*राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून डोंगर शेळकी येथील फुटलेल्या धरणाची पाहणी*
*येथील नुकसानग्रस्त शेतकरी राठोड यांना ना. बनसोडे यांच्याकडून तात्काळ 25 हजाराची मदत*
लातूर/उदगीर, दि.25(जिमाका):- उदगीर तालुक्यातील डोंगर शेळकी येथे नुकतेच फुटलेल्या तलावाची पाहणी राज्याचे पाणी पुरवठा, पर्यावरण, भूकंप पुनर्वसन, रोजगार हमी योजना, संसदीय कार्य व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आज पाहणी केली. व या पाण्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे व जमिनीचे पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश संबंधित विभागांना दिले.
डोंगरशेळकी येथील फुटलेल्या तलावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यापैकी श्री. राठोड या शेतकऱ्याला राज्यमंत्री बनसोडे यांनी स्वतः 25 हजाराची आर्थिक मदत यावेळी दिली. व हा तलाव फुटल्यामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्ण करून घ्यावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशा पद्धतीने मिळेल यासाठी प्रयत्न करावेत असेही निर्देश श्री बनसोडे यांनी दिले. तसेच येथील एक ही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
यावेळी उदगीर पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मारलापल्ले, कल्याण पाटील, जलसंपदा विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
*********