चुलती होत. उर्मिला कराड यांचे पार्थिव परमहंसनगर, कोथरूडमधील ज्ञानमंदिर या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी सकाळी ९ ते ९.३० या वेळेत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर १०.३० च्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमी, लाकडी पुलाजवळ, पुणे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.